'ताश्कंद फाईल्स' - सत्याकडे नेण्याचा प्रयत्न

    दिनांक  23-Apr-2019   'दि ताश्कंद फाईल्स' हा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट भारताचे दुसरे पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादुर शास्त्री यांच्या संशयास्पद मृत्यूवर आधारित आहे. हा चित्रपट पाहून मात्र, जे मी मूल्य दिले, त्याच्यापेक्षा हजारपट या चित्रपटाने मला दिले आहे, अशी प्रत्येकाची भावना होईल.

 

केंद्रात राष्ट्रवादी शासन आल्यानंतर काय होतं? पहिली गोष्ट होते ती म्हणजे, अभिव्यक्तिस्वातंत्र्याला मुक्त वाट मिळते. केंद्रात एकाच पक्षाचे सरकार होते, एकाच घराण्याचे सरकार होते, एकाच विचारधारेचे सरकार होते आणि ते म्हणतील ते सत्य, ते म्हणतील ते अभिव्यक्तिस्वातंत्र्य, सगळे 'राष्ट्रवादी आवाज' दाबून टाकण्यात आले होते. सिनेमाच्या क्षेत्रात हे अभिव्यक्तिस्वातंत्र्य अतिशय धाडसाने प्रकट होताना दिसते. त्यामुळे 'उरी', 'बेबी', 'अ‍ॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर' आणि आता 'दि ताश्कंद फाईल्स' हे चित्रपट एकापाठोपाठ एक प्रदर्शित झाले आहेत. आणि काय आश्चर्य, सिनेमाच्या भाषेत सांगायचे तर बॉक्स ऑफिसवर हिटही झाले आहेत. कोटी-कोटींचा गल्ला त्यांनी जमवलेला आहे. याचा अर्थ असा झाला की, जो आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला, तो आवाज आता बॉक्स ऑफिसच्या माध्यमातूनही बाहेर येताना दिसतो. 'दि ताश्कंद फाईल्स' हा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट आहे. मी चित्रपटाचा समीक्षक नाही. चित्रपटावर यापूर्वी मी कधी लिहिलेले नाही. पण हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यावर लिहिलेच पाहिजे, असे मला वाटले. चित्रपट, भारताचे दुसरे पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादुर शास्त्री यांच्या संशयास्पद मृत्यूवर आधारित आहे. लाल बहादुर शास्त्री देशाचे दुसरे पंतप्रधान होते. त्यांचा जन्म २ ऑक्टोबरला (गांधी जयंती) झाला, १९६५च्या युद्धात त्यांनी पाकिस्तानचा पराभव केला. १९६२च्या भारत-चीन युद्धात अपमानित झालेल्या भारतीय सैन्याला सन्मानित केले. 'जय जवान, जय किसान' ही त्यांची घोषणा आहे. धोतर, कुर्ता आणि गांधी टोपी हा त्यांचा वेष होता. सामान्य परिवारातून ते आले आणि खऱ्या अर्थाने सामान्य माणसाचे प्रतिनिधीत्व करणारा 'शास्त्री' नावाचा हा महान माणूस होता. पण, त्यांची माहिती नव्या पिढीला नाही. भारतात कुठेही जा, एक तर नेहरू सेंटर असेल, गांधी मेमोरियल असेल, कारखान्याला नाव गांधी परिवाराचे, राष्ट्रीय उद्यानालादेखील नाव नेहरू-गांधी परिवाराचे. लाल बहादुर शास्त्री नावाचा एक 'बहादुर' पंतप्रधान झाला, याची माहितीही तरुण पिढीला नसते.

 

या पिढीचे प्रतिनिधीत्व करणारी या चित्रपटाची नायिका आहे, रागिणी फुले (श्वेता बसू प्रसाद). तरुण पत्रकार आहे आणि शास्त्रीजींच्या खुनाचे रहस्य शोधून काढण्यामागे ती लागली आहे. संपादक, रागिणीला एक जबरदस्त स्टोरी (स्कूप) आठ दिवसांच्या आत आणायला सांगतात. तिला अनोळखी व्यक्तीचा फोन येतो आणि ती व्यक्ती रागिणीला शास्त्रीजींच्या संशयास्पद खुनाचा विषय देते. येथून जो चित्रपट पुढे सरकत जातो, तो श्रोत्यांना दोन तास खुर्चीला बांधून ठेवतो. बांधून ठेवणारा नेहमीचा मालमसाला यात काही नाही. मारामाऱ्या नाहीत, सेक्स सीन नाही, आयटम साँग नाही. पण, पात्रांचे अभिनय, त्यांचे संवाद, संवादातील आशय, सगळंच लाजवाब. रागिणीच्या स्टोरीमुळे शासनाला शास्त्रीजींच्या मृत्यूची समिती बसवावी लागली. विरोधी पक्षनेते शामसुंदर त्रिपाठी (मिथून चक्रवर्ती) समितीचे अध्यक्ष होते. समिती बसविण्यापूर्वी विरोधी पक्षनेता आणि गृहमंत्री नटराजन (नसिरुद्दीन शहा) यांची मुलाखत दाखविली आहे. नटराजन, त्रिपाठी यांना त्यांच्या भानगडीची फाईल दाखवितात. सरकारी समितीचा अहवाल शासनाला हवा तसा कसा बनवायचा, हे तुम्हाला माहीत आहे, असे सांगतात. समितीत आठ जणांना घेतले जाते. त्यातील रागिणी फुले सोडून, प्रत्येक सदस्याचा इतिहास 'इतिहास असतो' म्हणजे शासनाकडून प्रत्येकाला स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी काही ना काही हवे असते. अशी सरकारी समिती ही एक फार्स असते. लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी शोधलेला लोकशाही उपाय असतो. निष्कर्ष काय काढायचा, हे ठरलेले असते. नावे मोठी असली तरी अत्यंत नीच स्वार्थ असलेली माणसे समितीत असतात, ती शब्दांचे खेळ करून सत्य शोधण्याच्या नावाखाली असत्य कसे प्रस्थापित करतात, याचा खेळ म्हणजे ही समिती असते. हा चित्रपट या समितीच्या कामाभोवती फिरत राहिलेला आहे. समितीमध्ये एक सरकारी इतिहासकार आहे, तिचे नाव आहे आयेशा. हे सरकारी इतिहासकार स्वतःला महान संशोधक समजतात. इतिहास पुरावे मागतो, हे वाक्य घोकत राहतात आणि त्यांना नकोसे असलेले पुरावे दिले की, ते बनावट आहेत, दुय्यम दर्जाचे आहेत, असे आक्षेप घेऊ लागतात. (या इतिहासकारांत रामचंद्र गुहा, रोमिला थापर, इरफान हबीब यांचा समावेश करायला पाहिजे. चित्रपटातील आयेशाच्या पात्राने या तिघांची मला आठवण करून दिली.) आणि ही समिती असत्य प्रस्थापित करण्यामागे लागलेली आहे, हे समजल्यावर रागिणी फुले पुरावे गोळा करीत जाते. येथून चित्रपट गतिमान होतो. सत्य शोधण्याचे काम चित्रपटाची नायिका रागिणी फुले धाडसाने करीत राहते. ताश्कंदला जाते. दीर्घकाळ गायब असलेल्या एका हेराला शोधून काढते, त्याच्याकडून माहिती मिळविते. हा सगळा चित्रपटाचा सनसनाटी भाग आहे, तो वर्णन करण्यासारखा नसून पडद्यावर पाहण्यासारखा आहे.

 

असे तीन-चार सनसनाटी प्रसंग चित्रपटामध्ये आहेत आणि ते कथानकाला पुढे नेणारे आहेत, मुद्दाम ओढूनताणून आणलेले नाहीत. परंतु, या कथानकापेक्षा चित्रपटाचा संदेश माझ्या मते जबरदस्त आहे. लाल बहादुर शास्त्री यांनी १० जानेवारी, १९६६ ला करारावर सही केली आणि ११ जानेवारी पहाटेला ते मृत्यू पावले. ज्या थर्मासमधून झोपण्यापूर्वी त्यांनी दूध घेतले, तो थर्मास गायब झाला. त्यांचा नेहमीचा स्वयंपाकी रामलाल यांच्याऐवजी जान मोहम्मद हा दूध घेऊन आला. दूध प्यायल्यानंतर शास्त्रीजी खूप अस्वस्थ झाले. त्यांच्याबरोबर त्यांचे डॉ. चुग होते. त्यांना लगेचच बोलावण्यात आले. इतर रशियन डॉक्टर आले आणि त्यांनी शास्त्री मृत झाल्याचे घोषित केले. मृत्यूचे कारण काय, हृदयविकार की विषप्रयोग? शास्त्रीजींचे निवासस्थान अचानक का बदलण्यात आले? रामलालच्याऐवजी जान मोहम्मदला काम का देण्यात आले? दुधाचा थर्मास कुठे गेला? मृत्यूनंतर शवविच्छेदन का करण्यात आले नाही? त्यांच्या चेहऱ्यावर निळे-काळे डाग का होते? शास्त्रीजींचे पार्थिव दिल्लीत आणले, तेव्हा शरीरावर कापल्याच्या खुणा का होत्या? टोपीला रक्त का लागले होते? डॉ. चुग मोटार अपघातात नंतर कसे ठार झाले? त्यांचा (शास्त्रीजींचा) स्वयंपाकी मोटार अपघातात दोनदा कसा काय सापडला? शास्त्रीजींच्या वैद्यकीय अहवालावर आठपैकी सहा डॉक्टरांनीच सह्या का केल्या? दोन डॉक्टरांनी सह्या करण्याचे का नाकारले? हे प्रश्नांचे भुंगे या चित्रपटाने निर्माण केले आहेत, म्हणजे जागविले आहेत. शास्त्रीजींच्या मृत्यूचा सर्वात जास्त फायदा कोणाला होणार होता? चित्रपटातच निर्माण झालेला हा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर 'मित्रोखिन आर्काव्हिज' या दोन खंडात्मक पुस्तकात आहे. हे पुस्तकच या चित्रपटाचा मुख्य स्त्रोत आहे. मित्रोखिन हा केजीबीचा हेर होता. १९९२ साली तो ढीगभर कागदपत्रे घेऊन इंग्लंडची गुप्तहेर संघटना 'MI५' च्या कार्यालयात जातो. चित्रपटाची सुरुवातच तिथून होते. Christopher Andrews, Mitrokhin या दोघांनी मिळून त्यावर दोन पुस्तके लिहिलेली आहेत आणि ती बाजारात उपलब्ध आहेत. या पुस्तकातून जी रहस्ये बाहेर आलेली आहेत, ती डोक चक्रावून टाकणारी आहेत. इंदिरा गांधींचा काँग्रेस पक्ष रशियाच्या केजीबीच्या हस्तकांनी पोखरून टाकला होता. त्यांचा मुख्य सल्लागार पी. एन. हक्सर, मोहनकुमार मंगलम् (खाणमंत्री), हरिभाऊ गोखले (कायदामंत्री), मित्रोखिनच्या म्हणण्याप्रमाणे काँग्रेस पक्षातील ४० टक्के खासदार केजीबीशी संबधित होते. इंदिरा गांधी यांना केजीबीने कसे प्रभावित केले होते आणि आणीबाणीचा खेळ केजीबीनेच त्यांना कसा खेळायला लावला, हे सांगितले आहे आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे केजीबीने इंदिरा गांधींना किती वेळा, किती मिलियन रुबल्स दिले, याची आकडेवारी दिली आहे आणि या चित्रपटाचा शेवट होत असताना ती सगळी कागदपत्रे पडद्यावर येतात. चित्रपटातील एक संवाद असा आहे की, शीतयुद्ध चालू असताना जगाची विभागणी अमेरिकेचा गट आणि रशियाचा गट, अशा दोन भागांत झाली. पैशाची पेरणी करून देश चालविणाऱ्या लोकांना ताब्यात घेणे, ही अमेरिकेची रणनीती होती, तर रशियाची रणनीती देश चालविणारी डोकी ताब्यात घेण्याची होती. दिल्लीच्या ज्या भागात ही डोकी राहतात, त्या भागाला 'लुटियन्स' असे म्हणतात. त्या भागावर कब्जा मिळविला की सर्व देशावर कब्जा मिळविता येतो, हे रशियाचे धोरण होते. आणीबाणीचा कालखंड, ४२ वी घटनादुरुस्ती, उद्देशिकेत घुसडलेले 'समाजवाद' आणि 'सेक्युलर' हे शब्द, हे सगळे विषय चित्रपटात विस्ताराने आले नसले तरी चित्रपटातील प्रसंग याकडे संकेत करीत जातात. 'समाजवाद' आणि 'सेक्युलर' हे शब्द सर्व राष्ट्रवादी विचारधारांना चिरडण्यासाठी आणले गेले आणि ते रशियाच्या केजीबीच्या सांगण्यावरून भारताच्या कम्युनिस्टांनी आणले.

 

अंतर्बाह्य भारतीय असलेले लाल बहादुर शास्त्री केजीबीच्या भारत, कम्युनिस्ट करण्याच्या राजकारणातील फार मोठा अडथळा होते. ते भारताला विकाऊ होऊ देणार नव्हते. अणुबॉम्ब सज्जतेच्या दिशेने भारताची सुरुवात त्यांनी केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर बरोबर अकरा दिवसांनी विमान अपघातात भारताचे थोर अणुशास्त्रज्ञ होमी भाभा ठार (ठार मारले गेले) झाले. इंदिरा गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना केजीबीला नाचविणे सोपे होते. शास्त्रीजींच्या बाबतीत ते अशक्य होते, म्हणून शास्त्री संपणे आवश्यक झाले होते. चित्रपट हा संदेश पार जबरदस्तपणे देतो. लेखक, दिग्दर्शक, निर्माते विवेक अग्निहोत्री यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. असा विषय सुचायला एक कल्पकता लागते, योग्य त्या पात्रांचे नियोजन करण्याची कुशलता लागते, कथानकाला गतिमान ठेवण्यासाठी संवाद लागतात आणि त्यासाठी प्रतिभा लागते. अभिनय, संवाद, तांत्रिक अंगे या सर्वच बाबतीत हा चित्रपट ए-१ झालेला आहे. शास्त्रीजींच्या मृत्यूचे गूढ उकलणाऱ्या समितीचे अध्यक्ष शामसुंदर त्रिपाठी हे समितीच्या एकेका सभासदापुढे जाऊन त्याचे वास्तव रूप प्रकट करतात. तो सर्व प्रसंग पडद्यावर बघण्यासारखा आहे. ते म्हणतात,“तुम्ही इतिहासकार, कोण आहात तर 'लिबरल टेररिस्ट' आहात, तुम्ही एनजीओ चालविता, तुम्ही 'सोशल टेररिस्ट' आहात, तुम्ही जज आहात, तुम्ही 'ज्युडिशिअल टेररिस्ट' आहात आणि तुम्ही मीडियावाले, 'टीआरपी टेररिस्ट' आहात.” या दहशतवाद्यांचा सामना आपण जीवनात पदोपदी करीत असतो. चित्रपटात तो प्रसंग संवादाच्या रूपाने आणि अगदी विदारकपणे येतो. विवेक अग्निहोत्रींचे त्याबद्दल अभिनंदनच करायला पाहिजे. हे मांडायला हिम्मत लागते. हा चित्रपट डाव्यांच्या नाकाला भरपूर मिरच्या झोंबणारा झालेला आहे. त्यांची जी वर्तमानपत्रे आहेत, त्यात त्यांनी 'डाव्या शैलीने' त्यावर लिहिलेले आहे. 'हिंदुस्थान टाइम्स'ने खवचटपणाची कमाल केलेली आहे. “समितीच्या एका सदस्याच्या तोंडी 'मैंने इतनी जादा गंदगी एक साथ इससे पहले कभी नही देखी' हे वाक्य या चित्रपटाला पूर्ण लागू होते,” असे 'हिंदुस्थान टाइम्स'चे मत आहे. असे डाव्यांचे मत असल्यामुळे सर्व देशप्रेमी लोकांनी हा चित्रपट, चित्रपटगृहात जाऊन बघायलाच पाहिजे. आपल्या बहादुर पंतप्रधानांची शोकांतिका समजून घ्यायला पाहिजे. सामान्य करमणुकीचा चित्रपट असेल तर पैसा वसूल ही भावना होते, परंतु हा चित्रपट पाहून मात्र, जे मी मूल्य दिले त्याच्यापेक्षा हजारपट या चित्रपटाने मला दिले आहे, अशी प्रत्येकाची भावना होईल. वाचकहो, त्वरा करा आणि जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघाच. काँग्रेसवाले चवताळून तो बंद पाडण्याच्या उचापती करण्याच्या अगोदर बघा.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat