विकासाच्या प्रतीक्षेत पूर्वउपनगरे

    दिनांक  23-Apr-2019ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात घाटकोपर ते मुलुंड या मुंबईतील पूर्व उपनगरांचा भाग मोडतो. या भागात अनेक प्रश्न वर्षानुवर्ष रेंगाळलेले आहे. या भागात सर्वभाषिक नागरिक वास्तव्यास असून त्यांच्या कित्येक पिढ्याही याच परिसरातल्या. घाटकोपर आणि मुलुंड या भागात मोठ्या प्रमाणात गुजरातींची वस्ती, तर भांडूप, विक्रोळी हा मध्यमवर्गीय मराठीबहुल भाग. मात्र, त्याबरोबरच बंगाली, मद्रासी समाजबांधवांची संख्याही वाढायला लागली आहे. त्यातच उत्तर प्रदेशातून कामानिमित्त येणारे कामगारही याच भागात वास्तव्यास दिसतात. परिणामी, डोंगरावर बकाल झोपडपट्ट्यांचे प्रमाणही वाढलेले दिसते. त्यामुळे या मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या विभागातील अनेक भागांत भीषण पाणीटंचाई आहे, काही ठिकाणी रस्ते अरूंद असल्याने वाहतूककोंडीची समस्याही बिकट आहे. झोपडपट्टी हटवून काही वर्षांपासून एसआरए योजना लागू झाली असली तरी अनेक ठिकाणी बिल्डरलॉबीचे जाळे आहे. त्यामुळे नागरिकांना फसविण्याचे खूप प्रकार येथे घडले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये याबाबत प्रचंड भीती आहे.भांडूपसारख्या भागात लहान मुलांना खेळण्यासाठी एकही बगिचा किंवा मैदान नाही. पालिकेचे मुलुंडच्या अगरवाल रुग्णालयाशिवाय एकही सुसज्ज आणि सर्व सुविधांयुक्त रुग्णालय नसल्याने इतर रुग्णांना परळ गाठण्याशिवाय पर्याय नाही. रस्त्यांची अवस्था अजूनही सुधारलेली नसून मेट्रोच्या बांधकामामुळे त्यात अधिक भर टाकली आहे. तसेच, या परिसरातील रिक्षाचालकांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो तो वेगळा. वाढत्या लोकसंख्या असणार्‍या या भागातून खासकरुन सुटणार्‍या उपनगरीय लोकल सेवेची संख्याही वाढली पाहिजे. महिलावर्गासाठी आणि युवक-युवतींसाठी रोजगार नसल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे चित्र दिसून येते. असे अनेक मूलभूत प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत. यासाठी गरज आहे ठोस पाऊल उचलून काम करणार्‍या नेतृत्वाची; जेणेकरून विकासकामे वेगाने होतील. खासदार किरीट सोमय्या यांनीही या मतदारसंघात विकासकामे केली, पण कुठे तरी या कामांना त्यांना गती देता आली नाही. असो. मनोज कोटक यांच्या निमित्ताने पालिकेतील एक अनुभवी, नागरी समस्यांची उत्तम जाण असलेला नेता या मतदारसंघातून आता रिंगणात आहे. त्यामुळे त्याचा निश्चितच फायदा भाजपला होईल, असे सध्या तरी वातावरण दिसून येते.

 

मनोज कोटकांकडून अपेक्षा...

 

भाजपचे खा. किरीट सोमय्या यांनी ईशान्य मुंबईत विकासाची अनेक कामे केली. रेल्वेस्थानकातील पूल असतील किंवा नाहूर-कांजूरसारखी स्थानके. आता भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांच्याकडूनही नागरिकांच्या खूप अपेक्षा आहेत. कोटक मुलुंडचे नगरसेवक असल्याने त्यांना नागरिकांच्या प्रश्नांची उत्तम जाण आहे. त्यांनी राज्य सरकारच्या प्रयत्नांतून या भागात मेट्रोसारखी सुविधा आणली असून याचे काम जलदगतीने सुरू आहे. मात्र, तरीही या मतदारसंघात त्यांना अनेक विकासकामे हाती घ्यावी लागणार आहेत. लाल बहादुर शास्त्री मार्गाचे रूंदीकरण करून या मुख्य रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी त्यांना प्राधान्यक्रम देऊन काम करावे लागेल.शिवाय या भागात 500 बेड असणारे स्पेशालिस्ट रुग्णालय बनविले जाणार आहे, जेणेकरून सामान्य नागरिकांना याचा खूप फायदा होईल. मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असणार्‍या या भागात सगळ्यांसाठी परवडणारी घरे बांधण्यात येणार असून याचा हजारो लोकांना फायदा होणार आहे. बेरोजगारीच्या विळख्यात अडकलेल्या युवक-युवतींना रोजगार मेळावे व रोजगार साहाय्यता केंद्रांमुळे प्रगतीच्या मार्गावर नेण्यात येईल, असे आश्वासन मनोट कोटक यांनी आपल्या संकल्पपत्रातही दिले आहे. सर्व जुन्या उड्डाणपुलांचे लेखा अहवाल करण्यात येणार असल्याने धोकादायक व जुन्या पुलांची दुरुस्ती करण्यात येईल. या भागातील अनेक रखडलेल्या कामांचा पाठपुरावा करून मनोज कोटक यांना कामे तडीस नेण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. डम्पिंग प्रश्नाचे भिजत पडलेले घोंगडे आता कायमचे सुटणार असून मुलुंडच्या या जागेत उद्यान बनविले जाणार आहे. तसेच देवनार आणि कांजुरमार्ग येथे कचर्‍यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. अशा अनेक विकासकामांनी या ईशान्य भागाचा चेहरामोहरा बदलणार असल्याने याचा सामान्य व्यक्तीला खूप फायदा होणार, हे निश्चित आहे. मनोज कोटक यांच्याकडून येथील जनतेला खूप अपेक्षा आहेत. या विकासाच्या आराखड्यावर या संपूर्ण भागाची प्रगती आणि विकास अवलंबून असल्याने उमेदवार मनोज कोटक यांना लोकांच्या मनावर राज्य करण्याची सुवर्णसंधी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

- कविता भोसले

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat