सुप्रजा भाग-९

    दिनांक  23-Apr-2019पहिल्या तीन महिन्यांत गर्भाच्या अवयव निर्मितीवर अधिक भर असतो. विविध अवयव गर्भाच्या शरीरात तयार होत असतात. दुसऱ्या तीन महिन्यांमध्ये अवयवांची निर्मिती पूर्ततेस येते. पहिल्या तीन महिन्यांमध्ये गर्भिणी असल्याचे प्रतीत होत नाही. पण, पाचव्या महिन्यापासून वाढलेला आकार नीट समजतो. चौथ्या ते सहाव्या महिन्यापर्यंत गर्भाशयाची वाढ ओटीपोटात अधिक होते. गर्भाची आकृती खूप वाढत नाही. पण, विविध अवयव जे आधी धूसर असतील ते आता सुस्पष्ट होऊ लागतात.

 

मागील लेखात गर्भधारणेमुळे गर्भिणीत पहिल्या तीन महिन्यांमध्ये होणारे बदल आपण बघितले. दर महिन्यात गर्भाची विशिष्ट वाढ होत असते. पहिल्या तीन महिन्यांत अवयव निर्मितीवर अधिक भर असतो. विविध अवयव गर्भाच्या शरीरात तयार होत असतात. दुसऱ्या तीन महिन्यांमध्ये अवयवांची निर्मिती पूर्ततेस येते. हे विविध अवयव मिळून संस्थाने (Systems) तयार होतात. जसे उदा. Respiratiory System, Circulatory System इ. गर्भाच्या चौथ्या ते सहाव्या महिन्यांमध्ये विविध अवयव पूर्ण तयार होऊन, एकत्र संस्थानांशी संलग्न होऊन कार्यरत होऊ लागतात. एक-एक संस्थानाची संपूर्ण निर्मिती होते व शेवटच्या तीन महिन्यांमध्ये गर्भाची शेवटची वाढ होते, जेणेकरून गर्भाचा जन्म झाल्या क्षणापासून हे विविध अवयव-संस्थाने कार्यरत होऊ शकतील. या सर्व गोष्टी/बदल घडण्यासाठी गर्भाला लागणारी ऊर्जा, जागा (गर्भाशय) आणि पोषण (आहार) हे सर्व गर्भिणीमार्फतच मिळते. पहिल्या तीन महिन्यांत गर्भिणीत जे बदल होतात, त्यातील काही बदल थांबतात, तर काही अजून वाढतात. जसे उलट्या, मळमळ, अरुची इ. लक्षणे कमी होतात. पण, गर्भाशयाचा आकार अधिक वाढतो. पहिल्या तीन महिन्यांमध्ये गर्भिणी असल्याचे प्रतीत होत नाही. पण, पाचव्या महिन्यापासून वाढलेला आकार नीट समजतो. चौथ्या ते सहाव्या महिन्यापर्यंत गर्भाशयाची वाढ ओटीपोटात अधिक होते. गर्भाची आकृती खूप वाढत नाही. पण, विविध अवयव जे आधी धूसर असतील ते आता सुस्पष्ट होऊ लागतात. या तिमाहीमध्ये गर्भिणीचा वर्ण (Skin Tone) dull होतो. तिच्या दोन्ही गालांवर व कपाळावर कृष्णवर्णीय ठिपके/रॅश आल्यासारखे दिसते. याला 'Chloasna' म्हणतात. साधारण चौथ्या महिन्यामध्ये त्वचेवर हे 'हायपर पिगमेंटेशन' येऊ लागते. शरीरातील अंत:स्त्रावांमध्ये झालेल्या बदलांमुळे (Hormonal Changes) हे पिगमेंटेशन येते. बरेचदा प्रसूतीनंतर हे नाहीसे होते. क्वचित प्रसंगी त्याची चिकित्सा करावी लागते.

 

जसे चेहऱ्यावर हे उमटते, तसेच नाभीपासून वर आणि खाली एक काळी रेष उमटते. याला 'Linea Nigra' म्हणतात. काही वेळेस यावर कंड येतो. गर्भाच्या वाढीनुसार गर्भाशय वाढते व याचा परिणाम वरील त्वचेवरही दिसून येतो. त्वचा ही फाकली जाते. अचानक जेव्हा त्वचा फाकते, तेव्हा त्यावर गुलाबी-पांढऱ्या रंगाच्या रेषा दिसू लागतात. यालाच 'स्ट्रेचमार्क्स' म्हणतात. हे व्रण फक्त पोटावरच येत नाहीत, तर नितंब, मांड्या व स्तनांवरही (क्वचित) दिसतात. स्ट्रेचमार्कची सुरुवात विसाव्या आठवड्यापासून होते व जसजसे दिवस जास्त जातात, हे व्रण अधिक खोल व दाट होतात. हे टाळण्याचा एक उत्तम उपाय म्हणजे अभ्यंग होय. दिवस राहिलेत, हे लक्षात आल्यापासून सर्वांगाला तेल लावावे. तेलामुळे त्वचा लवचिक बनते व लवचिक त्वचेवर ताणल्यामुळे व्रण कमी तयार होतात. तसेच खाज येणे, त्वचा कोरडी पडणे, निस्तेज दिसणे असे काही होत नाही. खोबरेल तेल, बदाम तेल, तिळाचे तेल, चंदन बला लाक्षादि तेल इ. पैकी एखादे तेल आवर्जून संपूर्ण अंगाला नियमित लावावे. तसेच वर सांगितलेल्या स्ट्रेचमार्क्सच्या ठिकाणी न चुकता वरीलपैकी एखादे तेल जिरवावे. चौथा महिना संपत येताना स्तनांवरही शिरा ताठरल्यासारख्या दिसू लागतात. स्तन चुच्चुक (Nipple)च्या भोवतालचा भाग अधिक कृष्णवर्णी होतो. हळूहळू स्तनपानासाठी कार्यरत होण्याची ही तयारी दर्शवली जाते. काही वेळेस विशेषत: पहिल्यांदाच गर्भिणी (Primipara) झालेल्या स्त्रीमध्ये स्तनचुच्चुक हे आत गेल्यासारखे दिसतात. या आत ओढल्यासारख्या स्तनचुच्चुकांमुळे प्रसूती झाल्यावर गर्भाला स्तनपान नीट करता येत नाही. यामुळे चौथ्या महिन्यापासून स्तनांना, विशेषतः स्तनचुच्चुकांना तेलाचे मालिश करावे व ते अलगद बाहेर ओढावेत. आत राहिलेले चुच्चुक बाहेर येईपर्यंत हा व्यायाम रोज (अभ्यंग करून घेणे) व नऊ महिने पूर्ण होईपर्यंत करावा. असे न केल्यास जन्मानंतर बाळाला स्तन्य मिळत नाही. प्रसूत झाल्यावर ४८-७२ तासांमध्ये स्तन्यनिर्मिती सुरू होते. स्तन्य असते, पण चुच्चुक आत असल्यामुळे बाळाला ओढता येत नाही व मातेलाही अन्य त्रास सुरू होतो.

 

चौथ्या ते सहाव्या महिन्यात गर्भाची वाढ होते. ते गर्भाशयात गर्भजलामध्ये फिरू लागते. गर्भाच्या हालचाली मातेला जाणवू लागतात. यामुळे पाठीवर झोपणे गर्भिणीला शक्य होत नाही. उजव्या किंवा डाव्या कुशीवर झोपावे लागते. जेवल्या जेवल्या एरवीही लगेच आडवे पडू नये. पण, गर्भिणीने मात्र ते कटाक्षाने पाळावे; अन्यथा अन्न वर-वर आल्यासारखे होते आणि बेचैनी होते. जीव कासावीस होतो. गर्भाच्या वाढीनुसार त्याच्या गरजा दिवसेंदिवस वाढत जातात, तसतसा मातेला आहारात बदल करणे अपेक्षित आहे; अन्यथा गळून जाणे, थकून जाणे, गरगरणे, अशक्तपणा येणे, धडधडणे इ. घडू शकते. शेवटच्या तिमाहीमध्ये वरील लक्षणांमध्ये अधिक वाढ होते. जसे-गर्भाशयाचा आकार अधिक वाढतो. आधी नाभीपर्यंत वाढलेले पोट नाभीच्या वर वाढते. गर्भाच्या हालचाली अधिक ठळक होतात. त्या दृश्यमानही होताना दिसतात आणि अधिक जाणवतात. गर्भिणी लवकर थकते. तिच्या चेहऱ्यावरचे तेज कमी होते. तिची कंबर, पाठ व दोन्ही बाजू दुखतात. चालणे अधिक कठीण होऊ लागते. गर्भिणीला पाठीवर झोपताना त्रास होतो. त्याचबरोबर झोपून लगेच उभे राहिल्यावर गरगरल्यासारखे होते. त्यामुळे झोपून उठल्यावर आधी बसावे (२-४ मिनिटे) व मग उठावे. गर्भाच्या हालचालींमुळे क्वचित प्रसंगी पोटात खड्डा पडल्यासारखा होतो. गर्भिणीला वारंवार पण थोडी थोडी मूत्रप्रवृत्ती होते. याचे कारण मूत्राशयावर पडणारा दाब. तसेच बहुतांश वेळेस मलप्रवृत्ती साफ होत नाही. क्वचित प्रसंगी मलबद्धता/मलावष्टंभही होतो. याचेही कारण गर्भाशयाचा वाढलेला आकार हेच आहे. गर्भिणीचे पाय दुखू शकतात. पाय हे सर्व शरीराचे वजन उचलतात, पेलवतात (Weight Bearing Limbs). गर्भिणीचे संपूर्ण गर्भावस्थेत साधारणतः १० ते १५ किलो वजन वाढते. या अतिरिक्त वजनाचा पायांवर अधिक ताण पडतो. काही वेळेस व्हेरीकोज व्हेन्सचा त्रासही उद्भवू शकतो. हे होऊ नये म्हणून सपाट पादत्राणे वापरावीत. खूप अधिक चालणे टाळावे व पहिल्या महिन्यापासून शेवटच्या महिन्यापर्यंत पायांना रोज तेल चोळावे. या पद्धतीने गर्भिणीत होणारे साधारण बदल आपण पाहिले. पुढील लेखांत गर्भिणीत होणारे सामान्य आजार आणि त्यावर साधे-सोपे उपाय याबद्दल जाणून घेऊयात.

 
 - वैद्य किर्ती देव 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat