स्वमग्नतेवर ‘दिव्यम’चे दिव्यत्व

    दिनांक  23-Apr-2019   
दिव्यम : सेंटर फॉर ऑटिझम’ अंतर्गत स्वमग्न मुलांना त्यांच्या गरजेनुसार, स्वमग्न अनुकूल शिक्षण पद्धतीने त्यांना शैक्षणिक मदत आणि वास्तविक जगाशी जुळवून घेण्यासाठी सहकार्य केले जाते. ‘दिव्यम : सेंटर फॉर ऑटिझम’ चे वेगळेपण म्हणजे एकाच ठिकाणी सगळ्या थेरपी, प्रत्येक स्वमग्न मुलाच्या गरजेनुसार वैयक्तिक सर्वांगीण विकास उपक्रम निदान प्रणाली (उपचार पद्धती) आहेत.

 

एका गोंडस बालकाला घेऊन ते मुस्लीम दाम्पत्य ‘दिव्यम’मध्ये आले. ते बालक एकटक कुठेतरी पाहत होते. त्याला हाक मारली तरी त्याचे लक्ष बिलकुल विचलित होत नव्हते. एका तंद्रीतच होता तो. त्याच्या अम्मीने सांगितले की, “त्याला स्थानिक पातळीवरच्या दवाखान्यात घेऊन गेलो. पण काही फरक पडला नाही. त्याला बाहेरची बाधा असेल म्हणून झाडफूक केली, बाबाबुवांकडे पण नेले. पण दिवसेंदिवस तो आणखी असाच वागायला लागला. त्याला भूतप्रेतीची बाधा आहे, असे वाटते. पण काही लोकांनी इथे एकदा जाऊन बघा म्हणून सांगितले. आमचा मुलगा ठिक होईल ना?” त्या आईच्या डोळ्यात पाणी, आणि वडिलांच्या डोळ्यात चिंता मावत नव्हती.

 

या मुलाची तपासणी केली आणि निदान स्पष्ट झाले की, हा मुलगा स्वमग्नता या आजाराने ग्रस्त आहे. ‘दिव्यम : सेंटर फॉर ऑटिझम’ चे राहूल बल्लाळ सांगत होते. राहुल इथे समुपदेशक आहेत. सेंटरमध्ये येणार्‍या स्वमग्नताग्रस्त मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे समुपदेशन ते करतात. त्यांना निरनिराळ्या प्रशिक्षणाचे तंत्र समजावून देतात. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधून मास्टर ऑफ सोशल वर्क केलेल्या राहुल यांनी विशेष मुलांसाठीचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. या क्षेत्रात काम करण्याचे कारण की, त्यांचे काका बहुविकलांग होते. त्यांची परिस्थिती राहुल यांनी पाहिली होती. बहुविकलांग, मानसिक, शारीरिक अपंगत्व असणार्‍यांसाठी आपण काही तरी करावे, असे त्यांना वाटले आणि म्हणूनच ते या क्षेत्रामध्ये आले.

 

या सेंटरच्या संस्थापिका डॉ. धनश्री विजय पवार, एक सुपरमॉम आहेत. २०१७ साली त्या आणि त्यांचे पती विजय पवार यांनी मिळून मिराडोर फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करून ट्रस्टअंतर्गत दिव्यम ऑटिझम सेंटर सुरू केले. त्याला कारणही खूप हळवे आहे. १० वर्ष त्या बृहन्मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य विभागामध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या. त्यांना जाणवले की, त्यांचा एकलुता एक मुलगा हा इतर मुलांपेक्षा वेगळा आहे. त्याची आकलनशक्ती कमी होती की, तो मंद होता की आणखी काही? पण तो इतर मुलांपेक्षा वेगळा होता. त्यांनी याबाबत मुलांवर उपचार सुरू केले. त्यावेळी कळले की, तो स्वमग्नता या आजाराने ग्रस्त आहे. हा आजार नेमका काय आहे? यावर उपचार काय आहेत? यावर त्या विचार करू लागल्या. यावरचे उपचार विविध स्तरावर होते. डॉ. धनश्री यांना आढळले की, हे विविध उपचार एका छताखाली कुठेही नव्हते.

 

एक उपचार एकीकडे तर दुसरा उपचार दुसरीकडे. तसेच यामध्ये आजारग्रस्तांना विशेष प्रशिक्षण देण्याची गरज असते. मात्र या प्रशिक्षणाचीही हीच गत. एका ठिकाणी प्रशिक्षण मिळण्याची सोय नाही. त्यामुळे स्वमग्न मुलांच्या पालकांची मुलांवर उपचार करताना दमछाक होत असे. वेळ, ऊर्जा आणि पैसे या तिघांचा तर हिशोबच लागत नसे. श्रीमंत पालक तरी आपल्या मुलांवर उपचार करू शकत होते. पण आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या पालकांचे काय? धनश्री विचार करू लागल्या. यातूनच त्यांनी ठरवले की, आपण एक असे सेंटर उभे करायचे, जिथे स्वमग्न मुलांच्या उपचाराच्या आणि प्रशिक्षणाच्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असतील. पण हे सर्व करण्यासाठी त्यांना स्वमग्नतेवर उपचार काय आहेत, याचा परिपूर्ण अभ्यास असणे गरजेचे होते. त्यामुळे डॉ. धनश्री यांनी स्वमग्नता या विषयावर अभ्यास संशोधन करण्यासाठी पूर्ण वेळ दिला. देशात-परदेशात या विषयावर जिथे जे काही असेल तिथे जाऊन अभ्यास केला. या परिपूर्ण परिश्रमानंतर त्यांना स्वमग्नता विकारावर जे उपचार योग्य आणि परिणामकारक वाटले, त्याचे त्यांनी स्वतः प्रशिक्षण घेतले. स्वमग्नतेवरचे डझनभर अभ्यासक्रम, प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यावर स्वतःचे संशोधन केले. त्यातूनच मग ‘दिव्यम : सेंटर फॉर ऑटिझम’ २०१७ साली स्थापन झाले. हे सेंटर स्वमग्न मुलांसाठीच्या उपचाराचे अंतिम केंद्र असेल, या ध्येयाने डॉ. धनश्री २०१२ पासून कामाला लागल्या होत्या. ५ वर्षांनंतर त्यांनी तसे सेंटर उभे केले.

 

या सेंटरचे लायझनिंग ऑफिसर राहुल जैनर सांगतात की, “हे सेंटर कुर्ला या ठिकाणी आहे. सेंटरने करार केला आहे. त्या करारानुसार एम पूर्व वॉर्डातील सर्व अंगणवाड्यांमधील शिक्षिकांना स्वमग्नता या विषयावर मोफत प्रशिक्षण द्यायचे. त्यामुळे त्यांना माहिती होईल की, त्यांच्या अंगणवाडीमध्ये स्वमग्न आजाराने ग्रस्त असलेले एखादे बालक असेल तर त्या बालकासंबंधी त्याच्या पालकांना योग्य त्या सूचना अंगणवाडी सेविका देऊ शकतील. पालकांबरोबरच दिव्यम सेंटरलाही या बालकांबाबत कळवले जाईल. त्यानंतर दिव्यम सेंटरचे प्रशिक्षित प्रतिनिधी त्या बालकाच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना सर्व परिस्थितीची जाणीव करून देतील. त्यावरच्या उपाययोजनांची माहिती देतील. पालकांनी बिलकुल हतबल न होता दिव्यममध्ये मुलांचे उपचार करावे हेही सांगतील. यामध्ये ज्या पालकांची ऐपत आहे, ते शुल्क भरून मुलांवर उपचार करू शकतात, मात्र ज्यांची ऐपत नाही, त्यांच्या बालकांचे उपचार दिव्यम मोफत करते. आतापर्यंत दिव्यमने ३०० अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण दिले आहे. त्या माध्यमातून २३ स्वमग्न मुलांची ओळख पटली आहे. त्यापैकी १० मुलांवर दिव्यममध्ये उपचार सुरू आहेत. राहुल जैनर म्हणतात की, “महानगरपालिकेशीही याबाबत चर्चा सुरू असून, महानगरपालिकेच्या सहकार्याने मुंबई परिसरातील स्वमग्न बालकांच्या उपचारासाठी काहीतरी ठोस कार्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्याप्रमाणे मलेरियाबाबत सर्वांगीण माहिती दिली जाते, त्याप्रमाणे स्वमग्नता विकाराची माहिती सगळीकडे द्यायची, असे नियोजन आहे.

 

स्वमग्नता आजाराची तीव्रता आणि समाजासमोरचे आव्हान किती चिंतादायक आहे, हे समजेल. कारण या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची लक्षणे पाहून आजही समाजातल्या मोठ्या घटकाला वाटते की, हा रुग्ण वेडा आहे. पण हे वेड वगैरे नसून किंवा मतिमंदता नसून एक आजार असतो. ज्यामध्ये रुग्ण भावना व्यक्त करू शकत नाही, हसत किंवा रडत नाही, सतत विचित्र हालचाली करणे, वयोमानानुसार भाषेचा वापर न करणे, दुसर्‍याच्या बोलण्यास प्रतिसाद न देणे, कुठलाही नवीन बदल न स्वीकारणे, कुठेतरी एकटक पाहत स्वतःमध्येच गुंग असणे, असंबंद्ध बोलणे तसेच कुणाशीही संवाद किंवा संपर्क करू शकत नाहीत. या सर्व लक्षणांमुळे सामान्य लोक स्वमग्न रुग्णाला वेडा समजतात. त्यामुळे त्याच्यावर वेळीच योग्य उपचार होत नाहीत. योग्य उपचार न झाल्यामुळे रुग्णाची स्वमग्नता वाढत जाते आणि तो खरोखरच अतिशय विक्षिप्त आणि समाजाच्या दृष्टीने वेड्यासारखा वागू लागतो. माणसाला केवळ शारीरिक व्यंगामुळे नरकासारखे जिणे यावे, यासारखे २१ व्या शतकात दुःखद काही नाही. मात्र, दिव्यम खारीचा वाटा उचलून स्वमग्न मुलांसाठी कार्य करत आहे. त्यांना माणसात आणत आहे. वस्तीपातळीवर स्वमग्नता या विषयावर स्वतःहून उपचारासाठी पुढे सरसावलेल्या ‘दिव्यम : सेंटर फॉर ऑटिझम’ चे महत्त्व मोठे आहे.

 

राहुल जैनर (८१६९१६४४९१)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat