होमियोपॅथीक तपासणी केस टेकिंग भाग-१६

    दिनांक  22-Apr-2019रुग्णाची बोलण्याची पद्धत व वागण्याची पद्धतही रुग्णाची स्वत:ची असते. त्याच्या चैतन्यशक्तीची असते. हीच पद्धत मग रुग्णाची शारीरिक व मानसिक स्थिती जाणून घेण्यासाठी फार महत्त्वाची ठरते.


होमियोपॅथिक तपासणी किंवा केस टेकिंग ही अतिशय सोपी व साधी क्रिया आहे. परंतु, त्याचबरोबर चिकित्सकाची कलात्मकता आणि कौशल्य हे फार महत्त्वाचे असते. समोर बसलेल्या रुग्णाच्या आजाराचे मूळ कारण म्हणजेच केंद्रीय अडथळा जाणून घेण्यासाठी सतत सतर्क राहणे महत्त्वाचे असते. त्याचबरोबर त्या माणसाचा नक्की प्रॉब्लेम काय आहे, त्याची चैतन्यशक्ती कुठल्या पातळीपर्यंत खालावली आहे, हे मुख्यत्वे जाणायचे असते. त्यामुळेच या चैतन्यशक्तीद्वारे दर्शविल्या जाणाऱ्या सर्व लक्षणे व चिन्हांचा अभ्यास गरजेचा असतो.

 

रुग्णामध्ये दिसणारी सर्व लक्षणे व चिन्हे ही एकच प्रकारच्या शारीरिक व मानसिक स्थितीचा परिपाक असतात. शरीराची व मनाची ही स्थिती एक असते व त्यापासून सर्व लक्षणे दिसून येतात. म्हणजेच काय, तर या सर्व लक्षणांच्या जर मुळापर्यंत जायचे असेल तर आपल्याला या मूळ स्थितीचा अभ्यास करणे महत्त्वाचे असते. कारण, लक्षणे शेकड्यांनी असू शकतात. पण, ही लक्षणे निर्माण करणारी माणसाची स्थिती ही एकच असते. यालाच आपण ‘स्टेट ऑफ डिसपोझिशन’ (State Of Disposition) असे म्हणतो. डॉ. हॅनेमान यांनी आपल्या ‘ऑरगॅनॉन ऑफ मेडिसीन’ या ग्रंथात २११ क्रमांकाच्या परिच्छेदात याच स्थितीचे महत्त्व समजावून सांगितले आहे. तसेच परिच्छेद २१२ मध्येसुद्धा रोग होण्याअगोदर व रोग झाल्यानंतर माणसाच्या सर्वसाधारण स्थितीमध्ये जो बदल होतो, त्याबद्दलही भाष्य केले आहे. ही बदललेली स्थिती (State Of Disposition) आजाराचे मूळ असते व माणसाच्या चैतन्यशक्तीने दाखविलेली तडजोड असते. आता केस टेकिंगमध्ये या स्थितीची जाण करून केंद्रीय अडथळा जाणून मग रुग्णाला त्याप्रमाणे औषध दिले जाते. यासाठी काही गोष्टी चिकित्सकाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात व त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निरीक्षण.

 

निरीक्षण शक्ती किंवा सतर्क निरीक्षण करणे, हा चिकित्सकाचा सर्वात महत्त्वाचा गुण समजला जातो आणि प्रत्येक चिकित्सकाने अभ्यासपूर्वक हा गुण जोपासावा व अभ्यास करावा लागतो. ही निरीक्षण शक्ती जेव्हा रुग्ण औषधासाठी वेळ घेतो (Appointment) तेव्हापासूनच चालू होते. रुग्णाची बोलण्याची पद्धत व वागण्याची पद्धतही रुग्णाची स्वत:ची असते. त्याच्या चैतन्यशक्तीची असते. हीच पद्धत मग रुग्णाची शारीरिक व मानसिक स्थिती जाणून घेण्यासाठी फार महत्त्वाची ठरते. परंतु, हे निरीक्षण करताना चिकित्सक हा पूर्वग्रहदूषित नसावा. कुठल्याही पूर्वग्रहावरून त्याने अनुमान काढू नये. पूर्वग्रहदूषित चिकित्सक त्या रुग्णाचे चुकीचे निरीक्षण नोंदवून घेतो व त्यामुळे शेवटी त्या रुग्णाची खरी स्थिती आपल्याला कळून येत नाही. सर्वप्रथम निरीक्षणामध्ये अतिशय बाळबोध व साधी निरीक्षणेही नोंदवून ठेवावी लागतातउदा. रुग्णाची बोलायची पद्धत, रुग्णाची चालण्याची पद्धत व लकबी, रुग्णाची बसण्याची पद्धत, हाताच्या हालचाली, डोळ्यांच्या हालचाली इत्यादी. या प्रकारची निरीक्षणे नोंदवून घेतल्यावर मग या निरीक्षणांचे विश्लेषण करायचे असते. याबाबत पुढे आपण माहिती पाहू.

 

- डॉ. मंदार पाटकर

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat