मुंबईची नालेसफाई गाळात

    दिनांक  22-Apr-2019   
मुंबईतील २६ जुलैचा महापूर (२००५), २९ ऑगस्टची अतिवृष्टी (२०१७) या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेतर्फे पावसाळापूर्व नालेसफाई करण्यात येते. दरवर्षी एप्रिलपासून कामाला सुरुवात होते. यंदा मुंबईची नालेसफाई गाळात असून २० दिवसांत फक्त १० टक्के काम केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. दरवर्षी पालिकेकडून ९० ते ९९ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला जातो. मात्र, अनेकवेळा पहिल्या पावसातच नाले तुंबत असल्याने हा दावा खोटा ठरतो. ३१ मे पर्यंत पावसाळ्यापूर्वी ७० टक्के नालेसफाई करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. एप्रिल महिन्यामध्ये नालेसफाईच्या कामाला सुरुवात होते. आता एप्रिल संपण्यास काही दिवस उरले आहेत. असे असताना ३० ते ३५ टक्के काम या महिन्यात होणे अपेक्षित होते. पण, आतापर्यंत केवळ १० टक्के काम झाले असून अद्याप मुंबईतील नाले गाळातच आहेत. उर्वरित ४० दिवसांमध्ये ६० टक्के काम होईल का? असा सवाल विचारला जात आहे. नालेसफाई, रस्तेकामांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जात असतानाही मुंबईत पहिल्याच पावसात ठिकठिकाणी पाणी तुंबते. सध्या लोकसभा निवडणुकीच्या कामाला पालिकेतील अधिकारी, कर्मचारी गेल्याने नाल्यांची कामे रखडली आहेत. मिठी नदीला मिळालेल्या वांद्रे परिसरातील चामडावाला नाल्याची साफसफाई योग्यप्रकारे झालेली नाही. थोड्या पावसांतही येथील परिसरात पाणी तुंबते. या नाल्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असले तरी तेथील झोपड्या, दुकाने अजूनही हटविण्यात आलेली नाही. या नाल्याचे १.६ किलोमीटर रुंदीकरण केले जाणार आहे. यामध्ये रेल्वेच्या बाजूचे ५०० मीटर काम पूर्ण झाले आहे. हे रुंदीकरण ७ ते १२ मीटरपर्यंत केले जाणार आहे. मात्र, काम रखडल्याने येथे यंदाही पाणी तुंबण्याची समस्या कायम राहणार आहे. मुंबईतील सायन येथील मुख्याध्यापक नाला, पार्ल्यातील इर्ला नाला, तसेच वडाळा, कुर्ला, विद्याविहार, भांडुप आदी ठिकाणी मोठे नाले आहेत. या नाल्यातील गाळ काढला नाही, तर परिसरात पाणी तुंबण्याच्या समस्येला रहिवाशांना सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान यंदा २० दिवसांत पावसापूर्वीची नालेसफाई आतापर्यंत १० टक्केही झाली नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, येत्या १० दिवसांत नालेसफाईच्या कामांना गती येईल, असे सांगितले जात आहे.

 

मुंबईला शुद्ध हवेची गरज

 

दिल्लीनंतर मुंबईतील हवामानही दूषित असल्याचे प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातून नुकतेच समोर आले आहे. मुंबर्ईत प्रदूषणाचे प्रमाण वाढले असून श्वसनाच्या आजारासह विविध व्याधी चाकरमान्यांना जडल्या आहेत. मुंबई पालिकेने ही गंभीर बाब विचारात घेऊन दिल्लीच्या धर्तीवर प्रदूषित भागांचे सर्वेक्षण करून हवा शुद्धीकरण उपकरणे बसविण्यात यावी, अशी मागणी पुढे आली आहे. मुंबई शहरातील वाढत्या प्रदूषित वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम लक्षात घेता, जास्त प्रदूषित असलेल्या भागांमध्ये हवा शुद्धीकरणाची उपकरणे बसवणे आवश्यक आहे. यामुळे प्रदूषित भागांमधील नागरिकांना शुद्ध हवा मिळून त्यांच्या आरोग्यास असलेला धोका टळू शकेल, अशी ठरावाची सूचना नगरसेविका ज्योत्स्ना मेहता यांनी मांडली आहे. मुंबईकरांचे जीवन हे धावपळीचे आहे. वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे यावर उपाययोजना शोधणे सध्या आवश्यक झाले आहे. वातावरणातील प्रदूषण कमी करून लोकांना शुद्ध हवा मिळण्यासाठी दिल्लीसह काही राज्यांमध्ये स्मोक टॉवर बसविण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये ५० फूट उंचावर सिटी क्लिनर नावाने ‘एअर प्युरिफायर‘ उपकरणे बसवण्यात आली आहेत. या उपकरणाची शुद्ध हवा देण्याची क्षमता ९९.९९ टक्के इतकी आहे. या उपकरणाने ३ किलोमीटरपर्यंतचा परिसर व्यापत असून, त्याद्वारे परिसरातील ७५ हजार लोकांना शुद्ध हवा मिळते. २०१८ मध्ये २७९ दिवस मुंबईतील हवा दूषित होती. त्यामध्ये हवेच्या स्तराची ८६ दिवसांची माहितीच नव्हती. त्या तुलनेत २०१७ मध्ये ४५ आणि २०१६ मध्ये ६५ दिवस मुंबईतील हवा चांगली होती, असे दिसून आले आहे. याशिवाय महापालिकेकडे प्रदूषणविषयक दाखल होणाऱ्या तक्रारींमध्येही ३३ टक्यांनी वाढ झाल्याची माहिती फाऊंडेशनच्या हाती लागली आहे, तर मसाला आणि पिठाच्या गिरण्यांच्या माध्यमातून होणाऱ्या प्रदूषणाच्या तक्रारींमध्ये १८ टक्के वाढ झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त तक्रारी या रसायन उत्पादन कंपन्यांमार्फत होणाऱ्या प्रदूषणाच्या आहेत. या प्रदूषणाच्या तक्रारी ५३ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होणार असल्याचे सूचक प्रजाने दर्शवले आहे. मुंबईकरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होणार असल्याने हवा शुद्धीकरणाची उपकरणे बसवायला हवीत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat