उष्णतेचा त्रास आणि सनबर्नवरील प्रथमोपचार

    दिनांक  22-Apr-2019
अधिक काळ घराबाहेर राहिल्यामुळे हिट एक्झॉर्शन आणि सनबर्नचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच या दोन्ही संदर्भात प्रथमोपचाराची माहिती करुन घेणे आवश्यक आहे.


भारतीय हवामान खात्याने नुकतीच उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट असल्याची सूचना दिली आहे. कमाल तापमान ४१ अंशांवर पोहोचले आहे. आता मुंबईकरांनीही या धोकादायक उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी सज्ज व्हायला हवे. सूर्य अगदी डोक्यावर असताना अनेक जण घरातच थांबतात. मात्र, काहींना विविध कामांसाठी बाहेर पडावेच लागते. आता तापमान अधिकच असणार आहे. त्यामुळे, डिहायड्रेशन आणि हिट एक्झॉर्शनसारख्या त्रासांपासून दूर राहायला हवे. यातून उष्माघात होऊ शकतो. वृद्ध नागरिक, लहान मुले, उन्हात काम करणारे कामगार आणि अ‍ॅथलेट्सना हा धोका अधिक असतो. मात्र, काळजी सर्वांनीच घ्यायला हवी. अधिक काळ घराबाहेर राहिल्यामुळे हिट एक्झॉर्शन आणि सनबर्नचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच या दोन्ही संदर्भात प्रथमोपचाराची माहिती करुन घेणे आवश्यक आहे.

 

सनबर्नचा त्रास झाल्यास...

 

> उन्हाने भाजलेल्या त्वचेला थंड कापडाने हळुवार शांत करा किंवा थंड पाण्याचा शॉवर घ्या आणि त्यानंतर त्वचा कोरडी करा. मात्र, हे करताना त्वचेला हळुवार हाताळा. कारण, सनबर्न वेदनादायी असू शकते.

 

> खाजेसाठी अॅलोवेरासारखे लोशन किंवा हायड्रोकोर्टिसोनसारखे क्रीम वापरा. पेट्रोलियम, बेन्झोकेन किंवा लिडोकेन असलेली क्रीम वापरू नका. यामुळे, त्वचेचा दाह अधिक वाढतो.

 

> सनबर्न फारच असेल तर व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट घेऊन त्रास कमी करता येईल.

 

> सनबर्नमुळे शरीर डिहायड्रेट होते. डिहायड्रेशन टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या.

 

> सनबर्न बरा होण्यास काही अवधी जातो. त्यामुळे बाहेर जाताना त्रास झालेला त्वचेचा भाग कपड्यांनी झाकून घ्या.

 

> सनबर्नमुळे फोड आले असतील तर, ताप असेल किंवा थंडी भरली असेल तर डॉक्टरांना भेटा.

 

> डोळ्यांनाही सनबर्नचा धोका असतो. त्यामुळे, डोळ्यांच्या संरक्षणासाठी युव्ही प्रोटेक्शन असलेले सनग्लासेस वापरा.

 

> फोड फोडू नका. त्यात जंतुसंसर्ग होऊ शकतो.

 

हीट एक्झॉर्शनवर प्रथमोपचार

 

> थेट सूर्यप्रकाश टाळून थंड जागेत जा.

 

> अतिरिक्त कपडे काढून टाका आणि त्वचेला अधिकाधिक वारा लागेल, असे पाहा.

 

> थंड पाण्याचा शिडकावा करून संपूर्ण शरीराला थंड करा आणि वारा घालून शरीराचे तापमान कमी करा.

 

> काखेत आणि मानेच्या मागच्या बाजूला आइस पॅक लावा. यामुळे खाज कमी होईल.

 

> हिट एक्झॉर्शनमुळे शरीराचे वाढलेले तापमान कमी करण्यासाठी अ‍ॅस्पिरिनसारखी औषधे घेऊ नका. वाढलेल्या तापमानावरील शरीराची प्रतिक्रिया म्हणून या औषधांचा चुकीचा परिणाम होऊ शकतो. शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी १ ते २ तासांत १ ते २ लीटर पाणी किंवा द्रवपदार्थ घ्या. ही वैद्यकीय आपत्कालीन स्थिती आहे. योग्य उपचार न केल्यास यातून उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. तो जीवघेणाही ठरू शकतो. शरीराचे तापमान ४० अंशांहून अधिक झाल्यास उष्माघाताचा त्रास होतो. अनेक रुग्णांना हायपोटेन्शनचाही त्रास असू शकतो.

 

प्रतिबंधात्मक उपाययोजना

 

> हलके आणि फिक्या रंगाचे कपडे वापरा. गडद रंगांमध्ये उष्णता शोषली जाते. त्यामुळे, तुमच्या शरीराचे तापमान वाढू शकते.

 

> सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत बाहेर पडणे टाळा.

 

> उन्हापासून संरक्षण म्हणून स्कार्फ किंवा टोपीने डोके झाकून घ्या. यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते.

 

> भरपूर पाणी प्या. शरीराला हायड्रेटेड ठेवा. पाण्याची बाटली कायम सोबत बाळगा.

 

> बाहेर तापमान अधिक असेल तेव्हा बाहेरची कामे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी म्हणजेच ऊन काहीसे कमी असताना करा.

 

> बाहेरील तापमान अधिक असताना पोहणे हा चांगला व्यायाम ठरतो.

 

> तापलेल्या, बंद गाडीत बसू नका, अगदी काही वेळासाठीसुद्धा नाही. गाडीतील तापमान चटकन वाढते. लहान मुले आणि प्राण्यांना गाडीत एकटे सोडू नका.

 

> उन्हात बाहेर पडताना ३० किंवा अधिक सन प्रोटेक्शन फॅक्टर (एसपीएफ) चा वापर करून त्वचेचे संरक्षण करा. उन्हात बाहेर पडण्याच्या १५ ते ३० मिनिटे आधी सनस्क्रीन लावावे. शिवाय, त्यानंतर दर तासा-दीड तासाने क्रीम लावावे.

 

- डॉ. फराह इंगळे

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat