सर्वगुणसंपन्न नृत्यगुरू 'सुचेताताई'

    दिनांक  21-Apr-2019नृत्यगुरू, नृत्यदिग्दर्शिका आणि भरतनाट्यम नृत्य कलाकार सुचेता भिडे-चापेकर यांना यंदाचा मानाचा 'मास्टर दीनानाथ पुरस्कार' जाहीर झाला. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या नृत्यकलेचा प्रवास...

 

मराठी अभिजात कलेची उपासना करणाऱ्या ज्येष्ठ नृत्यगुरू, नाट्यदिग्दर्शिका सुचेता भिडे-चापेकर यांना मानाचा 'मास्टर दीनानाथ पुरस्कार' जाहीर करून त्यांच्या कामाची योग्य दखल घेतली गेली. नृत्यकलेची जोपासना करण्यासोबतच तेवढ्याच एकतानतेने आणि जबाबदारीने एक नृत्यगुरू म्हणून नवी पिढी घडविण्यातदेखील अग्रणी असणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी त्या एक आहेत. नृत्यकलेचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सुचेताताईंनी 'कलावर्धिनी' संस्थेची स्थापना करून आयुष्यभर नृत्याचा प्रचार व प्रसार करण्याचे बहुमूल्य कार्य केले. भरतनाट्यम या अभिजात भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकाराची सेवा गेली ५० वर्षे अखंडपणे त्या करीत आल्या आहेत. संगीत नाटकातील त्यांच्या अमूल्य कामगिरीबद्दल त्यांना २००७ साली 'संगीत नाटक अकादमी'ने पुरस्कार देऊन गौरविले होते.

 

६ डिसेंबर, १९४८ रोजी एका सुसंस्कृत आणि प्रतिष्ठित घरात सुचेताताईंचा जन्म झाला. मुळातच ज्या भिडे घराण्यात त्यांचा जन्म झाला तिथे जन्मतःच त्यांना कलेचा वारसा लाभला. त्यांचे पूर्ण बालपण हे मुंबईतच गेले. मुलीची नृत्यातली गती आणि आवड बघून स्वत: चित्रकार असलेल्या वडील विश्वनाथ भिडे यांनी त्यांना नृत्य शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. गुरू पार्वतीकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे 'अरंगेत्रम' १९६३ साली वयाच्या १५व्या वर्षी झाले. पार्वतीकुमारांच्या नृत्य कार्यक्रमातून त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्याचप्रमाणे गुरूंच्या भरतनाट्यम नृत्यातील तंजावर येथील मराठी राजांच्या योगादानाविषयीच्या अभ्यासातही सुचेताताई त्यांच्या साहाय्यक होत्या. त्यानंतर पुढे त्यांनी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून पदवी संपादन केली. दरम्यान, पदवीचे शिक्षण घेत असतानाच देशभर विविध ठिकाणी त्यांचे नृत्याचे कार्यक्रम केले. 'मद्रास म्युझिक अकादमी' येथील त्यांच्या कार्यक्रमाला विशेष पसंती मिळाली. त्यानंतर त्यांना गुरु के. पी. किट्टप्पा यांच्याकडून भरतनाट्यम नृत्यातील प्राचीन रचना आणि कर्नाटक संगीताचे मार्गदर्शन मिळाले. आचार्य पार्वतीकुमार आणि तंजावरचे गुरू के. पी. किट्टप्पा यांच्याकडे नृत्याचे शिक्षण घेऊन पुढे गुरूंच्या मार्गाला स्वत:च्या स्वतंत्र विचारांची जोड देत त्यांनी आपला प्रवास अखंड सुरू ठेवला. लग्नानंतर सुचेताताई भिडे-चापेकर या पुण्यात स्थायिक झाल्या.

 

लग्नानंतरही त्यांची नृत्यसेवा खंडित झाली नाही. सुचेताताईंनी १९८२ साली पहिला विदेश दौरा केला. लंडन, पॅरिस, रोटरडॅम येथील त्यांच्या नृत्य प्रस्तुतीला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. पुढे १९८० च्या दशकात महाराष्ट्रासह उत्तर भारतात त्यांनी अनेक कार्यक्रम केले. या दरम्यान त्यांना असे लक्षात आले की, केवळ भाषेच्या अडचणीमुळे भरतनाट्यमसारख्या सुंदर कलेचा आस्वाद उत्तर भारतीय रसिक घेऊ शकत नाहीत. त्यातूनच मग 'नृत्यगंगा' या अनुपम नृत्यशैलीचा जन्म झाला. १९८२ साली याचा पहिला प्रयोग मुंबईच्या 'नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस' येथे झाला. भरतनाट्यमचे मूळ सौंदर्य कायम राखत हिंदुस्तानी संगीतात हिंदी-मराठी रचना त्यांनी सादर केल्या आणि या त्यांच्या प्रयोगाला समीक्षकांसह रसिकांचीही भरघोस दाद मिळाली. या त्यांच्या अभिनव प्रयोगासाठी त्यांनी तंजावरच्या मराठी राजांच्या रचनांचा सखोल अभ्यास केला आणि त्यात पीएच.डी. संपादित केली. गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ 'नृत्यगंगा' प्रवाही राहिली आहे आणि त्यात शंभरांहून अधिक रचना सादर केल्या जातात. 'नृत्यगंगा' शैलीद्वारे अभिजात नृत्यात मोलाचे योगदान, नर्तनातील शुद्धता, सौष्ठव, सात्त्विक अभिनय आणि मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतून संवाद साधण्याची हातोटी ही त्यांच्या सादरीकरणाची वैशिष्ट्ये आहेत. 'सवाई गंधर्व संगीत महोत्सवा'सारख्या प्रतिष्ठित कार्यक्रमात त्यांनी तीन वेळा नृत्य सादर करण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.

 

नृत्याचे सादरीकरण कसे होते, याहीपेक्षा समोरच्या प्रेक्षकांपर्यंत ते नृत्य, त्यातील संदेशसूत्र कसे पोहोचते, हे अधिक महत्त्वाचे मानणाऱ्या सुचेताताईंचा भर नेहमीच कलेतील आशय समजून घेण्यावर आणि आपल्या नृत्याशी अधिकाधिक एकरूप होण्यावर असतो. नृत्याच्या जोडीलाच चित्रकलेचेदेखील शास्त्रोक्त शिक्षण घेतल्यामुळे या दोन्ही कलांच्या जाणिवेचा संयोग त्यांच्या कलाप्रवासात दिसून येतो. 'कलावर्धिनी' या आपल्या नृत्यशिक्षण संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे त्या नव्या कलाकारांना आपल्या समर्थ मार्गदर्शनाखाली घडवत आहेत. “नृत्यकलेचे व्यवसायात रूपांतर होता कामा नये. ही कला खोलात जाऊन समजून देण्याची जबाबदारी नृत्य शिक्षकांची आहे,” असे त्या आवर्जून सांगतात. अशा वयाच्या सत्तराव्या वर्षीही कलेची अपरिमित सेवा करणाऱ्या सुचेताताईंना त्यांच्या पुढच्या वाटचालींसाठी अखंड शुभेच्छा...!

 
- अभिजित जाधव 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat