पुन्हा एकदा संघ आणि गांधीजी

    दिनांक  20-Apr-2019ग्रामविकास, सेंद्रिय शेती, गोसंवर्धन, सामाजिक समरसता, मातृभाषेत शिक्षण आणि स्वदेशी अर्थव्यवस्था तसेच जीवनशैली या महात्मा गांधीजींच्या प्रिय व आग्रहाच्या क्षेत्रात संघ स्वयंसेवक मन:पूर्वक सक्रिय आहेत. हे वर्ष महात्मा गांधीजींच्या १५०व्या जयंतीचे आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र आदरांजली...


सध्या २०१९च्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. सर्व राजकीय पक्ष आपापल्या संस्कृती व परंपरेनुसार प्रचाराची भाषणेही देत आहेत. एका पक्षाच्या नेत्याने म्हटले की, “या निवडणुकीत जनतेला गांधी किंवा गोडसे यांच्यात निवड करायची आहे.” एक गोष्ट मी पाहिली आहे, जे गांधीजींचे खरे अनुयायी आहेत, ते स्वत:च्या आचरणावर अधिक लक्ष देतात. ते कधी गोडसेचे नावही घेत नाहीत. संघातही गांधीजींची चर्चा तर अनेक वेळा होताना पाहिली आहे. परंतु, गोडसेच्या नावाची चर्चा मी कधी ऐकली नाही. परंतु, स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी गांधीजींच्या नावाचा फायदा घेण्यासाठी, ज्यांच्या आचरणाचा आणि धोरणांचा गांधीजींच्या विचारांशी दूरान्वयानेही काही संबंध दिसत नाही, असे लोक गोडसेचे नाव वारंवार घेताना दिसतात. ते तर उघडउघड असत्य आणि हिंसेचा आश्रय घेणारे तसेच आपल्या स्वार्थासाठी गांधीजींचा उपयोग करणारेच असतात. एका दैनिकाच्या संपादकांनी, जे संघाचे स्वयंसेवकही आहेत, सांगितले की, “आमच्या दैनिकात एका गांधीवादी विचारकाचे लेख प्रकाशित होत आहेत.” त्या संपादकाने पुढे सांगितले की, “त्या गांधीवादी विचारकाने लेख लिहितेवेळी म्हटले की, “संघ आणि गांधीजी यांचे संबंध कसे होते हे मला माहीत आहे, तरीही मी तुम्हाला अज्ञात असलेल्या काही पैलूंवर लिहीन.” हे ऐकून मी त्या संपादकांना विचारले की, “संघ आणि गांधीजींचे संबंध कसे होते, हे त्या विचारकाला खरेच माहीत आहे का?” बरेचदा लोक काहीही माहिती न घेता, अभ्यास न करता आपल्या धारणा बनवून टाकतात. संघाच्या बाबतीत तर विद्वान, अभ्यासक म्हणवून घेणारे अनेक लोक सम्यक् अध्ययन करण्याचे कष्ट न घेताच, सोयीच्या निवडक अभ्यासाच्या आधारावर किंवा एक विशिष्ट दृष्टिकोन समोर ठेवून लिहिलेल्या साहित्याच्या आधारावरच आपली ‘विद्वत्तापूर्ण’ मते व्यक्त करत असतात. परंतु, वास्तवात पाहिले तर या विचारांचा ‘सत्या’शी काहीच संबंध नसतो. महात्मा गांधीजींच्या काही मतांशी तीव्र मतभेद असले तरीही त्यांचे संघाशी संबंध कसे होते, याबाबतीत उपलब्ध माहितीवर नजर टाकली पाहिजे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्धच्या संघर्षात, जनाधाराला व्यापक बनविण्याच्या शुद्ध हेतूने मुसलमानांतील कट्टर आणि जिहादी मानसिकतावाल्या गटासमोर गांधीजींच्या शरणागतीशी असहमत असतानाही, स्वातंत्र्याच्या आंदोलनात सर्वसामान्य लोकांचा सहभाग वाढावा म्हणून त्यांनी चरख्यासारखे सर्वांना सहज उपलब्ध असे अमोघ साधन आणि सत्याग्रहासारखी सहज स्वीकार्य पद्धती दिली, ही त्यांची महानता आहे. ग्रामस्वराज्य, स्वदेशी, गोरक्षा, अस्पृश्यता निर्मूलन इ. अनेक महत्त्वाच्या विषयांबाबत, भारताच्या मूलभूत हिंदू चिंतनाधारित त्यांचे प्रतिपादन व आग्रह, याच्या महत्त्वाला कोणीही नाकारू शकत नाही. त्यांचे स्वत:चे मूल्याधारित जीवन अनेक तरुण-तरुणींना आजीवन व्रतस्थ बनवून समाजाच्या सेवेत लावण्याची प्रेरणा देणारे होते.

 

१९२१चे असहकार आंदोलन आणि १९३० चे सविनय कायदेभंगाचे आंदोलन या दोन्ही सत्याग्रहांमध्ये संघ संस्थापक डॉ. हेडगेवार सहभागी झाले होते. यामुळे त्यांना १९ ऑगस्ट, १९२१ ते १२ जुलै, १९२२ पर्यंत, तसेच २१ जुलै, १९३० ते १४ फेब्रुवारी, १९३१ पर्यंत दोनदा सश्रम तुरुंगावासाची शिक्षाही झाली होती. महात्मा गांधीजींना १८ मार्च, १९२२ ला सहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. तेव्हा त्यांच्या मुक्ततेपर्यंत प्रत्येक महिन्याची १८ तारीख ‘गांधी दिन’ म्हणून पाळली जात होती. १९२२च्या ऑक्टोबर महिन्यात ‘गांधी दिना’च्या निमित्त दिलेल्या भाषणात डॉ. हेडगेवार यांनी म्हटले, “आजचा दिवस अत्यंत पवित्र आहे. महात्माजींसारख्या पुण्यश्लोक पुरुषाच्या जीवनात व्याप्त सद्गुणांचे श्रवण व चिंतन करण्याचा हा दिवस आहे. त्यांचे अनुयायी म्हणवून घेण्यात गौरव अनुभव करणाऱ्यांच्या माथ्यावर तर त्यांच्या या गुणांचे अनुकरण करण्याची विशेष जबाबदारी आहे.” १९३४ साली वर्धा शहरात जमनालाल बजाज यांच्या निवासस्थानी जेव्हा गांधीजींचे वास्तव्य होते, तेव्हा जवळच रा. स्व. संघाचे हिवाळी शिबीर सुरू होते. उत्सुकतावश गांधीजी तिथे गेले. संघ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले आणि स्वयंसेवकांसोबत त्यांची चर्चाही झाली. चर्चेदरम्यान, जेव्हा त्यांना माहीत झाले की, शिबिरात अनुसूचित जातीतलेही स्वयंसेवक आहेत आणि त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता, सर्वजण बंधुभावाने स्नेहपूर्वक सोबतच राहत आहेत, सर्व कार्यक्रम सोबतच करत आहेत, तेव्हा त्यांनी अतिशय समाधान व्यक्त केले होते. स्वातंत्र्यानंतर ज्या वेळी गांधीजींचा निवास दिल्लीतील सफाई कामगारांच्या कॉलनीत होता, तेव्हा समोरच्या मैदानात संघाची शाखा लागायची. सप्टेंबर महिन्यात गांधीजींनी प्रमुख स्वयंसेवकांसोबत चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांना गांधीजींनी संबोधित केले, “काही वर्षांपूर्वी मी वर्धेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका शिबिरात गेलो होतो. त्यावेळी संघ संस्थापक डॉ. हेडगेवार हयात होते. स्वर्गीय जमनालाल बजाज मला शिबिरात घेऊन गेले होते आणि मी त्यांचे कडक अनुशासन, साधेपणा आणि अस्पृश्यतेचे पूर्ण उच्चाटन पाहून अत्यंत प्रभावित झालो होतो. त्यानंतर संघ बराच वाढला आहे. माझे तर नेहमीच म्हणणे असते की, जी कुठली संस्था सेवा आणि आत्मत्यागाच्या आदर्शाने प्रेरित असते, तिची ताकद वाढतच असते. परंतु, खऱ्या अर्थाने उपयोगी पडण्यासाठी, त्यागभावनेसोबत ध्येयाची पवित्रता आणि खऱ्या ज्ञानाचे संयोजन आवश्यक आहे.” हे संबोधन ‘गांधी समग्र वाङ्मया’च्या खंड ८९ मधील पृष्ठ २१५-२१७ वर प्रकाशित आहे.

 

३० जानेवारी, १९४८ला सरसंघचालक श्रीगुरुजी मद्रास येथे एका कार्यक्रमात होते. त्यांना जेव्हा गांधीजींच्या मृत्यूची बातमी कळली, त्यांनी त्वरित पंतप्रधान नेहरू, गृहमंत्री सरदार पटेल आणि गांधीजींचे सुपुत्र देवदास गांधी यांना टेलिग्राम करून स्वत:ची शोकसंवेदना पाठविली. त्यात श्रीगुरुजींनी लिहिले- “प्राणघातक क्रूर हल्ल्यामुळे एका महान विभूतीच्या दु:खद हत्येची बातमी ऐकून मला प्रचंड धक्का बसला. सध्याच्या कठीण परिस्थितीत यामुळे देशाची अपरिमित हानी झाली आहे. अतुलनीय संघटक नाहीसे झाल्यामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढणे आणि जी अधिकची जबाबदारी खांद्यांवर येऊन पडली आहे, ती पूर्ण करण्याचे सामर्थ्य परमेश्वराने आम्हा सर्वांना द्यावे.” गांधीजींप्रति सन्मान म्हणून शोक व्यक्त करण्यासाठी १३ दिवस संघाचे दैनिक कार्य (म्हणजे शाखा) स्थगित करण्याची सूचना त्यांनी देशभरातील स्वयंसेवकांना दिली. दुसऱ्याच दिवशी ३१ जानेवारी, १९४८ ला श्रीगुरुजी यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना सविस्तर पत्र लिहिले. त्यात ते लिहितात-

 

“काल मद्रास येथे ती भयंकर बातमी ऐकली की, कोण्या अविचारी भ्रष्ट-हृदय व्यक्तीने पूज्य महात्माजींवर गोळी झाडून त्या महापुरुषाच्या आकस्मिक अकाली निधनाचे निर्घृण कृत्य केले. हे निंदा-कृत्य जगासमोर आपल्या समाजावर कलंक लावणारे आहे.”

 

ही सर्व माहिती ‘जस्टिस ऑन ट्रायल’ नावाच्या पुस्तकात आणि ‘श्रीगुरुजी समग्र ग्रंथा’त उपलब्ध आहे. ६ ऑक्टोबर, १९६९ ला महात्मा गांधीजींच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्राच्या सांगली येथे गांधीजींच्या प्रतिमेचे अनावरण श्रीगुरुजींच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी श्रीगुरुजींनी म्हटले- “आज एका महत्त्वाच्या आणि पवित्र प्रसंगी आपण सर्व एकत्र आलो आहोत. शंभर वर्षांपूर्वी याच दिवशी सौराष्ट्रात एका बालकाचा जन्म झाला होता. त्या दिवशी अनेक बालकांचा जन्म झाला असेल; परंतु, आम्ही त्यांची जन्मशताब्दी साजरी करत नाही. महात्मा गांधीजींचा जन्म सामान्य व्यक्ती म्हणून झाला. परंतु, ते आपले कर्तव्य आणि अंत:करणातील प्रेम यांच्या बळावर परमश्रेष्ठ पुरुषांच्या श्रेणीपर्यंत पोहोचले. त्यांचे जीवन आपल्या समोर ठेवून, आपल्या जीवनाला आम्ही तसेच घडवायला हवे. त्यांच्या जीवनाचे जितके अधिकाधिक अनुकरण आम्ही करू शकतो, तितके केले पाहिजे.”

 

लोकमान्य टिळकांनंतर महात्मा गांधींनी देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाची सूत्रे सांभाळलीत आणि त्या दिशेने खूप प्रयत्न केलेत. शिक्षित-अशिक्षित स्त्री-पुरुषांमध्ये ही प्रेरणा निर्माण केली की, इंग्रजांचे राज्य हटले पाहिजे, देश स्वतंत्र केला पाहिजे आणि ‘स्व’च्या तंत्राने चालण्यासाठी जे काही मूल्य द्यावे लागेल, ते आम्ही देऊ. महात्मा गांधींनी मातीचे सोने बनविले. सामान्य लोकांमध्ये असामान्यत्व निर्माण केले. या साऱ्या वातावरणामुळे इंग्रजांना जावे लागले. ते म्हणायचे - “मी कट्टर हिंदू आहे. म्हणून केवळ मानवांवरच नाही, तर सर्व जीवमात्रांवरप्रेम करतो.” त्यांच्या जीवनात आणि राजकारणात सत्य व अहिंसेला जे प्राधान्य मिळाले ते कट्टर हिंदुत्वामुळेच मिळाले. ज्या हिंदू धर्माबाबत आपण इतके बोलत असतो, त्याच्या धर्माच्या भवितव्याबाबत त्यांनी ‘फ्युचर ऑफ हिंदुइझम’ नावाने आपल्या अंतर्मनातील विचार व्यक्त केले आहेत. त्यांनी लिहिले आहे- हिंदू धर्म म्हणजे न थांबणारा, आग्रहाने पुढे जाणारा, सत्याच्या शोधाचा मार्ग आहे. आज हा धर्म थकला-थकलासा, पुढे जाण्याची प्रेरणा देण्यास असमर्थ असल्याचे अनुभवास येत आहे. याचे कारण हे की, आम्ही थकलो आहोत. परंतु, धर्म थकलेला नाही. ज्या क्षणी आमचा हा थकवा दूर होईल, त्याच क्षणी हिंदू धर्माचा प्रचंड विस्फोट होईल, जो भूतकाळात कधीही झाला नाही, इतक्या प्रचंड परिमाणात हिंदू धर्म आपल्या प्रभावाने व प्रकाशाने जगात चमकून उठेल.” महात्मा गांधींजीची ही भविष्यवाणी पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. देशाला राजकीय स्वातंत्र्य हवे, आर्थिक स्वातंत्र्य हवे. त्याप्रकारे कोणी कोणाचा अपमान करू शकणार नाही, वेगवेगळ्या पंथाचे, धर्माचे लोक एकमेकांसोबत राहू शकतील, अशाप्रकारचे धार्मिक स्वातंत्र्य हवे. परकीय विचारांच्या दास्यत्वातून आपण मुक्त व्हायला हवे. गांधीजींची हीच शिकवण होती. मी गांधीजींना बरेचदा भेटलो आहे. त्यांच्याशी बरीच चर्चाही केली आहे. त्यांनी जे विचार व्यक्त केले, त्याच्याच अभ्यासावरून मी हे सांगत आहे. म्हणून अंत:करणापासून मला महात्माजींप्रति नितांत आदर आहे.”

 

श्रीगुरुजी म्हणतात, “महात्माजींशी माझी शेवटची भेट १९४७ साली झाली होती. त्या काळात देशाला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे शासनाची धुरा सांभाळत असल्यामुळे नेतेमंडळी आनंदी होती. त्याच काळात दिल्लीत दंगल झाली. मी त्या वेळी शांतता प्रस्थापित करण्याचे काम करत होतो. गृहमंत्री सरदार पटेलही प्रयत्न करीत होते आणि त्या कार्यात त्यांना सफलताही मिळाली. अशा वातावरणात माझी महात्मा गांधीजींशी भेट झाली. महात्माजींनी मला म्हटले, “बघा, हे काय होत आहे?” मी म्हटले, “हे आपले दुर्भाग्य आहे. इंग्रज म्हणायचे की आम्ही गेल्यावर तुम्ही लोक एकमेकांचे गळे कापाल. आज प्रत्यक्षात तेच होत आहे. जगात आमची अप्रतिष्ठा होत आहे. हे थांबवायला हवे.” गांधीजींनी त्या दिवशीच्या प्रार्थनासभेत माझ्या नावाचा उल्लेख गौरवाच्या शब्दांनी करून, माझे विचार लोकांना सांगितले आणि देशाची होत असलेली अप्रतिष्ठा थांबविण्याचे आवाहन केले. त्या महात्म्याच्या तोंडून माझा गौरवपूर्ण उल्लेख झाला, हे माझे सौभाग्य होते. या सर्व संबंधांवरूनच मी सांगतो की, आम्हाला त्यांचे अनुकरण केले पाहिजे.” मी वडोदरा येथे प्रचारक असताना (१९८७-९०) सहसरकार्यवाह यादवराव जोशी यांचे वडोदरा येथे जाहीर व्याख्यान होते. त्यात यादवरावजींनी महात्माजींचाअतिशय गौरवपूर्ण उल्लेख केला. व्याख्यानानंतर संघकार्यालयात एका कार्यकर्त्याने त्यांना विचारले की, “आज तुम्ही महात्मा गांधीजींचा गौरवपूर्ण उल्लेख केला, तो मनापासून केला होता का?” यावर यादवरावजींनी म्हटले की, “मनात नसतानाही नुसते बोलण्यासाठी मी काही राजकीय नेता नाही. जे बोलतो ते मनापासूनच बोलतो.” नंतर त्यांनी समजावले की, “जेव्हा कोण्या व्यक्तीचा आम्ही आदर-सन्मान करतो, याचा अर्थ हा नाही की त्यांच्या सर्व विचारांशी आम्ही सहमत असतो. एका विशिष्ट प्रभावी गुणासाठी आम्ही त्यांचे स्मरण करतो, त्यांना आदर्श मानतो. जसे, पितामह भीष्म यांना आम्ही त्यांच्या कठोर प्रतिज्ञेच्या दृढतेसाठी अवश्य स्मरतो; परंतु राजसभेत द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी ते सर्व अन्याय मूकपणे बघत राहिले. याचे समर्थन आम्ही करू शकत नाही. अशाच प्रकारे कट्टर आणि जिहादी मुस्लीम नेतृत्वाच्या संदर्भात गांधीजींच्या व्यवहाराबाबत तीव्र असहमती असतानाही, स्वातंत्र्य आंदोलनात जनसामान्यांना सहभागी होण्यासाठी त्यांनी दिलेली संधी, स्वातंत्र्यासाठी सामान्य लोकांमध्ये त्यांनी प्रज्वलित केलेली ज्वाला, भारतीय चिंतनावर आधारित त्यांचे अनेक आग्रहाचे विषय, सत्याग्रहाच्या माध्यमातून व्यक्त झालेला जनआक्रोश- हे त्यांचे योगदान निश्चितच प्रशंसनीय आणि प्रेरणादायी आहे.” ही सर्व वस्तुस्थिती लक्षात न घेता, संघ आणि गांधीजींच्या संबंधांवर मत प्रदर्शित करणे असत्य आणि अनुचितच म्हटले पाहिजे. ग्रामविकास, सेंद्रिय शेती, गोसंवर्धन, सामाजिक समरसता, मातृभाषेत शिक्षण आणि स्वदेशी अर्थव्यवस्था तसेच जीवनशैली या महात्मा गांधीजींच्या प्रिय व आग्रहाच्या क्षेत्रात संघ स्वयंसेवक मन:पूर्वक सक्रिय आहेत. हे वर्ष महात्मा गांधीजींच्या १५०व्या जयंतीचे आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र आदरांजली!

 

- डॉ. मनमोहन वैद्य

(लेखक रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाह आहेत.)

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat