पुण्यात जोशी विरुद्ध बापट लढत रंगणार

02 Apr 2019 12:28:18



 

काँग्रेसकडून मोहन जोशी यांना उमेदवारी जाहीर

 

पुणे : काँग्रेस पक्षाचा पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवाराचा चाललेला तिढा अखेर सुटला आहे. काँग्रेसने आपली नववी यादी जाहीर केली, यात मोहन जोशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून हा तिढा चालू होता. काँग्रेसकडून प्रवीण गायकवाड, सुरेखा पुणेकर आदी उमेदवारांची नावे चर्चित होती, यात प्रवीण गायकवाड यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, काँग्रेसने अखेर निष्ठावान मोहन जोशी यांना उमेदवारी जाहीर करत सर्व चर्चाना पूर्णविराम दिला.

 

गिरणी कामगार, पत्रकार ते राजकीय नेता असा मोहन जोशी यांचा प्रवास आहे. जोशी हे काँग्रेसचे १९७२ पासूनचे निष्ठावान कार्यकर्ते मानले जातात. विधान परिषदेचे आमदार, युवक काँग्रेसचे अध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अशी पदे त्यांनी भूषविली आहेत. २०१४ साली त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. उमेदवारी जाहीर झाल्याने जोशी यांनी आनंद व्यक्त केला असून पक्षश्रेष्ठीचे आभार मानले आहेत. दरम्यान, जोशी यांची उमेदवारी जाहीर झाल्याने बापट विरुद्ध जोशी अशी लढत होणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0