जयदीप कवाडे बरळला; स्मृती इराणींवर आक्षेपार्ह विधान

02 Apr 2019 14:56:27


 

 

जयदीप कवाडे याचे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य

 

नागपूर : पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आणि आमदार जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र जयदीप कवाडे याने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. स्मृती इराणी संविधान बदलण्याची भाषा करतात, मात्र संविधान बदलणे हे नवरा बदलण्याइतके सोपे नाही, असे जयदीप म्हणाला. त्याच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रचाराच्या रणधुमाळीत आणखीनच राजकीय वातावरण पेटले आहे.

 

काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांची नागपूरमधील बगडगंज येथे सोमवारी प्रचार सभा पार पडली. या सभेत जयदीप म्हणाला, "ही स्मृती इराणीबाई कपाळावर मोठं कुंकू लावते. आम्ही याबाबत विचारलं असता आम्हाला कोणीतरी सांगितलं, जसे नवरे बदलतात तसंतस कुंकू मोठं होत जातं. ही नरेंद्र मोदीची मंत्री, नितीन गडकरीची मंत्री लोकसभेत बसून संविधान बदलायच्या भाषा करते. तेव्हा याच नाना पटोलेंनी भर लोकसभेत सांगितलं, स्मृती इराणी बाई संविधान बदलणे हे नवरा बदलण्याइतके सोपे नाही."

 

भाषण करताना जयदीप याने स्मृती इराणी यांच्यावर वैयक्तिक टीका केली. यावेळी पटोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. धक्कादायक म्हणजे, भाषण संपल्यानंतर नाना पटोले यांनी जयदीपला शाबासकी दिल्याचे एका व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. यामुळे जयदीप व पटोले यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत असून पटोले अडचणीत येताना दिसत आहेत. तसेच ज्या स्रिया मोठे कुंकू लावतात त्यांचा हा अपमान असल्याच्याही टीका जयदीपवर होऊ लागली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0