भूल गया सब कुछ...

    दिनांक  02-Apr-2019   हम निभायेंगे!’ अरे हो, पण काय निभायेंगे ते तर सांगाल की नाही? ‘हम निभायेंगे’ या वचनात काय, कुठे, केव्हा याबाबत कमालीची गुप्तता आहे. हे कोणते साधेसुधे वाक्य नाही, तर हीच काँग्रेसच्या जाहीरनाम्याची घोषणा आहे. आता अशा अर्धवट घोषणा करण्यात काय सुख मिळते, ते हायकमांडच जाणो. तसेही, गुप्तता राखण्यात काँग्रेस पक्षाचा ‘हात’ कुणीही धरू शकत नाही. कायमच संशय, कायमच द्विधा परिस्थिती यामध्ये काँग्रेसचे राजकारण चांगलेच फुलते. आता हे असे काँग्रेस फुलत असताना जनतेला फूल बनवले जात होते, असे काही लोकम्हणतील. पण म्हणू द्या. असो. ‘हम निभायेंगे’ म्हणजे काय निभायेंगे? हे ज्याने-त्याने आपल्या वकूबानुसार ठरवावे, नेत्यांच्या वाक्यामधून ज्याला जो अर्थ घ्यायचा तो घ्या, अशी वृत्ती पंजाधारी नेतृत्वाची आहे. त्यामुळे विरोधकांनीही ‘हम निभायेंगे’चा अर्थ लावला आहे. विरोधी पक्षाचे कार्यकर्ते ‘हम निभायेंगे’चा अर्थ असाही लावतात की, ‘हम निभायेंगे’ म्हणजे ‘ए’ पासून ‘झेड’पर्यंतच्या इंग्रजी आद्याक्षरांनी सुरू झालेल्या भ्रष्टाचाराचे पालकत्व काँग्रेस निभावेल किंवा ‘गरिबी हटाओ, गरिबी हटाओ’ म्हणत गरिबांचाच घास घेण्याची भूमिका निभावेल? नाही तर मागच्या निवडणुकीत सपाटून पडण्याची मालिका यावेळीही निभावणार? बरं, जाहीरनाम्यात लिहिले आहे की, कर्जाची परतफेड न केलेल्या शेतकर्‍यांवर कायदेशीर कारवाई होणार नाही. पण, कर्ज फेडले नाही तर काही दंड नसेल तर मग कर्ज फेडायची सक्ती तरी का? तसेच काँग्रेसच्या जाहीरनाम्यानुसार सलग तीन वर्षं कोणत्याही परवानगीशिवाय तरुण व्यवसाय करू शकतात. अशी परवानगी काढण्याची गरज नसेल तर समाजशील आणि समाजघातक असे कोणतेही व्यवसाय केले जाऊ शकतात. मग कायदा-सुव्यवस्थेची आणि प्रशासनाची गरजच काय? पण, काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात जनतेला भुलवण्यासाठी या अशा काहीशा अर्धवट घोषणा केल्या आहेत. केलेल्या घोषणा पूर्ण करायच्या की नंतर विसरायच्या, याबाबतचा काँग्रेसचा इतिहास सर्वश्रुत आहे. त्यांचे प्रिंटिंग मिस्टेक झाली, म्हणत आश्वासन नाकारणे तर प्रसिद्धच आहे. त्यामुळे ‘भूल गया सब कुछ, याद नही अब कुछ’ हे गाणे या पक्षाला आवडत असावे, असे लोकांना वाटते. केलेल्या घोषणा हमखास विसरण्याचा विसराळूपणा पक्ष हमखास निभावणार, हे नक्की. त्यामुळे काँग्रेसचे ‘हम निभायेंगे’ याचा दुसरा अर्थ निवडणुकीनंतर आहे, ‘भूल गया सब कुछ...!’


मरावे परी पुतळारूपी उरावे


ही माझी संपत्ती
, ही सरकारची संपत्ती,’ असा आपपरभाव मायावती बहनजींनी बिलकुल बाळगला नाही. ‘जे तुझे ते माझे, माझे काही नाही,’ अशी साधू वृत्ती बाळगत बहनजींनी स्वतःचे पुतळे सरकारी खजिन्यातून उभारले. काही लोकांना याचे वाईट वाटले. पण, बहनजींच्या चेहर्‍यावरची आणि बहनजींच्या पुतळ्यावरची माशीही हलली नाही. का? कारण, बहनजींच्या नावातच ‘माया’ आहे. त्यामुळे पुतळ्याबाबत कुणीही काहीही विचारलेल्या प्रश्नाला मायावती बहनजी ‘माया’च समजतात. आता कुणी म्हणेल, बहनजी जातीय राजकारण करतात. तिलक, तराजू वगैरेंचे धंदे करतात. पण, हे खोटे आहे. मायावती बहनजी या हिंदू विचार दर्शनच्या प्रगाढ साधक आहेत. ‘उड जायेगा हंस अकेला, जग दर्शन का मेला...’ आत्मा नश्वर आहे, शरीर मिथ्या आहे वगैरे.. वगैरे.. दार्शनिक विचार मायावती बहनजींना पटले आहेत. त्यामुळे त्या हिंदू विचारदर्शन प्रणाली स्वीकारत आहेत. तसे नसते तर बहनजींनी आपण शरीर त्यागणार आहोत आणि ते शरीर पंचतत्त्वात विलीन होणार आहे, याची दखल घेत आपले पुतळे उभारले नसते. स्वतःचेच पुतळे स्वतः उभारण्याचे सौभाग्य मायावतींनी प्राप्त करून घेतले. बरं, तसेही मायावती बहनजींचे पुतळे उत्तर प्रदेशातल्या पार्का-पार्कात उभारले जावे, ही तर जनतेची इच्छा, असे दस्तुरखुद्द मायावती बहनजींना वाटते. बरं, जनता तर सोडाच, पण बहुजन समाजवादी पक्षाचे नेते कांशीराम यांचीही म्हणे हीच इच्छा होती, असेही बहनजी म्हणाल्या. पण प्रश्न हा येतो की, जनतेची असो वा कांशीराम यांची, मायावती बहनजींचे पुतळे पाहण्याचे भाग्य काही लोकांना नको असेल तर? उत्तर प्रदेशात मोक्याच्या ठिकाणी मायावती बहनजींनी हत्तीचे पुतळे उभारले आहेत. यावर मायावती बहनजींचे म्हणणे की, “ती केवळ हत्तीची शिल्पे आहेत, त्यांच्या बसपचे चिन्ह नाही.” असू दे. यावर काही लोक म्हणतात की,“हत्ती लक्ष्मीचे वाहन आहे.” लक्ष्मी आणि लक्ष्मीच्या अनुषंगाने येणारे वैभव सध्या हत्तीवर नाही, तर कमळावर विराजमान झाले आहे. बहनजींच्या पुतळ्यांमुळे उत्तर प्रदेशमध्ये बरेच मनोरंजन सुरू आहे. पण, दार्शनिक पातळीवर पोहोचलेल्या बहनजींना याचे काही देणेघेणे नाही. कारण, बहनजींना, ‘मरावे परी पुतळारूपी उरावे‘ चे वेध लागले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat