अंबानी, कोटक यांच्यासारख्या उद्योगपतींच्या जोरावरच काँग्रेस चालते!

19 Apr 2019 19:29:02


शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची टीका

मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकावर सुटाबुटातील सरकार असे आरोप करणार्‍या काँग्रेसचे खरे रूप आता समोर आले आहे. मुकेश अंबानी, उदय कोटक यांच्यासारख्या उद्योगपतींच्या जोरावरच काँग्रेस पक्ष चालत असल्याचे आता स्पष्ट होत आहे,” अशी जोरदार टीका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी केली.

 

माध्यमांशी बोलताना विनोद तावडे म्हणाले की, “दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना उद्योगपती मुकेश अंबानी आणि उद्योगपती उदय कोटक यांनी पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. पण देवरांचे नेते राहुल गांधी म्हणतात की, मोदी सरकार हे अंबानी, अदानी यांचे सरकार आहे. मग काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणतात ते खरे की, मिलिंद देवरा यांच्या सीडी, कॅसेटवर जे दिसतेय ते खरे,” असा सवालही तावडे यांनी केला आहे. “पण यामुळे भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य, गरीब, आदीवासी, मागास, कामगार, मध्यमवर्गीय लोकांच्या पाठिंब्यावर चालणारा पक्ष आहे हे सिद्ध झाले आहे,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

मोदी सरकार भूलथापा मारून सत्तेत आले आहे, अशी टीका करणार्‍या शरद पवार यांच्या विधानाबद्दल बोलताना तावडे यांनी सांगतिले की, “शरद पवार यांनी भूलथापांबद्दल बोलावे हे आश्चर्यच आहे. तसेच गांधी घराण्याचा त्याग तुम्हाला आता आठवतोय,” असे पवारांना उद्देशून तावडे बोलले. “जेव्हा तुम्ही दोन वेळा काँग्रेस सोडली, त्यावेळी तुम्ही गांधी घराण्यासंदर्भात काय काय म्हणाला होतात ते आठवून पाहा,” असा टोलाही त्यांनी मारला.

 

...तर सोनिया आणि राहुलही निवडणूक लढवू शकणार नाहीत!

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी निवडणूक लढवू नये. कारण, त्यांच्या विरुद्ध आरोप असून त्या जामिनावर बाहेर आहेत अशी टीका करणार्‍यांनी काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी हे दोघेसुद्धा जामिनावर बाहेर आहेत, हे ध्यानात ठेवावे. जर जामिनावर असताना निवडणूक लढवायची नसेल, तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी हेसुद्धा त्या न्यायाने निवडणूक लढवू शकत नाहीत,” असे विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0