इस्लामिक देशांमधील आजची स्त्री

    दिनांक  19-Apr-2019   
स्त्रियांना पुन्हा ‘त्या’ अंधार्‍या युगात जायचे नाही. त्यांनी आमची वाद्ये तोडली, संगीतकलेवर बंदी आणली. पण, संगीत, ती कला आमच्या हृदयातून ते काढू शकले नाहीत,” नेगिन खपेलवाक या अफगाण तरुणीचे हे उद्गार. १९९६ साली तालिबान्यांचा अफगाणिस्तानावर क्रूरतेचा अध्याय रंगात आला होता. त्यावेळी नेगिन अजाण वयात होती. पण, १९९६ ते २००१ या काळात तालिबान्यांमुळे अफगाण स्त्रियांसाठी जगणे म्हणजे दुसरे नरकच झाले. शोषित, वंचित, पीडितांच्या सीमा ओलांडून गुलामांपेक्षाही भयंकर जीणे या स्त्रियांच्या नशिबी आले. अफगाणिस्तानमध्ये २१व्या शतकामध्ये तालिबान्यांनी फतवा काढत स्त्रियांना शिक्षणाची संधी नाकारली. शिक्षणाच्या बरोबरीने अभिव्यक्ती आणि मानवी शाश्वत मूल्यांना अभिप्रेत असलेलेसगळे मानवी विश्व महिलांना नाकारले गेले. तालिबान्यांच्या ‘कराल’ कायद्याच्या कचाट्यात अफगाण स्त्री आपण ‘माणूस’आहोत हेच विसरली.

 

माणूस मग स्त्री असो की पुरुष, तो फार काळ तो अमानवी बंधनांमध्ये राहूच शकत नाही. त्याच्या किंवा तिच्या मनात शारीरिक बंदीला सारून स्वातंत्र्याचे आणि बंडाचे स्फुलिंग फुलणारच. तेच आणि तसेच अफगाण स्त्रियांचेही झाले. त्याला कारणीभूत आहे संगीत. भाषेच्या बंधापलीकडे मनाच्या तारा छेडणारी संगीतकला. अफगाणिस्तानाचीही आपली स्वत:ची अशी संगीत साधना आहे. त्या सुरांवर भावनांचे ताल उमटवणारे कितीतरी कलाकार अफगाणिस्तानमध्ये मन मारून जगत होते. पण, ते संगीतप्रेम आतून होते, जे माणूसपणाच्या भावसाधनेतून उमलून आले होते. त्यामुळे जेव्हा तालिबान्यांनी संगीतावर बंदी घातली तेव्हा कितीतरी संगीतप्रेमी आणि कलाकारांचे मन बंड करून उठले. पण, तालिबान्यांच्या क्रूरतेपुढे त्यांच्या बंडाची परिणीती मृत्यूच्या कवेत जाण्यातच झाली.

 

पण, तरीही विद्यार्थी त्यातही विद्यार्थिनी तालिबान्यांच्या मृत्युदंडाच्या विरोधातही बेडर होत संगीतसाधना करतच होत्या. नेगिन आणि अशा कितीतरी विद्यार्थिनी संगीत शिकत होत्या पण, तालिबान्यांनी त्यावर बंदी घातलेली. का? तर म्हणे इस्लाममध्ये तसे काही नसते. ‘सुरा आयात’ आणि बरेच काही असणार्‍या इस्लामला संगीतकलेचे किंवा इतरही कलेचे वावडे का? तसे खरेच वावडे आहे का? यावर तालिबानी चर्चा करण्यास तयार नसतात. किंबहुना, चर्चा करण्यापेक्षा प्रश्न विचारणार्‍या काफिरांची क्रूर हत्या करून त्यांना दोजखमध्ये पाठविण्यामध्ये तालिबान्यांचा अतीव विश्वास. या पार्श्वभूमीवर नेगिनने एक संगीत वाद्यवृंद तयार केला. तिचे असे म्हणणे आहे की, या संगीताच्या माध्यमातून ती शांतीचा संदेश देणार आहे. संगीतकलेच्या माध्यमातून शांती, सुख आणि सुरक्षेची आस अफगाणिस्तानमध्ये निर्माण होईल.

 

तालिबानी क्रूरबंदीनंतरही नेगिनला संगीताची दैवी आसक्ती आहे. जी तिला मरण्याच्या भीतीपासूनही रोखू शकत नाही. माणूस म्हणून मुक्त अभिव्यक्तीची ही शाश्वत परंपरा प्रत्येक माणसामध्ये आहेच. फक्त तशी वेळ आणि संधी आणि परिस्थिती यावी लागते. ती परिस्थिती आज अफगाणिस्तानमध्ये आली आहे. असो. सौदी अरेबियामध्येही काही वेगळे चाललेले नाही. इस्लामच्या नावाने तिथेही महिलांच्या जगण्याला अमानवी मर्यादा आणण्याचे पातक सुरूच आहे. काही वर्षांपूर्वी तिथे महिला चारचाकी वाहनही चालवत नव्हत्या. काही वर्षांपूर्वी महिलांना वाहन चालवण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, या परवानगीआधी ज्या महिलांवर चारचाकी वाहन चालवल्याबद्दल किंवा पुरुष नातेवाईकांशिवाय घराबाहेर पडल्यामुळे सौदी सरकारने गुन्हा दाखल केला होता. त्याचप्रमाणे आठ महिन्यांची गरोदर असलेल्या खदिजा अल हरबी या स्त्रीवादी लेखिकेलाही सौदी अरेबिया सरकारने तुरुंगात डांबले. तिचा गुन्हा काय? तर तिने चारचाकी चालवली म्हणून. त्याचप्रमाणे सोबत कोणी पुरुष नातेवाईक नसतानाही घराबाहेर पडल्या म्हणून ज्या स्त्रियांना सौदी सरकारने तुरुंगात टाकले. त्या स्त्रियांच्या न्यायहक्कासाठी खदिजाने आवाज उठवला. अफगाणिस्तान काय किंवा सौदी अरेबिया काय, पशूपेक्षाहीहीन दर्जा देता स्त्रियांना मानवी हक्क नाकारणार्‍यांची सद्दी संपली आहे. नेगिन आणि खदिजासारख्या असंख्य स्त्रिया तिथे माणूस म्हणून जगण्यासाठी आवाज उठवत आहेत. कपडे कधीही माणसाची ओळख होऊ शकत नाहीत. मात्र, बुरख्याच्या आड माणूस म्हणून अस्तित्व निर्माण करण्यासाठी आज अफगाणी आणि सौदी स्त्रिया जागृत झाल्या आहेत. ही चेतना जगाच्या पाठीवर अमानवी बंधनांत असलेल्या माणसासाठी स्फूर्तीच आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat