सीमोल्लंघन करणारी वैद्यकीय सेवा

    दिनांक  19-Apr-2019   
आरोग्य समस्येशी झगडत असणार्‍या कोणत्याही रुग्णाची शुश्रूषा करणे, हेच एका वैद्यकीय व्यावसायिकाचे कार्य असते आणि त्याने ते करावे, अशी अपेक्षा समाजाची असते. राष्ट्रसीमेचे सीमोल्लंघन करत आपले वैद्यकीय कर्तव्य बजावणारे आणि माणुसकी जोपासणारे डॉक्टर म्हणून नाशिक येथील डॉ. भरत केळकर यांचे कार्य काहीसे वेगळे पण वैद्यकीय व्यवसायातील अनेकांना मार्गदर्शक ठरावे असे आहे१९८४ साली डॉ. भरत केळकर यांनी नाशिक येथे अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून आपल्या वैद्यकीय व्यवसायास सुरुवात केली. मानवता जपणे आणि सचोटीने रुग्णाची शुश्रूषा करणे, याच ध्येयाने ते या क्षेत्रात दाखल झाले.

 

आपला व्यवसाय करत असताना वनवासी कल्याण आश्रमासाठी सुरू असलेले कार्यदेखील त्यांनी चालूच ठेवले होते. मानवीमूल्य आणि सेवाधर्म यांची जोपासना करणारी आणि वैद्यकीय क्षेत्रात आपले योगदान देणारी संस्था जगाच्या पाठीवर कुठे आहे का, याचा शोध ते घेत असत. अशातच ‘डॉक्टर विदाऊट बॉर्डर्स’या संस्थेशी त्यांचा संपर्क आला. या संस्थेला सन १९९९ मध्ये शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या संस्थेच्या माध्यमातून आजमितीस ७० देशांत कार्य केले जात आहे. जेथे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती निर्माण होते किंवा जेथे वैद्यकीय सेवांची उणीव आहे, अशा क्षेत्रात वैद्यकीय सेवा देण्याचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून केले जाते.

 

या संस्थेच्या माध्यमातून रुग्णालय उभारणी करण्यातसुद्धा डॉ. केळकर यांचे योगदान आहे. या संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर सन २०१४ मध्ये सीरिया येथील युद्धजन्य परिस्थितीत तेथील युद्धबाधितांची सेवा करण्यासाठी डॉ. केळकर सीरिया बॉर्डरवर रवाना झाले. इसिसच्या उपद्रवामुळे व्याधीग्रस्त किंवा जखमी झालेल्या नागरिकांना वैद्यकीय सेवा त्या वेळी आवश्यक होत्या. त्यांची पूर्तता करण्याचे कार्य डॉ. केळकर यांनी मानवतेच्या भावनेतून केले. त्यानंतर त्यांनी २०१६ मध्ये येमेन येथे अशाच विदारक परिस्थितीत कार्य करत वैद्यकीय क्षेत्रात मानवतेचा वस्तुपाठ निर्माण केला. त्यानंतर डॉ. केळकर यांनी डिसेंबर- जानेवारी २०१८ मध्ये इसिसची राजधानी असलेल्या मोसूल येथेदेखील कार्य केले. या तीनही ठिकाणी त्यांनी युद्धबाधित नागरिकांची अस्थीविकाराशी संबंधित असणारी शस्त्रक्रिया करण्याचे कार्य केले आहे.

 

या सेवेसाठी संस्था नेमके काय कार्य करते, असे विचारले असता डॉ. केळकर सांगतात की, संबंधित देशाचा व्हिसा प्राप्त करून देण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत असते. तसेच, संबंधित देशात गेल्यावर निवासाची सुविधा ही हॉस्पिटल अथवा ओस पडलेल्या शाळेत करण्यात येत असते. मात्र, मोसूल येथे संपूर्ण शहर बेचिराख झाल्याने डॉ. केळकर यांनी आपला निवास आणि शस्त्रक्रिया या अनेक बंधिस्त कंटेनरमध्ये केल्या असल्याचेदेखील ते सांगतात. संस्थेच्या माध्यमातून सर्व रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सुविधाही मोफत प्रदान करण्यात येत असते. तसेच, या वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी ४० ते 5० स्थानिक डॉक्टर आणि स्टाफ नागरिकांचीच नियुक्ती केली जाते. त्यामुळे अशा विदारक परिस्थितीतदेखील रोजगार उपलब्ध होण्यास मदत होते. या दरम्यान संबंधित सहभागी वैद्यकीय स्टाफला उपचाराचे प्रशिक्षण दिले जाते व परिस्थिती निवळल्यावर संस्था आपले कार्य तेथील सरकारला हस्तांतरित करते.

जागतिक पटलावर चर्चिले गेलेले युद्ध जवळून पाहिलेले डॉ. केळकर युद्धाबाबत बोलताना म्हणतात की, “टोकाच्या परिस्थितीत, युद्ध हे अस्तित्वासाठी आवश्यक आहे. मात्र, युद्ध हा एकमेव पर्याय नाही. सगळ्या युद्धांत कायम निरपराध नागरिकांचाच बळी जात असतो. त्यांचे जीवन उद्ध्वस्त होत असते. त्यामुळे युद्ध नसावे,” असे माझे मत असल्याचेदेखील डॉ. केळकर आवर्जून सांगतात. युद्धबाधित देशात जातानाच्या प्रक्रियेबाबत त्यांना विचारले असता ते सांगतात की, “अशा वेळी तपासणीही खूप कडक होत असते. रुग्णालयावर बॉम्बहल्ला करू नये, असे असतानाही रुग्णालयावर बॉम्ब हल्ला झाल्याची देखील उदाहरणे असल्याचे त्यांनी सांगितले. सुरक्षेची काळजी घेत जात असली तरी, सुरक्षेची खात्री नसल्याचे देखील ते आवर्जून नमूद करतात. राजकीय व्यवस्था, धार्मिक परिप्रेक्ष्य यांच्या पल्याड जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचे कार्य संस्था आणि संस्थेत सहभागी डॉक्टर्स यांच्यामार्फत करण्यात येते, हे विशेष.

 

आपण युद्ध जवळून पाहिले आहे. आपलादेखील काश्मीर प्रश्न आहे. तेथे अशा सुविधा आपणामार्फत देण्याचा काही विचार आहे का?, असे विचारले असता डॉ. केळकर आत्मविश्वासाने सांगतात की, “काश्मीरमध्ये सरकारमार्फत उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा आणि सक्षम सैन्य यांची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे तिथे अशा आपत्कालीन वैद्यकीय सेवा द्याव्यात,अशी स्थिती नाही.”

 

समाजसेवेची इच्छा असणार्‍यांनी काय करावयास हवे, हे सांगताना डॉ. केळकर यांचे विचार अगदीच स्पष्ट आहेत. याबाबत ते सांगतात की, “समाजसेवेची इच्छा असणार्‍या प्रत्येकाने अस्वस्थ करणारे प्रश्न समजून घ्यावे. तसेच, मूल्याधिष्ठित संस्थांच्या संपर्कात येऊन कार्य करणे आवश्यक आहे. तसेच, कोणत्याही सामाजिक कार्याची सुरुवात ही हळुवारपणे करावी. समाजसेवेसाठी पैशापेक्षा वेळ आणि कौशल्य देणे जास्त महत्त्वाचे असल्याचेदेखील डॉ. केळकर आवर्जून नमूद करतात. जेव्हा आपण आपल्याला अस्वस्थ करणार्‍या प्रश्नांसाठी कार्य करून स्वस्थ होतो, असे कार्य म्हणजे समाजसेवा असल्याचे डॉ. केळकर आवर्जून नमूद करतात.

 

समाजसेवेच्या वृक्षाला फळ येत नसते, तर तो वृक्ष हा केवळ मायेची सावली प्रदान करण्याचे काम करत असतो,”अशा शब्दांत डॉ. केळकर हे समाजसेवेचे महत्त्व विशद करतात. वनवासी कल्याण आश्रमाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष हे दायित्व डॉ. केळकर यांच्याकडे आहे. त्यांनी या माध्यमातून आरोग्यरक्षक प्रशिक्षण करत निर्मलवारी ही संकल्पना राबवत निवृत्तीनाथ यात्रेत १२०० ते १5०० मोबाईल शौचालये उभारली. त्यामुळे त्र्यंबकेश्वर नगरीत होणार्‍या रोगांच्या संक्रमणास आळा बसला. यात कल्याण आश्रमाला शासन व प्रशासन यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सामाजिक व्यवसाय असणार्‍या वैद्यकीय क्षेत्रास सीमेपलीकडे जाऊन मानवतेचा स्पर्श करण्याच्या डॉ.केळकर यांच्या कार्यात मुलगा डॉ. सागर व पत्नी डॉ. मृणालिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat