विमाउद्योगात भारी, संजय तारी

18 Apr 2019 21:19:44



गेल्या दोन दशकांत संजय तारी यांनी ‘एसेन्श्युअर फायनान्शियल सोल्युशन्स प्रा. लि.’ च्या माध्यमातून ४० हून अधिक स्वयंरोजगार करणारे तरुण घडवले आहेत. किंबहुना, ४० हून अधिक तरुणांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार दिला. साडेतीन हजारांहून अधिक ग्राहक आज तारींशी जोडले गेले आहेत. ‘मिलियन डॉलर राऊंड टेबल’ हा आर्थिक उद्योगातील एक मानाचा समजला जाणारा बहुमान संजय तारी यांना सातवेळा प्राप्त झाला आहे. सध्या कंपनीची उलाढाल पाच कोटी रुपये एवढी आहे. भविष्यात एक हजारांहून अधिक विमा एजंट घडविणे, हे संजय तारी यांचे ध्येय आहे.

 

जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ हे बोधवाक्य वाचलं की, भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी चटकन डोळ्यासमोर येते. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील एक विश्वसनीय आणि मोठी कंपनी म्हणून एलआयसी जगभर प्रसिद्ध आहे. एलआयसीचे स्वत:चे एजंटचे प्रचंड मोठे जाळे आहे. किंबहुना, एलआयसी ही भारतातील काही लोकांसाठी उत्पन्नाचे दुसरे साधन आहे. याच साधनाचा उपयोग त्या तरुणानेदेखील केला. पाच आकडी पगाराची नोकरी सोडून त्याने स्वत:ला सेवाक्षेत्रात झोकून दिले. लोकांना गुंतवणुकीद्वारे शिक्षित करणे या एका ध्यासापोटी त्याने मेहनत केली. या जोरावर पुढे जाऊन त्याने स्वत:ची आर्थिक सेवाक्षेत्रातील ‘एसेन्श्युअर फायनान्शियल सोल्युशन्स प्रा. लि’ ही कंपनी सुरू केली. या कंपनीची उलाढाल आज कोटी रुपयांची आहे. हा विमा एजंट ते विमा उद्योजक म्हणजे संजय तारी होय.

 

नरहरी आणि हेमलता तारी हे मूळचे गोव्यातील जोडपं. नरहरी तारी पोटापाण्यासाठी मुंबईत आले. एसटी महामंडळात यांत्रिकी विभागात त्यांना नोकरी मिळाली. या जोडप्यांना तीन मुले झाली. त्यातील संजय सर्वांत लहान. जोगेश्वरीच्या इस्माईल युसूफ महाविद्यालयातून त्याने इतिहास विषयातून बीएची पदवी मिळवली. शाळेत शिकत असल्यापासून पेपरची लाईन टाक, दिवाळीत फटाके विक, इतकंच काय तर बाजारात मोबाईल हे उत्पादन नवीन असताना त्याने मोबाईलसुद्धा विकले. अगदी चायनीज खाद्यपदार्थांची गाडीसुद्धा चालवली. जन्मत:च एकप्रकारे उद्योजक घडत होता. फक्त त्याचे स्वरूप निश्चित होत नव्हते. १९८५ ते २००१ अशी १६ वर्षे पेपरलाईन चालवली.

 

१९९७ साली पदवी मिळाल्यानंतर संजयला एका विमा कंपनीत नोकरी मिळाली. तब्बल १० वर्षे तिथे संजयने नोकरी केली. याचदरम्यान संजयचा विवाह झाला. सर्व काही सुरळीत सुरू होतं. संजयचे भाऊ एलआयसी एजंट म्हणून कार्यरत होते. त्यांचे एक मित्र होते. त्यांच्यामुळे संजय सुरुवातीला विम्याचे अर्धवेळ काम करू लागला. हे काम करत असताना संजयला जाणवू लागले की, मध्यमवर्गीय माणूस अडचणीत सापडला की, आर्थिक मदतीसाठी कुणापुढेही हात पसरतो. त्याला गुंतवणुकीचे पर्याय माहीत नसल्याने दुर्दैवाने त्याला स्वाभिमान गहाण टाकावा लागतो. संजयला हे पाहावलं नाही. हे चित्र आपण बदलायचं, असं त्याने मनाशी निश्चित केलं. याच लोकांसाठी आपण काम करायचं. आपल्या संपर्कात असणारा माणूस हा आर्थिकदृष्ट्या हतबल असता कामा नये., या ध्यासापोटी त्याने नोकरी सोडली आणि स्वत:ची स्वतंत्र कंपनी सुरू केली.

 

हाऊसिंग लोन, कार लोन, आरोग्य विमा, आयुर्विमा इत्यादी सेवा संजय तारी ग्राहकांना देऊ लागले. सुरुवातीला जो ग्राहक यायचा, तो परिस्थितीने गांजलेला असायचा. त्याच्या आवश्यकतेनुसार त्यास गुंतवणुकीचे विविध पर्याय देऊन आश्वस्त केले जायचे. परिणामी, अनेक ग्राहक तारींसोबत गुंतवणुकीस तयार व्हायचे. मनमोकळेपणा, व्यावहारिक पारदर्शकता, दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत पाळणे या गुणांमुळे संजय तारी अवघ्या उद्योगविश्वात प्रसिद्ध झाले.

 

गेल्या दोन दशकांत संजय तारी यांनी ‘एसेन्श्युअर फायनान्शियल सोल्युशन्स प्रा. लि.’ च्या माध्यमातून ४० हून अधिक स्वयंरोजगार करणारे तरुण घडवले आहेत. किंबहुना, ४० हून अधिक तरुणांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार दिला. साडेतीन हजारांहून अधिक ग्राहक आज तारींशी जोडले गेले आहेत. ‘मिलियन डॉलर राऊंड टेबलहा आर्थिक उद्योगातील एक मानाचा समजला जाणारा बहुमान संजय तारी यांना सातवेळा प्राप्त झाला आहे. सध्या कंपनीची उलाढाल पाच कोटी रुपये एवढी आहे. भविष्यात एक हजारांहून अधिक विमा एजंट घडविणे, हे संजय तारी यांचे ध्येय आहे.

 

जेवढे सेवाक्षेत्रात ते कार्यरत आहेत, त्यांहून कांकणभर समाजसेवेतदेखील ते सक्रिय आहेत. रोटरी क्लब, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट अशा संस्थेवर ते पदाधिकारी म्हणून सक्रिय आहेत. नुकतीच त्यांना चंदीगढ येथील विद्यापीठाची ‘मास्टर्स इन बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ ही पदव्युत्तर पदवी मिळाली. विमा आणि गुंतवणूक नियोजन हा त्यांचा विषय होता. याच विषयात पी.एचडी मिळविण्याचा त्यांचा मानस आहे. आपल्या उद्योजकीय यशाचे रहस्य काय असे विचारले असता ते उत्तर देतात, “मेहनत आणि जनसंपर्क या जोरावर आपण इथवर पोहोचलो,” असे ते म्हणतात. खरंतर कोणत्याही उद्योजकाला सामाजिक भान असेल तर त्याचा उद्योग चिरकाल टिकतो आणि दिवसेंदिवस वृद्धिंगत होतो. संजय तारी हे अशाच उद्योजकांपैकी एक आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0