मुंबईकर पेंग्विन्सची पालक

    दिनांक  18-Apr-2019पेंग्विनच्या पिंजराबंद अधिवासाविषयी माध्यमांमधून होणारी टीका आणि समाजाचा रोष पोटात घेऊन डॉ. मधुमिता काळे-वझे आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने पेंग्विनच्या देखभालीची जबाबदारी जिद्दीने पार पाडत आहेत.

न्यूझीलंडमध्ये पशुवैद्यकीय शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यादृष्टीने एकाहून एक सरस अशा संधी तिच्यासमोर होत्या. परंतु, भारतामध्ये पशुवैद्यकीय क्षेत्रात चाकोरीबाहेरील काम करण्याचा निर्णय तिने मनाशी पक्का केला होता. परदेशातून परतल्यानंतर भारतात प्रथमच दाखल होणारे काळे कोटधारी हम्बोल्ट पेंग्विनच्या संगोपनाची संधी तिच्यासमोर चालून आली. चोखंदळपणे वेगळ्या वाटा निवडणारी ‘ती’ आज या संधीचे सोनं करताना दिसते. नोकरी म्हणून नाही तर, पशुवैद्यकीय क्षेत्राविषयी असणारी बांधिलकी म्हणून ‘ती’ या कामाकडे पाहते. तिचे नाव डॉ. मधुमिता काळे-वझे म्हणजेच ’पेंग्विनची आई’ !

 

नवी मुंबईतील सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात १ मे, १९९० सालचा मधुमिताचा जन्म. तिचे वडील संजय काळे यांना प्राण्यांविषयी विशेष आवड. त्यामुळेच मधुमिताच्या अंगी बालपणीच प्राणिमात्रांविषयीचा जिव्हाळा आणि कनवाळूपणा रुजला. या पार्श्वभूमीमुळे शैक्षणिक पातळीवर पशुवैद्यकाचे शिक्षण घेण्याचे तिच्या मनी पक्के होते. मात्र, सर्वसामान्य कुटुंबाप्रमाणेच मधुमिताच्या या निर्णयाला नातेवाईकांकडून आढेवेढे घेतले जात होते. सल्ले-शंका उपस्थित केल्या जात होत्या. परंतु, आई-वडिलांच्या पाठबळामुळे आणि बालपणीपासून मनी बाळगलेल्या निश्चयावर ठाम राहून तिने मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला.

 

पशुवैद्यकीय शास्त्रात पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी मधुमिताने तयारी सुरू केली. कारण, प्राण्यांसमवेत राहून, त्यांचे निरीक्षण-संशोधन करून शिक्षण घेण्याकडे तिचा कल होता, जे भारतात राहून करणे शक्य नव्हते. पशुवैद्यकीय शिक्षणात प्राण्यांना हाताळून, त्यांचे निरीक्षण करूनच कामाचा अनुभव प्राप्त होतो, जो परदेशातील पशुवैद्यकीय शिक्षणपद्धतीचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे ’मास्टर्स इन वाइल्डलाईफ हेल्थया विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी मधुमिता दोन वर्षांसाठी न्यूझीलंडला रवाना झाली. २०१४-१५ या कालावधीत तिने मन लावून याचे शिक्षण घेतले. कॅप्टिव्हिटी ब्रिडिंग, बायोस्टॅटिस्टिक आणि संशोधन या गोष्टी तिथल्या पदव्युत्तर पशुवैद्यकीय शिक्षण पद्धतीचा गाभा असल्याचे मधुमिता सांगते. परदेशात मिळवलेल्या प्रत्यक्ष ज्ञानाचा अनुभव मधुमिताला आपल्या देशात अमलात आणायचा होता. त्यासाठी ती भारतात परतली. त्या दरम्यान मुंबईतील भायखळ्याच्या प्राणिसंग्रहालयात हम्बोल्ट पेंग्विन दाखल होणार असल्याची वार्ता तिच्या कानी पडली.

 

न्यूझीलंडमधील शिक्षणादरम्यान तिने नैसर्गिक अधिवासात राहणार्‍या पेंग्विन पक्ष्यांना हाताळून उपचार केले होते. त्यामुळे तिने भायखळा प्राणिसंग्रहालयाकडे अर्ज केला. तिचा अनुभव आणि शिक्षण पाहता हा अर्ज मान्य झाला आणि मधुमितावर आठही पेंग्विनची जबाबदारी आली. मात्र, खरी परीक्षा आता सुरू झाली. हे पेंग्विन पिंजराबंद अधिवासातले असल्याने आणि भारतात पहिल्यांदाच थंड वातावरणातील पक्षी आल्याने त्यांचा अधिवास, आहार, पिंजर्‍यातला वावर आणि वातावरण याबाबत फारच कमी माहिती होती. शिवाय या प्राण्याचा मूळ स्वभाव घाबरट असल्याने पशुवैद्यक म्हणून त्यांच्याशी ओळख निर्माण करण्याचे आव्हान तिच्यासमोर होते. यासाठी मधुमिता आणि तिचे सहकारी दिवसरात्र या पक्ष्यांसोबत वेळ घालवू लागले. आहार, पिंजर्‍यातला वावर यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी परदेशातील प्राणिसंग्रहालयातील पशुवैद्यकांशी संवाद साधला. त्यांचे वेळापत्रक तयार केले.

 

या दरम्यान पहिल्या तीन महिन्यांमध्येच वयाने लहान असणार्‍या एका मादी पेंग्विनचा मृत्यू झाला. जगभरातील प्राणिसंग्रहालयात पिंजराबंद अधिवासात सुरुवातीच्या काळात वातावरणाशी जुळवून घेण्यादरम्यान आणि आजाराची लक्षणे उशिरा दाखविण्याच्या स्वभावामुळे या पक्ष्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र, ही पार्श्वभूमी लक्षात न घेता आपल्याकडील माध्यमांनी पेंग्विनच्या अधिवासाबाबत जोरदार टीका केली. टीकेमुळे खचून न जाता तिने जिद्दीने हे काम हाती घेतले. या पक्ष्यांना मुख्य प्रदर्शन टाकीत हलविल्यानंतर मधुमिता आणि सहकार्‍यांची जबाबदारी आणखी वाढली. पेंग्विनला खेळते ठेवण्यासाठी निरनिराळे खेळ, अंडी देण्यासाठी घरट्यांच्या जागेचे प्रयोजन, पिंजर्‍यातील तापमान, पाण्याची गुणवत्ता, पेंग्विनची दैनंदिन आरोग्य तपासणी अशी अनेक कामे मधुमिता पार पाडतात.


गेल्यावर्षी यातील एक पेंग्विनची जोडी पिल्लाला जन्म देणार असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या जबाबदारीत भर पडली
. मात्र, अंड्यातून बाहेर आलेले पिल्लू जगू शकले नाही. माध्यमातून पुन्हा टीकेची झोड उठली. तेव्हा हे काम सोडून द्यावे, असेही तिच्या मनात आले. मात्र, संकटांना घाबरणे हे मधुमिताच्या स्वभावात नाही. आज अत्यंत मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणे नेहा, गोविंद आणि रणजीत या आपल्या तीन सहकार्‍यांच्या मदतीने मधुमिता पेंग्विन संगोपनाचे काम करत आहे. या संपूर्ण प्रवासात पुण्यात राहणारे तिचे पती वरुण वझे यांची मोलाची साथ तिला मिळत आहे. राणीबागेतल्या आपल्या सातही बाळांची काळजी घेत ती आपल्या पुण्यातील संसारालाही वेळ देत आहे. या सातही बाळांमुळे तिच्या आयुुष्याला प्रसिद्धीचे वलय लाभले आहे. मात्र, नशीबाचा भाग म्हणत याकडे दुर्लक्ष करून सचोटी आणि निःस्वार्थ वृत्तीने ती प्राणी संगोपनाचे काम करत आहे. तिच्या भविष्यातील वाटचालीसाठी दै.‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!

 

 - अक्षय मांडवकर
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat