कट्टर राणे समर्थक कोळंबकर यांचा महायुतीला पाठींबा

    दिनांक  17-Apr-2019
मुंबई : काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार राहुल शेवाळेंना पाठिंबा जाहीर केला. दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. कट्टर राणे समर्थक मानले जाणारे कोळंबकर आता भाजपच्या मार्गावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केल्याने कोळंबकर आणि कॉंग्रेसचे संबंध बिघडले होते. त्यानंतर आता कोळंबकर यांनी थेट युतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी बुधवारी कोळंबकर यांची भेट घेतली.

 

दक्षिण मुंबईत शिवसेनेचे राहुल शेवाळे आणि काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांच्यात थेट लढत आहे. महिन्याभरापूर्वीच कालिदास कोळंबकर त्यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या फलकावरुन चर्चेत आले होते. कोळंबकर यांच्या कार्यालयाबाहेरील फलकावरुन काँग्रेस नेत्यांचे फोटो हटवण्यात आले होते. त्या जागी मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आल्याने चर्चांना उधाण आले होते.

 

कोळंबकर म्हणाले, 'मी काँग्रेसमधून बाहेर पडलो नसून काँग्रेसमधून बाहेर करण्यात आले,' असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांचे आभार मानल्यानंतर विभागातल्या कट आऊटवरुन माझा फोटो काढण्यात आला. मग मी त्यांचे फोटो माझ्या बॅनरवर का लावू, असा प्रश्न त्यांनी विचारला.

 

काळीदास कोळंबकर यांनी त्यांच्या मतदार संघात मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर मार्गी लावलेल्या विकासकामांबाबत आभार मानणारे फलक लावले होते. यामुळे कॉंग्रेसमध्ये नाराजी दिसून आली होती. मात्र, माझ्या मतदार संघातील कामे मार्गी लागल्यानंतर त्यांबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानल्यास गैर काय, अशी भूमिका कोळंबकर यांनी घेतल्याने कॉंग्रेसमध्ये धूसफूस सुरू झाली होती.

 

कोळंबकर यांच्या पाठींब्यामुळे आनंदच : शेवाळे

 

कालिदास कोळंबकर यांनी पाठिंबा दिल्याने शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आनंद व्यक्त केला आहे. कोळंबकर माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. त्यांचा आशीर्वाद आणि सहकार्य मिळाल्याने माझा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat