जेट एअरवेजचे कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत

    दिनांक  17-Apr-2019नवी दिल्ली : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेजचे कर्मचारी आता हे प्रकरण सरकार दरबारी नेण्यासाठी दिल्लीत जंतरमंतर येथे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. जेट एअरवेजला सावरण्यासाठी तातडीने अर्थ सहाय्याची गरज आहे. मात्र, मंगळवारी बॅंकांसह झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने जेट एअरवेज अवघ्या पाच विमानांसह सेवा देत आहे. कंपनीवर आठ हजार कोटींचे कर्ज असल्यामुळे तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतनही झालेले नाही. कोणत्याही क्षणी नोकरी जाईल, अशी भीती जेटच्या कर्मचाऱ्यांना आहे. त्यामुळे आता सरकारने हा प्रश्न सोडवावा या मागणीसाठी दिल्लीतील कर्मचाऱ्यांनी जंतरमंतर मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

२० हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट

जेट एअरवेजने नांगी टाकल्यास एकूण २० हजार कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात येणार आहे. यापूर्वी मुंबईतील कंपनीच्या मुख्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आहे. गेल्या वर्षात कंपनीला ४ हजार २४४ कोटींचा तोटा सहन करावा लागला. जानेवारीपासून कंपनीने वेतन दिलेले नाही.

 

दिवसभरात १० पेक्षा कमी उड्डाण

कंपनीने विमानांचे भाडे भरलेले नाही. कंपनीच्या कर्जदारांनी त्यांच्याकडील हिस्सा विकण्याची सुरुवात केली आहे. देशातील एकेकाळची सर्वात मोठी कंपनी असलेली जेट एअरवेजची १० विमानेही दिवसाला उड्डाण करत नाहीत. कंपनीने सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा यापूर्वीच बंद केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat