बेईमान ऋतूंचे शहर...

    दिनांक  17-Apr-2019

ऋतू नेमके कुणाचे असतात? गावाच्या शिवाराची कनात वर करून ऋतू गावात येतात की शहराच्या सिमेंटने शहारत ते नगरात दाखल होतात? ऋतू नेमके कुणाचे? शहराचे की गावाचे. गावात ऋतूंचा चेहरा वेगळा असतो अन् शहरात वेगळीच अनुभूती देतात मोसम... ज्या शहरांना ऋतू नसतात, त्या शहरांना आभाळाकडे मोकळेपणाने बघता येत नाही. गर्दीतल्या कोपर्याकोपर्यात आभाळाचे तुकडे अस्तित्वाचा शोध घेत विसावलेले असतात. वेल फर्निश्ड फ्लॅटच्या खिडकीतून दिसणारा आभाळाचा तुकडा, गावातून शहरात आलेल्या एखाद्या हळव्या जिवाला गावातल्या स्वच्छंद ऋतूंची आठवण करून देतो. उत्तुंग इमारतींच्या टेरेसवरून दिलेले निरोप गावाकडे पोहोचविणे आताशा ढगांनी बंद केले आहे. शहरांवरून फरफटत वाहताना ढगांमध्येही शहरी मोजकेपणा आलेला आहे. शहरांत ऋतूंचीही खरेदी- विक्री होते आणि मग पॅकेटबंद फ्रोजन ऋतूही ऑनलाईन मागविले जातात आजकाल शहरांत... त्यामुळे ऋतूही शहरांना टाळून निघून जाणे पसंत करतात. बरे, आभाळाकडे बघण्यासाठी हिरव्या झाडांच्या पानांचे डोळे लागतात. फुलांच्या पापण्याआड हे डोळे दडलेले असतात. मुख्य म्हणजे जमिनीचा जामीन नाकारून आभाळाकडे बघता येत नाही. शहराचे तसेही जमिनीशी नाते तुटलेले असते. सिमेंटच्या अच्छादनाखाली शहरांत मातीलाच मूठमाती दिली आहे आणि त्यालाच विकास म्हटले जाते. स्मार्ट शहर सतत भूक शांत करण्यासाठी धडपडत असते आणि अशा अवस्थेत कुणाशी नाते जोडता येत नाही. नाते जोडण्यासाठी गरज संपवावी लागते आणि भूक तर सतत स्वत:शी बांधून ठेवते. म्हणून आजकाल ‘भूक भागविण्याचा कलेशी संबंध जोडणारे’ बंजार्यांचे काफिले शहर टाळून गावाकडे वळतात. कलावंतिणीच्या पायातील चाळांच्या नादी लागून ऋतूही शहरांशी उभा दावा मांडतात.
खरेतर जमीन आणि आकाश जिथे एकत्र येतात, त्या क्षितिजाच्या कनातीखालून ऋतू गावात येतात. ऋतूंच्या स्वागतासाठी गाव सज्ज असते. कधी गावाच्या वाटेवर गुलमोहर आपली फुले पसरवून ठेवतो, तर अमलताशचे सोनेरी झुपके ऋतूंची वाट बघतात. ऋतू यायचेत म्हटले की गावाच्या आभाळाला डोळे फुटतात. आभाळाला अशी ऋतुदेखणी नजर येण्यासाठी गावाची जेवढी जमीन असते, तितकेच गावाचे आभाळ असावे. आता जमीन, पाणी आणि हवाही वाटून देण्याची वचने दिली जातात जाहिरनाम्यात अन् मग ग्रामीण भागातही मतांची टक्केवारी वाढते...
 
 
 
पाऊस आला की गावाच्या आभाळालाही गंध फुटतो. असा आभाळगंध येण्यासाठी आकाश जिवंत असावे लागते. गावाच्या जमिनीप्रमाणे गावाचे आभाळही केवळ जिवंतच असते असे नाही, तर ते जातिवंतही असते. म्हणूनच ऋतूंची वस्ती गावात होण्याआधी आभाळ गाईंच्या डोळ्यांत उतरून जाते. पाखरे मग चोचींवर ढग तोलण्याचा सराव करतात. क्षितिजाच्या कनातीखालून ऋतू येण्याआधी गाव स्वत:त ऋतूंना हवे तसे बदल करून घेते. पावसाळा येण्याआधी नाही का गाईंचे हंबरणेही ओलसर होते! झाडेही बेटी वार्याला कवटाळण्याचा प्रयत्न करतात. असे करताना झाडे मात्र एक काळजी घेतात. पक्ष्यांच्या घरट्यांमधील अंडी पडून फुटणार नाहीत, याकडे झाडांचा कटाक्ष असतो. अशा झाडांच्या सावलीत वाढणारी माणसंही मग तितकीच हळवी होतात. पक्ष्यांची घरटी असलेले झाड ते सहसा तोडत नाहीत. म्हणूनच ऋतू कुठलाही असो, गावाचा झरा मात्र आटत नाही. आता मात्र गावांनीही शहरांची रंगरंगोटी केली आहे आणि गावे बाजारबसवी वाटू लागली आहेत.
शहरांचे मात्र वेगळे असते. शहरात जेवढी जमीन असेल, तेवढे आभाळ नसते. सिमेंटच्या जंगलाने आभाळ गिळून टाकलेले असते. खरेतर ऋतूंचे येणे हे माणसाच्या जगण्याच्या शैलीवर अवलंबून असते. शहरांतील माणसांची जगण्याची शैली साहसी असू शकते, पण संयमी आणि शालीन असणे शक्य नसते. शहरात येताना गावाच्या शिवेवर घोड्याची नाल उलटी ठोकून येतात. तशी पद्धत आहे. पूर्वीचे योद्धे युद्धावर जाताना तसे करायचे. कारण युद्धावरून परत येणे शक्य होईलच, हे त्यांना माहीत नसायचे.
 
 
ऋतू माणसांना हळवे करतात. एकदा गावात ऋतू आले की, उंबरा ओलांडून जाणे तसे कठीण होते. म्हणून भुकेचे संदर्भ डोक्यात घेऊन गाव सोडायचेच असेल, तर ते ऋतूंच्या संधिकाळात सोडावे. कारण शहरात येताना गावातील आपले अन्नपाणी तुटलेले नसते. पण, ज्यांनी जन्माच्या वेळी आपली नाळ माजघरामागील न्हाणीत गाडलेली असते, त्यांनीच आपली रसद तोडलेली असते. अशी रसद तुटली की, पोटाच्या कातडी तंबूची शिवण शाबूत ठेवण्यासाठी शहरात यायचे असते. आपापल्या अस्तित्वाचे अस्वल घेऊन प्रत्येक माणूस शहरात येतो. दरवेशासारखे आपल्या अस्तित्वाचे अस्वल नाचवत शहरात पोटाच्या देव्हार्यातील भूक-देवाची पूजा करतो.
एकदा असे झाले की, थकून कुठेतरी विसाव्यासाठी जायचे असते. शहरात भूक भागतेच असे नाही. पण, प्रत्येक शहर कुठल्याही भुकेल्या आत्मारामाला आश्वासनाच्या आरशात भाकरीचा चंद्र दाखविण्यात वाकबगार असते. विशेष म्हणजे मानवी पाखरांसाठी शहरात सिमेंटची उंचच उंच खुराडी बांधलेली असतात. गावाच्या वेशीवर घोड्याची नाल उलटी टांगून आलेले हे पाखरांचे थवे डोळ्यांवर थकव्याची नीज आणून रात्रभर खुराड्यात मरून जातात. पहाटे जिवंत होतात.
 
  
पहाट म्हणजे यांत्रिक घड्याळाचा गजर. जागही त्याच आवाजाचीच. इथे अस्ताअस्तावर सूर्य उगवत नाही. कारण या शहरात ऋतू नसतात. ऋतू नसतात; कारण पहाट नसते, आकाश नसते. पानांचे डोळे आणि फुलांच्या पापण्या नसतात आणि क्षितिजही नसते. शहरी खुराड्यांच्या खिडकीतून जेवढे आकाश दिसते, त्याला आभाळाचे कुठलेच संदर्भ नसतात. बुढीचे खाटले, शुक्राची चांदणी, पावसापूर्वी गारवा आलेला ढग, अस्ताच्या सूर्याच्या डोळ्यांमधील मस्तीची नशा, संध्याकाळच्या सावल्या, अंगावरील शेवंतीचा सुगंध असे काहीच नसते. खुराड्यातल्या या आभाळाला उगवती आणि मावळतीचे रंगही नसतात. असे रंग असायला आभाळाची पाटी कोरी असावी लागते. शहराच्या या आभाळात मानवी पाखरांच्या भुकेचे ढग दाटलेले असतात. शहरात आलेली ही पाखरे, मग काही दिवसांनी आभाळाकडे बघू शकणारे ऋतुपूर्ण डोळेही गमावून बसतात. डोळ्यांत आभाळ साठवणारे डोळे आणि लचकदार जास्वंदी फांदीवर स्नेहाची नक्षी कोरणार्या चोेची गमावलेल्या या शहरी पाखरांची दखल ऋतू घेत नाहीत. या पाखरांना ऋतूवेगळे शहर जे दाखवील तेच दिसते. खुराड्यातून दिसणार्या आभाळात एखादवेळेस दुरून जाणारे विमान, एखाद्या इंडस्ट्रीचा शेवाळलेला धूर आणि आपल्या डोळ्यांतून बाहेर पडलेल्या स्वप्नांचा पूर याशिवाय काहीच दिसत नाही.
या शहराला त्याचे पाळण्यातले नाव नसते आणि ज्या शहराला पाळण्यातले नाव नसते, तिथे ऋतू येत नाहीत. ऋतूंना तिथे जाताच येत नाही. मग हे विनाऋतूंचे शहर ऋतूवेगळे होते. या ऋतूवेगळ्या शहरात उन्हाळा येत नाही, ऊन येते. हिवाळा येत नाही, थंडी येते. पावसाळा येत नाही, पाऊस मात्र येतो. हा पाऊस आभाळातून आला की, कुणाच्या डोळ्यांतून कोसळला हे कळत नाही. ते माहीत करून घेण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही. कुणाकडे तेवढा वेळही नसतो. या ऋतूवेगळ्या घडामोडींना ऋतूंचे संदर्भ नसतातच. ऋतूवेगळ्या पावसाला बेडकांच्या बडबडीची माहिती नसते. जमिनीत राबताना तुडविणार्या पायांचे श्रमही ठाऊक नसतात. आषाढाने मोडलेल्या मौनाचीही त्याला जाणीव नसते आणि सगळ्यात भीषण म्हणजे या पावसाला हिरवेपणाची ओढ नसते. उन्हाला कोकिळेचा कंठ नसतो आणि मोहोराचा गंधही नसतो. थंडी गुलाबी मस्तीची साय पांघरून येत नाही. असे विनाजाणिवांचे मोसम शहरात येऊन जातात. ऋतू येत नाहीत; तरीही गावातून परागंदा झालेली पाखरे मात्र शहरातल्या या बेभरवशाच्या, निस्तेज मोसमांनाच ऋतू समजतात. गावाने रसद तोडली असल्याने शहरातल्या फसव्या मोसमांना आपलेसे करणे, असे अनिवार्य होऊन जाते. ऋतूवेगळे शहर मग पाखरांचे प्राक्तन होते...