कथा भ्रमाची (उत्तरार्ध)

    दिनांक  17-Apr-2019


ज्याच्या ठिकाणी भ्रम नसतो, त्याला ‘महापुरुष’ म्हणून ओळखता येते, असे समर्थांचे मत आहे.
‘भ्रम नसेल तयासी। मनी ओळखावे तयासी। महापुरुष।’ या जगात दिसणारे त्रिगुण आणि पंचमहाभूते हे नाशवंत असल्याने सर्व भ्रमरूप आहेत. प्रापंचिक भ्रमाचे जे प्रकार समर्थांनी ‘भ्रम निरूपण’ या समासातून सांगितले आहेत, त्यापैकी काही भ्रमांचा विचार आपण मागील लेखात केला. आता आणखी भ्रमाचे प्रकार पुढे दिले आहेत.

 

अविवेकी वर्तन : एखादी घटना किंवा गुण चांगले का असेना, पण त्याचा अमर्याद अविवेकी वापर केल्यास त्याचे दुष्परिणाम दिसतात. अविवेकी चांगुलपणा हा मूर्खपणा ठरतो. यासाठी प्रपंचात व परमार्थात विवेकाला असाधारण महत्त्व आहे. अविवेकी वागण्यातून अनेक भ्रम निर्माण होतात. अहंकार किंवा गर्व यांचा संयमित वापर व्यवहारात असावा लागतो. पण, त्याचा अतिरेक झाल्यास त्यापासून अनर्थ घडतात. काहींना आपल्या कर्मठपणाचा, सनातनी असल्याचा अभिमान असतो. त्यात विवेक राहिला नाही, तर त्यातून ज्ञानाचा तिटकारा उत्पन्न होतो. तसेच आपण ज्ञानी असल्याचा गर्व झाल्यास त्यातून आचरणातील शुद्धाशुद्धता, कर्माचा विधिनिषेध यांचे भान राहत नाही. असा मनुष्य अंतर्बाह्य शुचितेकडे दुर्लक्ष करतो. हे सारे भ्रम आहेत, असे स्वामींनी म्हटले आहे. विलक्षण अहंकाराने विवेक दूर राहून ‘मीच तेवढा शहाणा, मला कोणी शिकवू नका,’ असे भ्रम निर्माण होतात. ही भ्रमिष्ट माणसे हे भ्रम सारखे पसरवीत असतात.

 

वृथाभिमान ताठा : अहंकारी पुरुषांच्या ठिकाणी न्याय्य काय आणि अन्याय्य काय याचे भान राहत नाही. गर्वामुळे प्रत्येक बाबतीत चांगले-वाईट हा विचार न करता तो लगेच खवळून उठतो. ‘देहरूपी मी आणि माझे मत’ या पलीकडे त्याला विचारच करता येत नाही. हा भ्रमाचाच प्रकार आहे. तो म्हणतो, ‘मी सुंदर, मी ताकदवान, मी चतुर, मी बुद्धिमान, माझ्यासारखा फक्त मीच.’ असल्या वृथाभिमानातून भ्रमाची निर्मिती होते. अर्थात, असल्या भ्रमाने त्या व्यक्तीचेच नुकसान होते. याची अनेक उदाहरणे समर्थांनी या समासात दिली आहेत. त्यापैकी काही ठळक उदाहरणे पाहू. अनेकांना आपल्या जातीचा अभिमान असतो. ‘माझी जात ही सर्वात श्रेष्ठ आहे. समाजातील इतर सर्व जाती माझ्या जातीपुढे उभ्या राहू शकत नाही.’ बरं एखाद्या जातीचे श्रेष्ठत्व मान्य करावे, तर त्याच जातीत गोत्राच्या श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या गोष्टी ऐकायला मिळतात. प्रत्येकजण ‘माझेच गोत्र श्रेष्ठ’ असे मानत असतो.

 

अर्थात, जर कोणी म्हणत असेल की, ‘माझी जात श्रेष्ठ, माझे गोत्र श्रेष्ठ’ तर ते सारे भ्रम आहेत, हे श्रोत्यांनी ध्यानात घ्यावे. वृथाभिमानाच्या ताठ्याचा हा प्रकार गोत्रापाशी थांबतो असे नाही. कारण, एका गोत्रात तरी एकवाक्यता कोठे असते? गोत्रात कुलाभिमान डोके वर काढतो. ‘आमचे कूळ श्रेष्ठ’ असे प्रत्येकजण आपल्या गोत्रात सांगत सुटतो. इथे पुन्हा कुळाबरोबर आपल्या आडनावाचा अभिमान सांगत एकाच गोत्रात, कुळात श्रेष्ठ-कनिष्ठता दाखवण्याचा प्रकारसुद्धा होतो. हे सारे भ्रम आहेत आणि या भ्रमाला अंत नाही, असे स्वामी म्हणतात. पुढे जेव्हा सार्‍यांतून मनुष्य वैयक्तिक पातळीवर पोहोचतो तेव्हा माणूस आपल्या ज्ञानाबद्दल आपल्या मोक्ष कल्पनेबद्दल, पाप-पुण्याबद्दल आग्रही बनतो. तेथेही तो श्रेष्ठ कनिष्ठता पाहू लागतो. हे सारे भ्रम आहेत हे शहाण्या माणसाने ध्यानात घ्यावे, रामदासस्वामी हे थोडक्यात सांगतात-

 

देहाभिमान कर्माभिमान । जात्याभिमान कुळाभिमान ।

ज्ञानाभिमान मोक्षाभिमान ।

या नाव भ्रम ॥ (१०.६.२९)

 

समाजात वावरताना आपल्या अव्यावहारिक वागण्यातून अनेक भ्रम निर्माण होतातअव्यावहारिक वर्तन : व्यवहारात म्हणजेच प्रपंचात तारतम्य बाळगून वागावे लागते. एखादी गोष्ट प्रचित नसताही चालू ठेवणे हा भ्रमच आहे. स्वामी यासंबंधी दोन उदाहरणे सांगतात. एक म्हणजे ‘प्रचितीवीण औषध घेणे’ आणि दुसरे म्हणजे ‘प्रचिती नसता पथ्यपाणी चालू ठेवणे.’ जर एखाद्या औषधाचा परिणाम दिसत नसेल, त्या औषधाने प्रकृतीस्वास्थ्यात फरक वाटत नसेल तरी, ते औषध चालू ठेवणे हा भ्रमिष्टपणाच आहे. तसेच वैद्याने सांगितलेले पथ्य करूनदेखील रोग हटत नसेल, स्वास्थ्यात बदल होत नसेल, तर ते पथ्य हा एक भ्रमच समजावा. अज्ञानी माणसांच्या ठिकाणी असे अनेक भ्रम पाहायला मिळतात. स्वामींनी त्याची थोडीच उदाहरणे दिली आहेत.

 

उदंड भ्रम विस्तारला ।

अज्ञानजनीं पैसावला ।

अल्पसंकेते बोलिला ।

कळावया कारणे ॥

 

हे वेगवेगळे भ्रम सर्व लोकात मोठ्या प्रमाणावर पसरले आहेत, त्याला सीमा नाही. ही सारी भ्रमाची प्रापंचिक उदाहरणे लोकांसमोर स्पष्टपणे मांडण्यात समर्थांचा उद्देश असा आहे की, आपल्याला दिसते एक, पण सत्य त्याहून कितीतरी वेगळे असते, ते सत्य विवेकाने समजते. या भ्रमांना जाणून, त्यांना दूर सारून परब्रह्माचा अतींद्रिय अनुभव घेणे शक्य आहे. म्हणून हे भ्रम ओळखणे महत्त्वाचे ठरते. भ्रमाची ही वेगवेगळी उदाहरणे सांगताना स्वामी आपली उत्सुकता वाढवीत नेतात. म्हणून स्वामींनी त्याला ‘कथा भ्रमाची’ असे संबोधले आहे. ‘इतुकेन हे समाप्त जाली । कथा भ्रमाची ॥’ असे सांगून त्यांनी या समासाची सांगता केली आहे. आपण या सृष्टीभ्रमाला बाजूला सारून अविनाशी परब्रह्माची ओळख करून घ्यावी, असे स्वामींना सुचवायचे आहे. परब्रह्म हे पूर्वी होते, आता आहे, कल्पांतानंतरही असेच राहणार आहे. त्यात विकार संभवत नाही. अष्टधा प्रकृती प्रलयकाली नष्ट होणार, असे शास्त्र सांगते. या अशाश्वत सृष्टीच्या आधारावर आपण सत्यासत्यतेची गणिते मांडत होतो किंवा ज्या कल्पना करीत होतो, ते सारे भ्रम आहेत हे विवेकाने समजते. कल्पान्त होईल तेव्हा त्रिगुण, पंचमहाभूते व त्यावर आधारीत कल्पना नष्ट होणार हे खरे आहे.

 

हे सर्व ऐकल्यानंतर शिष्यांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या असतील. हे सर्व जर अशाश्वत आहे, प्रलयकाली नाश पावणार आहे, तर आपला ईश्वरभाव, आपली उपासना यांना काय म्हणायचे? शिष्यांच्या या शंका जाणून स्वामी काहीसे चिडून म्हणाले असावे की, “नीट विचार केला तर ‘मी’ व ‘तू’ हा भाव, माझी उपासना पद्धत, माझा ईश्वरभाव हे सारेच भ्रम आहेत.”

 

मी तू हा भ्रम । उपासनाही भ्रम ।

ईश्वरभाव हाही भ्रम । निश्चयेसी ॥ (१०.६.११)

 

स्वामींनी आपली उपासना, ईश्वरभाव यांनाही ‘भ्रम’ म्हटले आहे. हे न पटणारे आहे असे अनेकांना वाटेल. स्वामींच्या अंगी स्पष्टवक्तेपणा असल्याने त्यांनी आपली उपासना, ईश्वरभाव यांनाही भ्रमात समाविष्ट केले. तसे पाहिले, तर स्वामींनी स्वतः रामाची उपासना केली. गायत्री पुरश्चरण करून टाकळी मुक्कामी गायत्रीची उपासना केली आहे. इतकेच कशाला स्वामींनी दासबोधात उपासनेसंबंधी गौरवोद्गार काढलेले आहेत.

 

नाही उपासनेचा आधार ।

तो परमार्थ निराधार ।

कर्मेवीण अनाचार । भ्रष्ट होती ॥ (दा. ५.२.५१)

ज्या परमार्थाला उपासनेचा आधार नाही, तो परमार्थ काय कामाचा? कर्माची शिस्त सुटली, तर अनाचार स्वैराचार वाढून लोक भ्रष्ट होतील. स्वामी पुढे असेही म्हणतात-

 

आचार उपासना सोडिती ।

ते भ्रष्ट अभक्त दिसती ।

जळो तयांची महंती । कोण पुसे ॥ (दा. ५.२.५६)

 

‘गुरूलक्षण’नाम समासात जे परमार्थ पुढारी उपासना टाकतात, त्यांना ‘भ्रष्ट’ ठरवून ‘त्यांच्या गुरूपणाला आग लागो’ असे स्वामी म्हणाले. याचा अर्थ स्वामी उपासनेला महत्त्व देतात. मग असे असताना स्वामी उपासना व ईश्वरभाव यांना ‘भ्रम’ का म्हणाले असतील, याचा विचार केला पाहिजे. ‘भ्रम’ सांगताना श्रोते ‘माझी उपासना,’ ‘माझा ईश्वरभाव’ असे म्हणाले असावेत. त्यात एक प्रकारचा सूक्ष्म अहंकार आहे. म्हणून स्वामी म्हणाले, ते भ्रम आहेत. विवेकाच्या साहाय्याने परब्रह्माची ओळख होईपर्यंत उपासना, ईश्वरभाव यांची भक्ताला आवश्यकता असते. भ्रमाच्या कथेचा सारा खटाटोप दृश्यातील फोलपणा बाजूला सारून अतींद्रिय परब्रह्माचा अनुभव यावा यासाठी आहे. समर्थ या प्रक्रियेला ‘विवेक प्रलय’ असे नाव देतात. (विवेक प्रलये पाहो जाता । शाश्वत कोण हे तत्त्वता । उमजो लागे ॥ १७.३.२९) दासबोधाचे थोर अभ्यासक प्रा. के. वि. बेलसरे म्हणतात, “सबंध दासबोध हा ग्रंथच मुळी विवेकप्रलय कसा करावा हे आपल्याला शिकवित असतो.”

 

- सुरेश जाखडी

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat