रात्रीचे युद्ध!

    दिनांक  17-Apr-2019अर्जुनाने जयद्रथावरती पाशुपतास्त्र सोडले होते. ते परत घेण्यासाठी मंत्र म्हटला आणि पाशुपतास्त्र मागे आले. कृष्णाने रथातून उतरून अर्जुनाला कवेत घेतले. अर्जुनाचे प्राण वाचले म्हणून त्याच्या मनावरील खूप मोठे ओझे उतरले होते.

इकडे कौरव सैन्यात दु:खाची लाट पसरली. जयद्रथाला वाचवू शकला नाही म्हणून दुर्योधनाचेडोळे शरमेने भरून आले. भीमाने मोठ्या आवाजात विजयाची आरोळी दिली, ज्यामुळे अनेकांचे कान दडपले. युधिष्ठिराला ‘देवदत्त’ आणि ‘पाञ्चजन्य’ या दोन्ही शंखांचा आवाज ऐकू आला. त्यामुळे अर्जुन विजयी झाल्याचे त्याला समजले. कृष्णाच्या पायांवर डोके ठेवून अर्जुन म्हणाला, “कृष्णा, तुझ्यामुळेच मी आज वाचलो. तुझ्या कृपेने मी माझ्या पुत्राच्या वधाचा बदला घेऊ शकलो. या सर्व पाप्यांचा नाश आता जवळ आला आहे आणि युधिष्ठिराचे या जगावर राज्य होईल, यात आता शंकाच नाही. तूच सत्याचा विजय घडवून आणशील!”

 

कृष्ण प्रसन्नतेने हसला आणि म्हणाला, “अर्जुना, आज तुझा आणि सात्यकीचा दिवस होता. तुम्ही दोघांनी खूप संहार केला. तुझ्यापेक्षाही सात्यकी अधिक प्रभावी ठरला. तुम्ही दोघांनी मिळून सात अक्षौहिणी सैन्य ठार केले आहे. तुमचा पराक्रम अतुलनीय आहे.” ते दोघेही युधिष्ठिराकडे ही वार्ता देण्यास निघाले. वाटेत कृष्ण म्हणाला,“अर्जुना, मी तुला जयद्रथाचे मस्तक त्याच्या पित्याच्या मांडीवरती पाड असे का सांगितले, तर त्याचे कारण सांगतो. त्याचा पिता बृहतक्षात्र याने भरपूर तप करून जयद्रथाला पुत्र म्हणून प्राप्त करून घेतले. कोणत्याही माणसाकडून कुठल्याही शस्त्राने त्याला मरण येणार नाही, असा वरसुद्धा प्राप्त केला. इतकेच नाही, तर आणखी तपश्चर्या करून असा वर घेतला की, जो या जयद्रथाचे डोके भूमीवरती टाकेल, त्याच्याच डोक्याची हजारो शकले होऊन भूमीवरती विखरून पडतील. म्हणूनच मी तुला त्याचे मस्तक त्याच्या पित्याच्याच मांडीवर पाड असे सांगितले. ज्यामुळे जयद्रथ आणि त्याचा पिता दोघेही नष्ट झाले. तो उभा राहताच त्याच्या हातून जयद्रथाचे शिर भूमीवर पडले आणि त्याच्या डोक्याची पण शकले होऊन विखरून पडली!”

 

ते युधिष्ठिराकडे पोहोचताच युधिष्ठिराने अधीर होऊन रथातून उडी मारली आणि अर्जुनाला करकचून मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यांमधून आनंदाश्रू वाहू लागले. युधिष्ठिर म्हणाला,“अर्जुना, कृष्णा, तुम्ही दोघेही जीवंत आहात म्हणून त्या परमेश्वराचे कोटी कोटी आभार!” त्याने सात्यकी आणि भीम यांनाही आलिंगन दिले आणि म्हणाला, “कृष्णा, केवळ तुझ्यामुळेच हे शक्य झाले. पण, कृष्ण म्हणाला, “नाही युधिष्ठिरा, हे केवळ तुझ्या क्रोधामुळेच घडू शकले. जेव्हा सज्जनांना क्रोध अनावर होतो, तेव्हा असे चमत्कार घडतात. या जगात सर्वांहून शक्तिमान असा फक्त सज्जनांचा क्रोध आहे. तो मानवी शक्तीपलीकडचा आहे.”

 

इकडे दुर्योधनाला कळून चुकले की,अर्जुन हा अजिंक्य आहे. त्याला भीष्म, द्रोण, विदुर आणि श्रीकृष्ण यांनी वारंवार हे सांगितलेले आठवले. त्यावेळी त्याला ते सारे मूर्ख आहेत असेच वाटत होते. आता तो द्रोणांकडे गेला आणि त्याने स्वत:चे मन मोकळे केले. तो म्हणाला, “आचार्य, माझ्या कितीतरी मित्रांचा अर्जुनाने कसा संहार केलाय ते पाहा. मी या जगाचा राजा व्हावा म्हणून त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि मी त्यांचे साधे रक्षणही करू शकलो नाही. किती दुर्दैवी आहे मी! १०० यज्ञ मी केले तरी माझे हे पापक्षालन होऊ शकत नाही. मी जयद्रथाचा घात केला. तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही असे वचन मी त्याला दिले होते आणि त्याला अर्जुनाने माझी डोळ्यांसमोर मारले. सुदक्षिण गेला, श्रुतायू, अच्युतायू, श्रुतायुद्ध, विंद, अनुविंद, अलाम्बुश आणि भूरिश्रवा असे माझे एकाहून एक प्रिय वीर मित्र धारातीर्थी पडले. मला त्यांच्या मृत्यूचा सूड घेतल्याशिवाय मन:शांती मिळणार नाही. मी आताच जातो आणि युद्ध करतो.”

 

दु:खात बुडालेल्या दुर्योधनाकडे पाहून द्रोणांना खूप वाईट वाटले. ते म्हणाले, “दुर्योधना, आपण सारेच अर्जुन अजिंक्य आहे हे सत्य स्वीकारणे टाळत आहोत. तुला प्रसन्न पाहण्यासाठी मी प्रयत्नांची शिकस्त करीन. तुझ्या सर्व शत्रूंना ठार केल्याशिवाय आता मी हे चिलखत उतरवणार नाही. अंतिम श्वासापर्यंत मी तुझ्यासाठी प्राणपणाने लढत राहीन असे मी तुला वचन देतो. माझा पुत्र अश्वत्थामा हा पण तुला साथ देईल. या शत्रूंना आता रात्रीदेखील मी झोपू देणार नाही,” असे म्हणून ते रात्रीच युद्धभूमीकडे निघाले.

 

त्यांच्यासमवेत राधेय आणि दुर्योधन पण निघाले. जाता जाता दुर्योधनाने द्रोणांविषयी राधेयाकडे शंका व्यक्त केली की, अर्जुन त्यांना जास्त प्रिय असल्यामुळे त्यांनी त्याला व्यूहात प्रवेश करू दिला. पण, राधेयास त्याचे हे बोलणे रुचले नाही. त्याने दुर्योधनास आचार्यांविषयी आदर राखण्यास बजावले. एकमेकांना दोष देण्यात काही अर्थ नसून जे प्राक्तनात आहे, ते स्वीकारावे असा उपदेश केला.

 

रात्रीचे युद्ध सुरू झाले. पांडव सैन्य पण तयारीत होते. दोन्ही सैन्य अंधारात एकमेकांना भिडली. दुर्योधन आणि युधिष्ठिर यांचे द्वंद्व युद्ध झाले. तारकांच्या अंधुक प्रकाशात काही दिसत नव्हते.एकमेकांवर सोडलेले बाण कुठेतरी जाऊन पडत होते. द्रोण पण संतापून लढत होते. भीमाने कौरव सैन्याला चिरडून टाकण्यास आरंभ केलासोमदत्त व सात्यकी भिडले. पुत्र शाल्व याच्या मृत्यूचा बदला सोमदत्ताला घ्यायचा होता. सात्यकी वरचढ वाटत होता. मग सोमदत्ताच्या मदतीला दुर्योधन आला. सात्यकीला धृष्टद्युम्न याने मदत केली. रात्रीच्या युद्धात घटोत्कच पारंगत होता. त्याने मायावी अस्त्रे वापरून युद्धास वेगळेच वळण लावले. राक्षसांचे सैन्य त्याने बोलावून घेतले, जे रात्री जास्त प्रभावी असतात. अश्वत्थाम्याने त्याच्यावर चक्र सोडले, पण घटोत्काचाने ते चुकविले. रात्रीच्या अंधारात जणू दोन अंध सैन्य एकमेकांशी अंदाधुंद अशी लढत होती. तो एक भीषण प्रकारच होता.

 

- सुरेश  कुळकर्णी 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat