॥ जय जय हनुमान गुसाई ॥

    दिनांक  17-Apr-2019
चैत्र पौर्णिमेच्या पावन पर्वावर हनुमान जयंती साजरी केली जाते. दरवर्षी हनुमान जयंती उत्साहात साजरी जरुर करावी. परंतु, अंत:करणात प्रभू रामचंद्रांना सदैव ठेवणार्‍या हनुमंताचा जोवर आपल्या अंत:करणात जन्म होत नाही, तोपर्यंत आपली उपासना अधुरी आहे. हनुमंताचे गुण आपल्यामध्ये वागवणं हीच खरी हनुमान जयंती होय.

 

हनुमानाचे रूप हे हातात गदा घेतलेले, विरश्रीचा संचार झालेले असेच नजरेसमोर येते. संपूर्ण देशात हजारो हनुमानाची मंदिरे दिसतात. प्रत्येक गावात झाडाच्या पारावर शेंदूर लावलेला हनुमान उभा असतो. छोटसं का होईना, मारुतीचं मंदिर असतंच. प्रत्येक शनिवारी मारुतीच्या गळ्यात रुईच्या पानांचा हार घातला जातो. त्याच्या मस्तकावर फुलं वाहिली जातात. नारळजलाने मारुतीवर अभिषेक करून भक्त पूजा करतात. त्याच्यासमोर तेलवात लावली जाते. साडेसाती व संकटं दूर करण्यासाठी मारुतीरायाला साकडं घातलं जातं.

 

रामायणकाळापासून आजपर्यंत हनुमंताचे भजन, पूजन करणारे भक्त आहेत, पुढेही राहतील. शक्ती आणि युक्ती या दोहोंचा लाभ करून देणारा हनुमान! शूरत्व, वीरत्व आणि बुद्धी प्रदान करणारा हनुमान समस्त सामान्य लोकांमध्ये आवडता आहे. हनुमान आणि प्रभू श्रीराम ही दैवजोडी अजरामर आहे. प्रभू रामचंद्रांना साहाय्य करणारा हनुमंत हा अनेक गुणांनी अलंकृत आहे. त्याची स्वामीनिष्ठा आणि श्रीरामावर असणारे प्रेम अफाट आहे. अचाट शक्ती असूनही रामाच्या चरणांचा दास होऊन राहणारा हनुमंत दास्यभक्तीचा आदर्श आहे. श्रीरामांवर असणार्‍या अतूट प्रेमामुळे कोणतीही गोष्ट करण्यास तत्पर असणार्‍या हनुमंताच्या जीवनकोशात ‘अशक्य’ हा शब्दच नाही.

 

अंजनीपुत्र असणारा महापराक्रमी हनुमान. जन्मत: तेजस्वी सूर्यगोलाकडे झेपावणारा हनुमान. भय, भीतीचा लवलेश नसणारा हनुमान. वायुपुत्र असल्यामुळे अत्यंत चपळ, वेगवान असणारा हनुमान. त्रिखंडामध्ये लिलया संचार करणारा हनुमान. महारूद्र असूनही विरक्ती, वैराग्याचं बाळकडू घेऊन जन्मलेला हनुमान. रुद्राक्षमाला अंगावर धारण करून ध्यानमग्न असणारा हनुमान. राज्य, मान, सन्मान याची कणभरही अभिलाषा नसणारा हनुमान. आद्य रामदास असणारा हनुमान. त्याचा जन्म सीताशोध, लंकादहन या कार्यासाठी झालेला आहे. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा संहार करणार्‍या हनुमानाला प्रभू श्रीरामांनी ‘तुझी कीर्ती अजरामर होऊन तुझी प्रतिष्ठा वाढेल, तू चिरंजीव होशील,’ असा आशीर्वाद दिला.

 

राम-हनुमंत हे एक नितांत सुंदर गुुरूशिष्य आहेत. शिष्याने एकनिष्ठ होऊन अखंड गुरूसेवेत रममाण होऊन जावे, हा आदर्श हनुमंताच्या चरित्रामधून घेण्याजोगा आहे. लौकिकामधील कोणत्याही गोष्टीची अभिलाषा हनुमानाच्या मनाला स्पर्श करत नाही. समस्त नश्वर सुखापासूनची सहज अलिप्तता ही त्याच्याकडून शिकण्यासारखी आहे. प्रभू श्रीरामांशिवाय अन्य कशाचीही कामना नसलेला निर्मोही, निर्लेप असणारा हनुमान गुरूला प्रिय असणं स्वाभाविक आहे. कामना, वासनारहित असून अखंड श्रीरामाच्या भजनात निमग्न राहून स्वानंदसुखाचा उपयोग घेणारा शिष्य भक्त हनुमंत श्रेष्ठ आहे. खरं तर त्याच्याजवळ अष्टसिद्धी हात जोडून उभ्या आहेत. त्या सिद्धीचा उपयोग फक्त आपल्या सद्गुरूकार्यासाठी (रामकार्यासाठी) हनुमानाने केलेला आपल्याला रामायणामध्ये दिसून येतो.

 

सुग्रीव आणि बिभीषण या दोघांना देवकार्याला, रामकार्याला जोडण्याचे महत्त्वपूर्व कार्य हनुमंताने केले आहे. यामुळे देवसंस्कृतीला वानर संस्कृती व राक्षस संस्कृतीचा असणारा धोका नष्ट होऊन संजीवनी प्राप्त झाली. हे गुप्त पण उच्चकोटीचे कार्य करणार्‍या हनुमंताचे कौतुक वाटते. त्याच्या समग्र गुणांचे, कार्याचे वर्णन समर्थांनी मारुती स्तोत्रामध्ये व तुलसीदासांनी हनुमान चालीसामध्ये केलेले आहे. या स्तोत्राच्या नित्य पठणाने हनुमंत भक्तांचे संकटांमध्ये सदैव रक्षण करतो. भय, भीती दूर पळू जाऊन भक्त निर्भय होतात. ‘महावीर’ असलेला हनुमान हा तमोगुणी नसून ‘कुमती’चे निवारण करणारा आणि ‘सुमती’चा संग करणारा आहे. शारीरिक व आध्यात्मिक बळाने युक्त असणारा हा ‘महावीर’ आहे. तो सदैव सत्संगात रमणारा, राहणारा आहे. अखंड ब्रह्माच्या चिंतनात राहणारा असून अखंड राम उपासना करणारा आहे. अखंड साधनेत रमून ‘कुमती’च्या जवळही न फिरकणारा आहे. क्षमाशास्त्र जाणणारा कुशाग्र बुद्धिमता असणारा हनुमंत ‘महावीर’ आहे.

 

संत तुलसीदासांना व समर्थ रामदास स्वामींना मारुतीरायाने सगुण रूपात दर्शन दिले. हनुमान सुवर्णाचा वर्ण असलेला आणि सुंदर वेश परिधान केलेला आहे. कानात कुण्डले असून, माथ्यावर कुरळे केस व अंगावर भुरे केस आहेत. तो प्रभू रामचंद्राच्या अखंड सेवेची ध्वजा घेतलेला, हातामध्ये गदा घेतलेला आहे. विक्रमाचे प्रतीक ‘गदा’ आणि वैराग्याचे प्रतीक ‘ध्वज’ आहे. त्याने यज्ञोपवित धारण केलेले आहे, म्हणजेच त्याच्याजवळ मेधाशक्ती जागृत आहे. अशा मारुतीरायाने... हनुमंताने दर्शन देऊन जीवन कृतार्थ केल्याचे हे दोन्ही संत स्वानुभव कथन करतात. अशा हनुमंताजवळ काय मागणं मागावं? आत्मबळ आणि देहबुद्धी ते आत्मबुद्धीकडे घेऊन जाणाचे मागणे मागावे. मुक्तीचं साधन ठरणारी आत्मविद्या मागावी. आळस, चंचलता, ध्येयहीनता नाहीशी करणारी ‘सुमती’ मागावी. त्याच्याकडे मनापासून मागणं मागितलं, तर तो नक्की देतो. तो उदारपणाने सुमती, सत्संगती, सद्विचार, साधना नक्की प्रदान करेल.

 

चैत्र पौर्णिमेच्या पावन पर्वावर हनुमान जयंती साजरी केली जाते. दरवर्षी हनुमान जयंती उत्साहात साजरी जरुर करावी. परंतु, अंत:करणात प्रभू रामचंद्रांना सदैव ठेवणार्‍या हनुमंताचा जोवर आपल्या अंत:करणात जन्म होत नाही तोपर्यंत आपली उपासना अधुरी आहे. हनुमंताचे गुण आपल्यामध्ये वागवणं हीच खरी

 

हनुमान जयंती होय.

पवन तनय संकट हरन,

मंगल मूरति रूप- कौमुदी गोडबोले

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat