प्रचाराच्या तोफा थंडावल्या; १८ एप्रिलला मतदान

16 Apr 2019 18:12:56



नवी दिल्ली : २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील दहा तर इतर राज्यातील ८७ लोकसभा मतदार संघांतील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने प्रत्येक उमेदवारांकडून शक्तिप्रदर्शन करण्यात आले असून अनेक दिग्गज उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत आपला प्रचार करताना दिसून आले.

 

दुसऱ्या टप्प्यात १२ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या ९७ लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे. यातील अकोला, अमरावती, बुलडाणा, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर शहर या मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडेल. तर आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू काश्मिर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओदिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी या राज्यांमध्येही दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.

 

दुसऱ्या टप्प्यासाठी १६२९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद होणार असून एकूण १५ कोटी ७९ लाख ३४ हजार मतदार आपले कर्तव्य बजावणार आहेत. दरम्यान, मतदान सुरळीत होण्यासाठी १ लाख ८१ हजारहून अधिक मतदान केंद्रावर मतदान होणार असून येत्या २३ मे २०१९ रोजी निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0