जिणे वैधव्याचे, जिणे सन्मानाचे....

    दिनांक  16-Apr-2019   


विधवांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी, यासाठी शिक्षिका लता बोराडे यांनी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन ‘विधवा हळदी-कुंकू समारंभ’ साजरा करून त्यांना सधवेचा सन्मान दिला. त्यांच्याविषयी...


पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या विधवा पत्नीच्या अंगावरचे दागिने उतरविले जातात. कुंकू पुसले जाते. परंपरागत चाललेली ही प्रथा. विधवा हीसुद्धा एक माणूस आहे, पण आजही बर्‍याच ठिकाणी तिला दुय्यम वागणूक दिली जाते. पण, सांगली येथील आटपाडी भागात विधवा शिक्षिका लता बोराडे यांनी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन ‘विधवा हळदी-कुंकू समारंभ’ आयोजित करून प्रतिगामी प्रथा मोडीत काढली. या समारंभाच्या माध्यमातून त्यांना सधवेचा सन्मान दिला.

 

लता बोराडे यांचा जन्म १९७३ मध्ये झाला आणि १९व्या वर्षी त्या विवाहबंधनात अडकल्या. पण, त्यांच्या नशिबात काही वेगळेच लिहिले होते. लग्नानंतर अवघ्या २५व्या दिवशीच नवरा अपघाती मृत्यूमुळे कायमचा सोडून गेला. हा एवढा मोठा आघात मनावर झाला असतानादेखील रूढी-परंपरेनुसार विधवा म्हणून त्यांच्या अंगावरचे १४ तोळे सोन्याचे दागिने उतरवले गेले. त्यांचे कुंकू पुसले. त्यांच्या हातातल्या हिरव्या बांगड्यांच्या चुडाचाही चुरा झाला. थोडक्यात काय, लताताईंचे सौभाग्याचे सगळे अलंकार पुसून टाकण्यासाठी सगळ्यांचे हात सरसावले. आजही त्या आठवणी फक्त वेदनादायी असल्याचे सांगत त्या म्हणतात की, “त्यावेळी क्षणभर सतीची प्रथा मला आपलीशी वाटली. ’माझा चुडा फोडू नका!’ असे मी नातेवाईकांना ओरडून सांगत होते. कारण, चितेच्या आगीपेक्षा समाजात जगताना मिळणारे चटके जास्त तीव्र आहेत, हे माझ्या लक्षात आले होते. पण, घरच्यांनी सौभाग्याची लेणी उतरवण्याच्या माझ्या विरोधालाही जुमानले नाही.”

 

पण, या घटनेनंतर सासर सोडून त्या माहेरी राहू लागल्या. अनेकदा आत्महत्येचा विचारही त्यांच्या मनाला शिवून गेला, तसे प्रयत्नही त्यांनी केले. पण, त्यातही नशिबाने त्यांची साथ दिली नाही. लताताई एक वर्ष अंथरुणाला खिळून होत्या. त्यांच्या अंगावर गुंजभर सोने नाही, नीटनेटके राहणे नाही. आई-वडिलांसाठी आनंदाने जगणे सुरू होते. पण, त्यांनी जिद्द सोडली नाही. शेवटी पुन्हा उठून त्या नेटाने उभ्या राहिल्या. पुढे डी.एडचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. अखेर १३ वर्षांनंतर २०१४ मध्ये तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेत त्यांना शिक्षिकेची नोकरी मिळाली आणि आता जीवनात थोड्या स्थिरस्थावर झाल्यावर लताताईंनी विधवांसाठी काम करण्यास सुरुवात केली.

 

१० जून, २०१५ ला ’विधवा महिला प्रतिष्ठान’ची त्यांनी स्थापना केली. प्रायोगिक तत्त्वावर सुरू असणार्‍या या प्रतिष्ठानतर्फे विधवांना मदत केली जाते. या प्रतिष्ठानच्या स्थापनेचा उद्देश सांगताना लताताई म्हणतात की, “आपल्याकडे विधवा होणे म्हणजे जणू काही अपंगत्व येणे. कारण, समाजात सतत हेटाळणी होत राहते आणि घरातील किंवा कोणत्याही शुभकार्यात ’बाजूला बस’ म्हणून सांगितले जायचे. माझ्या भावजयीच्या डोहाळे जेवणाला ’लता, तू जरा मागे हो,’ असं सांगणार्‍या वयस्कर महिला होत्या. पण, मी म्हणते शुभकार्यात विधुर चालतो, पण मग विधवा का चालत नाही? विधवेला समाज का डावलतो,” असा सवाल लताताई उपस्थित करतात. हे सगळं कुठेतरी थांबायला हवे म्हणून त्या प्रयत्नशील असतात. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रदेखील लिहिले आहे. ज्याप्रमाणे बालविवाह कायदा झाल्याने बालविवाहांचे प्रमाण कमी झाले, त्याप्रमाणे विधवांना त्यांचे हक्क मिळवण्यासाठी स्वतंत्र कायदा गरजेचे असल्याचे मत त्या व्यक्त करतात. त्यासाठी लोकप्रबोधन गरजेचे आहे. पण, कायदा आला तर विधवा महिला सन्मानाने जगू शकतील, अशी आशाही लताताईंनी वाटते.

 

आज लताताई गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर टिकली, पायात पैंजण असे सगळे स्त्री अलंकार परिधान करतात. कोणत्याही महिलेला तिने काय घालावं आणि काय घालू नये, हे ठरवण्याचा अधिकार आहे. पण, आजही विधवा महिलांना तो दिला जात नाही. ’ताठ मानेने जगायला मिळावे म्हणून...’ यावर्षी त्यांनी पहिल्यांदा संक्रातीचा सण साजरा केला. गावातील विठ्ठल मंदिरात विधवा आणि सवाष्ण महिलांना घेऊन हळदी-कुंकू समारंभही त्यांनी आयोजित केला. या कार्यक्रमाला सवाष्ण असलेल्या त्यांच्या शाळेतील सहकार्‍यांनी त्यांना साथ दिली. मात्र, लोकप्रतिनिधी तसेच सरकारी अधिकार्‍यांनी पाठ फिरवली. “पण, जर मी सुरुवात केली नाही तर या प्रथा-परंपरा अशाच सुरू राहतील,” असे त्या म्हणाल्या. असे होऊ नये म्हणून त्यांनी स्वतः यावर्षीपासून या समारंभाला सुरुवात केली.

जवळपास ८० ट

क्के लोकांना त्यांची ही भूमिका पटलेली नाही. त्यांच्या घरातूनही याची खिल्ली उडवली गेली - ’असे कार्यक्रम करून तुला पतीचं सुख मिळणार आहे का?’ असे बोचरे प्रश्न लताताईंना विचारण्यात आले. “पण, शरीरसुखापेक्षा मानसिक सुख महत्त्वाचं आहे, या भावनेने असे कार्यक्रम मी हाती घेणार आहे,” असे उत्तर त्या समाजातील प्रश्नार्थींना देतात. “विधवा महिलांना समाजाने स्वीकारणे गरजेचे आहे. त्यांचा सन्मान होणे काळाची गरज आहे. वैधव्य काय किंवा सवाष्ण काय, ही मानसिकता बदलली पाहिजे. त्यामुळे दरवर्षी मी असे हळदी-कुंकू समारंभ घेणार, विधवा महिलांना ताठ मानेने जगण्यासाठी प्रयत्न करणार आहे,” असे त्यांनी मनाशी पक्के ठरवले आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat