ये कुछ ‘आझम’ नही हुआ!

    दिनांक  16-Apr-2019सपाचा नेता आणि रामपूर लोकसभा मतदारसंघाचा वाचाळ उमेदवार आझम खान याची जीभ पुन्हा एकदा घसरली. त्याने आपल्या कलुषित बुद्धीचे प्रदर्शन जगजाहीर केले. भाजपच्या नेत्या जयाप्रदा यांच्यावर इतक्या खालच्या पातळीच्या टीकेने आझमवर सर्वच स्तरातून शाब्दिक हल्ला चढवला गेला. खरं पाहता, यामुळे आझम खानचे महिलाविषयींचे असे कुविचार सगळ्यांसमोर आले. खरं तर निवडणुकांच्या प्रचारादरम्यान एकमेकांवर राजकीय चिखलफेक आलीच. परंतु, त्यातही किमान नैतिकतेची मर्यादा राखली जाणे अपेक्षित आहे. मात्र, यावेळी आझम खानने हद्दच पार केली. अगदी जयाप्रदांच्या ‘अंतर्वस्त्रा‘च्या रंगावरून केलेली टीका हा केवळ जयप्रदा यांचाच नव्हे, तर समस्त महिलावर्गाचा अपमान आहे. नेटकर्‍यांनी तर सोशल मीडियावर आझम खानला अगदी ‘उभा-आडवा‘ सोलून काढला. त्यामुळे समाजात यांसारख्या गोष्टी नक्कीच खपवून घेतल्या जाणार नाहीत, हे स्पष्ट झाले. पण, यापूर्वी अनेक राजकारण्यांनी स्त्रियांविषयी अश्लाघ्य भाष्य केले आहे, ज्यातून त्यांची संकुचित मानसिकताच लक्षात येते. जेव्हा-जेव्हा एखादी महिला पुरुषापेक्षा सरस ठरते, तेव्हा बहुतांश वेळा वैयक्तिक पातळीवरून तिचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. आझम खानचे दुखणेही तेच. जयाप्रदांची प्रसिद्धी, त्यांना मिळणारे समर्थन आझमसाठी पोटदुखी ठरले आणि त्याचेच रुपांतर अशाप्रकारच्या अश्लाघ्य वक्तव्याच्या रुपेने ओठावर आले. आता महिलांनी अशा महाभागांना जोड्याने मारल्यासही पुढे-मागे पाहू नये. खरं म्हणजे, आझमसारख्या अशा फुटकळ पुरुषी अहंकार बाळगणार्‍या महाभागांना तिथेच ठेचलं पाहिजे. कारण, त्यांच्या मनातील, विचारातील विष समाजासाठी सर्वस्वी धोकादायक आहे. आझम खानला राष्ट्रीय महिला आयोगाने या बेताल वक्तव्याविषयी जाब विचारला असून यावर स्पष्टीकरण मागितले आहे. यावर आझम खान काय उत्तर देतायत, हासुद्धा महत्त्वाचा विषय आहे. कारण, त्याने केलेल्या आक्षेपार्ह विधानाविषयी त्याला वरकरणी काही गैर वाटतंय, असं दिसून येत नाही. कारण, जयाप्रदा यांची आझमने अद्यापही जाहीर माफी मागितलेली नाही. त्यामुळे राजकारण असो किंवा इतर कुठलेही क्षेत्र, सर्वत्र महिलांचा आदर होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आझमवर आजन्म निवडणूक लढवण्यास बंदी घालून त्याची थेट रवानगी तुरुंगात करणे हाच खरा न्याय ठरेल.

 

मन का विश्वास कमजोर हो ना

 

महिलांवर होणारे शाब्दिक हल्ले हे मानसिक छळाचाच प्रकार असल्याने याला कायद्यात कडक शिक्षा आहेच. आझम खानने तर सार्वजनिकरित्या जयाप्रदा यांच्याविरोधात गरळ ओकली. पण, असे हजारो-लाखो आझम खान समाजात मोकाट फिरत आहेत. त्यांना कोण वेसण घालणार? जर इतक्या नावाजलेल्या नटीचा अशाप्रकारे जाहीर अपमान केला जात असेल, तर मग समाजातील सामान्य-दुर्बल महिलांची काय परिस्थिती असेल, याचा विचार करा. त्यांना मूग गिळून समाजासाठी तर कधी आपल्या परिवारासाठी सगळे अन्याय-अत्याचार मुकाट्याने सहन करावे लागतात. अनेकदा त्यांच्या चारित्र्यावर हल्ला केला जातो, मग ़कुठे जावे त्यांनी? त्यांच्यासाठी तोंड दाबून, बुक्क्यांचा मार सहन करण्याशिवाय पर्याय नसतो. कारण, परत तेच. ‘माझा परिवार, माझी मुलं...’ या नादात मात्र ती महिला आपलं स्वत्व, स्त्रीत्व अगदी हरवून बसते. आता तर समाजात हिंसाचाराला अगदी लहान मुलीसुद्धा बळी पडतात. त्यांचाही आवाज अशाचप्रकारे दाबण्याचे कित्येक प्रसंग समोर येतात. त्यामुळे समाजात खरी क्रांती तेव्हाच येईल, जेव्हा महिलांना सर्वच स्तरांतून योग्य वागणूक दिली जाईल. मग ती लहान मुलगी असो, सामान्य महिला असो किंवा कोणी नावाजलेली व्यक्ती असो... तरच या समाजातील अनेक आझम खान महिलांशी बोलताना, वागताना मर्यादेत आणि सन्मानाने वागतील. हा बदल समाजातील प्रत्येक स्तरात केला पाहिजे. समानता ही फक्त बोलण्यातून नसावी, तर ती प्रत्यक्ष दिसावी. राष्ट्रीय महिला आयोगाकडे येणार्‍या लाखो तक्रारी हेच दर्शवितात की, अशा लाखो आझम खानी प्रवृत्तींचा निपटारा करायचा बाकी असून यासाठी महिलांनी पुढे येऊन यांना उत्तर देणे गरजेचे आहे. ‘इतनी शक्ती हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना‘ या प्रत्येक ओळीत नवप्रेरणा आहे. आपल्या दुर्बलतेचा बाऊ न करता महिलांविषयी नीच विचार असणार्‍या सर्वांचा बिमोड ताकदीने करण्याची शक्ती प्रत्येक स्त्रीमध्ये आहे. तिने फक्त आपल्या आतली ही शक्ती जागृत करण्याची नितांत गरज आहे, अन्यथा या अन्याय-अत्याचाराच्या दुष्टचक्रात तिचा असाच कोंडमारा होईल. म्हणूनच, महिलांनो, मुलींनो सावध राहा, शाब्दिक, मानसिक, शारीरिक कोणताही अन्याय सहन करुन नका आणि मग आणि मगच कोणताच आझम खान कुठल्याही महिलेचे असे सार्वजनिक धिंडवडे काढण्यास धजावणार नाही.

- कविता भोसले 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat