सुहास्य तुझे मनास मोही...

    दिनांक  16-Apr-2019   

यूँ मुस्कुराए

जान सी कलियों में पड़ गई-

यूँ लब-कुशा हुए

कि गुलिस्ताँ बना दिया!

 

असगर गोंडवी यांचा हा शेर, कोणाला माहिती असेल, कोणाला नसेलही... पण, असगर गोंडवी यांनी ज्या अंदाजात हा शेर कागदावर उतरवला, म्हणजे ‘हसले असे कोणी की, कळ्यांत प्राण फुंकले... ओठ हलले असे की, वनी सुमन बहरले...’ काहीसा असाच अर्थ होतो... खरेच आहे, शब्दशः अर्थ न घेता, विचार केला तर आपल्या घरातली, कार्यालयातली, नात्यांतली, ओळखीतली किंवा जी कोणी व्यक्ती आपल्यासमोर येते, ती हसून बोलली तर नक्कीच प्रत्येकाला आनंद होतो. एसटी बसमधला वाहक असो वा रेल्वे तिकीट देणारा अधिकारी अथवा हॉटेलमधला कोणी कर्मचारी, हसून सेवा दिली तर आपणही खुश होतो. रुग्णालयात, दवाखान्यात आजारपणाने गांजलेल्यांशीही हसून बोलले तर दुखणे जरावेळासाठी का होईना पळ काढते. अन् हेच हसू जर आपण स्वतःच आपल्या चेहर्‍यावर नेहमीच वागवले तर? तर आपणही दिवसभरच नव्हे तर आयुष्यभर आनंदी राहू शकतो ना? आपल्या ताणतणावांना टाटा-बाय बाय करू शकतो ना? खरेच आहे हे, अन् त्याला शास्त्रीय आधारदेखील आता मिळाला आहे.

 

नुकतेच अमेरिकेतील काही संशोधकांनी ओठांवरील हास्य, चेहर्‍यावरील भाव, अंतःकरणातील भावना आणि त्यामुळे होणार्‍या परिणामांवर एक संशोधन केले व ते प्रकाशितही करण्यात आले. संशोधकांनी आपल्या अभ्यासातून दावा केला की, हसण्याने लोक खरोखरच आनंदाचा अनुभव करू शकतात. अमेरिकेच्या मनोवैज्ञानिकांनी दीर्घ संशोधनाअंती तयार केलेला हा अहवाल ‘सायकॉलॉजिकल बुलेटिन’ नामक जर्नलमध्ये प्रकाशितही करण्यात आला आहे. आपल्या अभ्यासावेळी संशोधकांनी ५० वर्षांचा डेटा एकत्रित केला व त्याची तपासणी, चाचणी, परीक्षण केले की, खरेच चेहर्‍यावरील हावभावांचा त्याच्याशी संबंधित भावनांचा अनुभवण्याशी काही संबंध आहे अथवा नाही? टेनेसी विद्यापीठातील पी. एचडीचे विद्यार्थी निकोलस कोल्स याबाबत म्हणाले की, “पारंपरिक ज्ञान आपण केवळ हसण्याने आनंदी होऊ शकतो, तर आपलेच म्हणणे खरे करण्यातून आपल्याला क्रोधाची, गंभीरतेची जाणीव होते, असे सांगते.”

 

कोल्स यांनी पुढे असेही सांगितले की, “मनोवैज्ञानिकांनी मात्र पारंपरिक ज्ञानावर आधारित असलेल्या या संकल्पनेची जवळपास १०० वर्षांपर्यंत कोणतीही दखल घेतली नाही. कारण ते या सिद्धांताच्या सत्यतेशी सहमत नव्हते. ही असहमती २०१६ साली तर अधिकच वाढली. कारण, संशोधकांच्या सुमारे १७ गटांना केवळ हसण्याने लोक आनंदाचा अनुभव घेऊ शकतात, हे सिद्ध करण्यात अपयश आले. परंतु, आपण कोणत्याही एकाच अभ्यासाच्या निष्कर्षांवर लक्ष केंद्रित करू शकत नाही.” दरम्यान, १९७० सालापासूनच मनोवैज्ञानिक या संकल्पनेच्या खरेखोटेपणाविषयी परीक्षण करत होते. संशोधकांना सगळेच परिणाम जाणून घ्यायचे होते, पाहायचे होते. अखेर हे शक्य झाले ते २०१९ साली. संशोधकांनी ‘मेटा-अ‍ॅनालिसिस’ तंत्रज्ञानाचा वापर करून १३८ शोधनिबंधांचा, अभ्यासांचा डेटा एकत्रित केला, त्यांचे निष्कर्ष उभे-आडवे तपासून पाहिले, ज्यात जगभरातील ११ हजार लोकांनी सहभाग घेतला आणि शेवटी असा निष्कर्ष काढला की, चेहर्‍यावरील भाव मनांतील भावनांवर निश्चित असा परिणाम करतातच. म्हणजे असे की, चेहर्‍यावर रागाचे हावभाव असतील तर व्यक्ती तीच भावना हृदयातही बाळगेल... चेहर्‍यावर उदासवाणे हावभाव असेल तर व्यक्ती तीच भावना घेऊन जगेल... चेहर्‍यावर गंभीर भाव असतील तर व्यक्ती तीच भावना घेऊन जगेल... आणि चेहर्‍यावर हास्य असेल तर तीच भावना तुमच्या मनातही असेल...

 

संशोधकांनी केलेल्या या अभ्यासातून दैनंदिन आयुष्यातील मानवी हास्याचे नेमके फायदेदेखील सांगितले आहेत. संशोधकांच्या मते हसण्याने, ताणतणावावर मात करता येते, हास्य नैसर्गिक वेदनाशामकतेचे काम करते, शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढवते, शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते, सुंदर चेहर्‍यासाठी हसणे हा एक उत्तम व्यायाम आहे, हास्याने आत्मविश्वास वाढतो, सकारात्मक विचारांचाही विकास होतो आणि तुम्ही आयुष्यात कधीही निराश होत नाही, म्हणूनच हसत राहा...!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat