उर्मिला मातोंडकरच्या सभेत 'मोदी-मोदी'चा नारा...

15 Apr 2019 16:01:01



मुंबई : उत्तर मुंबई मतदार संघाच्या काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या बोरिवली येथील सभेत काही तरुणांनी मोदी नावाचा जयजयकार केला. मातोंडकर यांची बोरिवली परिसरात प्रचार फेरी आयोजित करण्यात आली होती. ही प्रचार फेरी बोरिवली स्थानक परिसरात गेली असता काही तरुणांनी मोदी मोदीच्या घोषणांचा जयजयकार केला. यावेळी दोन्ही समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले.

 

उत्तर मुंबई मतदारसंघामध्ये भाजपचे गोपाळ शेट्टी आणि सिनेअभिनेत्री व काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्यात सरळ लढत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांकडून आरोपांच्या फैरी होत होत्या. मात्र, आज चक्क मातोंडकर यांच्या फेरीतच मोदी समर्थक घुसून मोदी मोदीच्या घोषणा दिल्या गेल्या. यावर चवताळलेल्या काँग्रेस समर्थकांनी दादागिरी करत मोदी समर्थकांना धक्काबुक्की करत मारहाण केली.

 

आपल्या प्रचार फेरीत घुसून भाजप गुंडानी धुडगूस घातल्याचा मातोंडकर यांनी आरोप केला आहे. घडलेल्या घटनेची पोलिसात तक्रारही दाखल त्यांनी संरक्षणाची मागणी केली आहे. दरम्यान, धुडगूस घालणारे मोदी समर्थक असू शकतात मात्र ते भाजपचे कार्यकर्ते नसल्याचे सांगत गोपाळ शेट्टी यांनी आरोप फेटाळले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0