बारामती जिंकण्याचा भाजपचा निर्धार; अमित शाह यांची सभा होणार

15 Apr 2019 14:58:28



 

मुंबई : बारामती लोकसभा मतदारसंघ राज्यासाठी नाही तर देशासाठी प्रतिष्ठेचा झालेला आहे. या मतदारसंघामध्ये भाजपच्या कांचन कुल आणि राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यात लढत होणार आहे. बारामती काबीज करण्यासाठी भाजपकडून थेट दिल्लीहून सूत्र हलताना दिसून येत आहेत. यासाठीच बारामतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात येणार असल्याची चर्चा रंगली होती. पण पंतप्रधानाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांची बारामतीत सभा होऊ शकत नसल्याचे जाहीर झाले.

 

पंतप्रधानाची सभा होणार नसली तरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची बारामतीमध्ये सभा होणार असल्याचे चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले. येत्या १९ एप्रिल रोजी बारामतीमध्ये शाह यांची सभा होणार असून त्याच दिवशी खडकवासला येथे प्रचार सभा होणार आहे. तर २१ तारखेला भोर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा होणार आहे.

 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा स्वतः शरद पवार आणि परिवारातील इतर सदस्य बारामतीमध्ये तळ ठोकून आहेत. यावरुनच नवख्या कांचन कुल व त्यांचे पती आमदार राहुल कुल यांना वाढता प्रतिसाद दिसून येत आहे. तर दुसरीकडे राज्याचे मंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील तसेच रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे देखील बारामतीमध्ये तळ ठोकून आहेत. यावरून दोन्हीही पक्षासाठी ही लढत किती प्रतिष्ठेची आहे हे दिसून येते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0