काँग्रेस हा गाढवांचा पक्ष!

14 Apr 2019 21:23:47



सोलापूर : “काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे,” अशी कठोर टीका रविवारी वंचित बहुजन आघाडीचे नेते व सोलापूरमधील उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर केली आहे. “सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीवरून काँग्रेस गाढवपणा करणार हे मला माहीतच होते. अशा भेटी घडवून आणून त्याचे राजकारण करणे काँग्रेसवाल्यांना चांगलेच जमते,” असेही ते म्हणले. “पण असे डावपेच करणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीत लोकच धडा शिकवतील,” असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी मारला.

 

सुशीलकुमार शिंदेंसोबतच्या भेटीबाबतचे मौन अखेर प्रकाश आंबेडकरांनी सोडले. आंबेडकर हे बालाजी सरोवर या तारांकित हॉटेलमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसोबत नाश्ता करत होते. त्यावेळीच सुशीलकुमार शिंदे तिथे पोहोचले. आंबेडकर हॉटेलमध्ये असल्याचे कळताच शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यामध्ये काही वेळ चर्चाही झाली होती. या भेटीमुळे सोलापुरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यामुळेच अखेर याबबत आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिले.

 

“निवडणूक म्हणजे दुश्मनी असे मी कधीच मानले नाही. कोणाला तरी भेटायचे आणि फोटो व्हायरल करायचे, हे काँग्रेसचे घाणरडे डावपेच आहेत. ते त्यांनाच लखलाभ होवोत,’ असे आंबेडकर म्हणाले. दुसरीकडे सुशीलकुमार शिंदे हे शिवराज पाटील-चाकूरकर यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी आंबेडकर यांची अचानक भेट झाल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वीच झालेल्या सभेत आंबेडकरांनी सुशीलकुमार शिंदेंवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर लगेचच ही भेट झाल्याने सोलापुरात चर्चांना उधाण आले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर, काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे आणि भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोलापूर लोकसभेसाठी येत्या १८ एप्रिलला मतदान होत आहे. माझी ही शेवटची निवडणूक असल्याने मला साथ द्या, असे भावनिक आवाहन शिंदे यांनी केल्याने सोलापूरची लढत रंगतदार होणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0