देशाला मजबूर नव्हे तर मजबूत सरकारची गरज

    दिनांक  14-Apr-2019


 


वाडा : भिवंडी लोकसभा मतदार संघाचे भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी वाडा येथे आयोजित केलेल्या महामेळाव्यात देशाला मजबूर नव्हे, तर मजबूत सरकारची गरज असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शनिवारी १३ एप्रिल रोजी महायुतीच्या वाडा येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

 

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की भाजप-शिवसेना ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहे, तर विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नसल्याने त्यांची स्थिती गोंधळल्यासारखी झाली आहे. वाडा एमएमआरडीए क्षेत्रात येत नसल्याने विकास खुंटला आहे. यापुढे वाडा क्षेत्र एमएमआरडीए क्षेत्रात आणण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. भाजप, शिवसेना, रिपाइं, श्रमजीवी संघटना व कुणबी सेना भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी वाडा येथे महामेळावा आयोजित करण्यात आला होता.

 

खा. कपिल पाटील यांनी बोलताना सांगितले की, “वाडाचा विकास करण्याचा वादा केला. मोदी सरकारच्या पाच वर्षाच्या चांगल्या कामामुळे या निवडणुकीत भ्रष्टाचार व महागाईचा मुद्दा नाही. महायुतीच्या घटक पक्षामध्ये आता कुणबी सेनाही सहभागी झाल्याने महायुतीचे पारडे अधिक जड झाले आहे.” यावेळी आ. शांताराम मोरे, प्रकाश पाटील, ज्योती ठाकरे, दौलत दरोडा, मधुकर पाटील, नंदकुमार पाटील, संदीप पवार, धनश्री चौधरी, अश्विनी शेळके, मेघना पाटील, कुंदन पाटील, मंगेश पाटील, अरुण पाटील, शुभांगी उत्तेकर आदी मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat