युट्युबवर भारतीय स्बस्क्राईबर्स जास्त

12 Apr 2019 14:33:29


 


नवी दिल्ली : इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे भारतात बऱ्याचशा सोशल नेटवर्किंग साईट्सचा उपयोग सर्रास केला जातो. त्यातीलच एक म्हणजे युट्युब. कोणत्याही मनोरंजनासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी युट्युबचा वापर होत असतो. भारताला युट्युबसाठी जगातील सगळ्यात मोठी आणि वेगवान वाढणारी बाजारपेठ म्हणून घोषित केले आहे. ही माहिती युट्युबच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुसान वोजिकी यांनी दिली. 'कॉमस्कोअर डेटा' च्या माहितीनुसार, भारतात युट्युबसाठी महिना २६.५ कोटीपेक्षा जास्त सक्रिय युझर्स आहेत. यातील ९५ टक्के लोक स्थानिक भाषांना प्राधान्य देतात.

 

"भारत देश आता युट्युबसाठी सर्वात मोठा प्रेक्षकवर्ग असलेला देश आहे. तसेच, भारतातील यूट्यूबच्या प्रेक्षकांची संख्या इतर देशांच्या मानाने जलद गतीने वाढत आहे. इंटरटेनमेंट आणि माहिती मिळवण्यासाठी ग्राहक युट्यूबकडे वळत आहेत. २०१८मध्ये शैक्षणिकसंबंधीचे व्हिडिओ, माहिती जाणून घेण्यात लक्षणीय वाढ झाल्याचेही निदर्शनास आले " असेही सुसान वोजिकी यांनी सांगितले.

 

"भारतात मोबाइलच्या वापरात ८५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे भारतातील सहा मेट्रो शहरात यूट्यूबच्या वापरात लक्षणीय वाढ झाली आहे. २०१६ पर्यंत काही एमबी डेटा खर्च करणारे भारतीय लोक आता महिन्याला १० जीबीपेक्षा जास्त डेटा खर्च करीत आहेत. भारतात संगीत, तंत्रज्ञान, सौंदर्य, आरोग्य, फिटनेस, डान्स आणि फूड यासंबंधीचे व्हिडिओ पाहायला लोकांचा जास्त कल आहे." असेही त्यांनी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0