जेटचे विमान उडायलाच हवे!

12 Apr 2019 21:10:47



खाजगी असल्याने ‘पडू दे बंद’ असा पवित्रा घेऊन चालणार नाही. रोजगार, दळणवळण आणि बँकांसाठीची वित्तीय हमी यासाठी जेटचे विमान पुन्हा उडालेच पाहिजे.

 

प्रचंड मोठ्या तोट्यात जाऊन मंदावलेल्या जेट एअरवेजमध्ये सध्या काहीशी धुगधुग सुरू झाली आहे. गेली २६ वर्षे जेटच्या अध्यक्षपदावर राहिलेल्या नरेश गोयल यांनी आपल्या लाडक्या कंपनीला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नरेश गोयलना या वयात हा सगळा खेळ पुन्हा मांडायला आणि जेटचे विमान उडते ठेवायला जमले का, हे येणारा काळच ठरवेल. मात्र, यानिमित्ताने अनेक गुंते आणि प्रश्न पुढे आले आहेत. जेटचा सगळा प्रश्न सुरू झाला तेव्हा ‘आता बुडतेय तर बुडू देत ना’ असा एक डावा मजेशीर सूर काही माध्यमांनी लावला होता. ऐकायला हे बरे वाटत असले आणि विजय मल्ल्या आदी मंडळींनी विमानसेवा ही ऐशोआरामाची आणि चंगळीची गोष्ट आहे, असे काही लोकांच्या डोक्यात बिंबविल्यामुळे या व्यवसायाची देश म्हणून गरज आणि हे क्षेत्र सक्रिय ठेवण्याची आवश्यता दुर्लक्षिली जात आहे. कुठलाही खाजगी उद्योग हा त्याच्या मालक किंवा व्यवस्थापनाच्या तो व्यवसाय चालविण्याच्या उमेदीवर अथवा कौशल्यावर वाढतो किंवा बुडतो. नरेश गोयल यांचेही काहीसे तसेच झाले. दिल्लीच्या एका नाक्यावर विमान तिकिटांचे बुकिंग एजंट म्हणून काम करणारे गोयल भारतातल्या सर्वात मोठ्या खाजगी विमान कंपनीचे मालक बनले. हा प्रवास सोपा नाही, तसाच तो सुस्पष्टही नाही. गोयलांच्या विस्ताराचे आणि राजकीय क्षेत्रातील त्यांच्या सर्वपक्षीय मित्रांचे अनेक किस्से आजही बाजारात सांगितले जातात. इतके असूनही विमान वाहतुकीच्या क्षेत्रातली अग्रणी कंपनी म्हणून जेट नावाजली जाताच होती. आता मुद्दा आला की, मग जेटला अचानक घरघर का लागली?

 

कुठल्याही व्यवसायाचे स्वत:चे म्हणून काही निकष असतात. त्या निकषांवरच तो व्यवसाय चालतो. बुद्धिबळाच्या नियमांनी कॅरम खेळता येत नाही, तसाच हा प्रकार. विमान कंपन्या या सर्व गोष्टी भाडेतत्त्वावर घेऊन चालतात. विमानेसुद्धा भाड्यानेच घेतलेली असतात. विमानाच्या शेपटीवर विमानकंपनीचे मानचिन्ह असले तरी, ते विमान भाड्यानेच घेतलेले असते. बाकी सगळेच व्यवहार कंत्राटाने होत असल्याने ज्या बँका यात कर्ज देतात, तसे त्यांच्यापाशी जप्त करून मिळविण्यासारखेही काहीच नसते, तरीसुद्धा दीर्घकालीन फायद्यासाठी बँका अशा उद्योगांना कर्जेही देतात. जेटच्या बाबतीतही तेच झाले. भारतातली सर्वात मोठी विमानसेवा देणारी कंपनी असल्याने तिच्या कर्जाच्या आकड्याचे वजनही तितकेच मोठे आहे, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. आज जो काही आकडा समोर येत आहे, त्याहीपेक्षा मूळ आकडा मोठा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्ज देणार्‍या बँकेनेही कर्जाचे रूपांतर समभागात करून घेण्याची पद्धत अवलंबली ती याच दृष्टीने. व्यवसाय बुडीत जात असला तरी वा कर्जे थकलेली असली तरीसुद्धा उद्या कोणी नव्या दमाचा खेळाडू आला, तर पुन्हा या कंपनीमध्ये प्राण फुंकू शकतो. आज बँकेने ज्या प्रकारे नरेश गोयल यांना समभाग विकत घेण्याच्या प्रक्रियेत येऊ दिले, त्यानुसार अशाच काही घटना जेटच्या बाबतीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

इथे जेटचा पुळका असण्याचे कारण नाही. मात्र, विमानसेवा भारतासारख्या प्रगतिशील देशासाठी मोठ्या गरजेची गोष्ट होऊन बसलेली आहे. अनेक लहान-मोठे उद्योजक या विमानसेवांच्या आधारावर आपले व्यवसाय वाढवित आहेत. जेट बंद पडल्याने संभविणारे जे दोन धोके आहेत, त्यातील पहिला इतक्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणारे लोक आपला रोजगार गमावू शकतात आणि दुसरा म्हणजे, याचा फायदा घेऊन अन्य कंपन्या आपल्या तिकिटांचे दर अव्वाच्या सव्वा वाढवू शकतात. जेटची विमाने रद्द झाल्याने यातली दुसरी शक्यता सध्या वास्तवात उतरताना दिसतच आहे. जग हे एक खेडे होत असले तरी, स्थानिक म्हणूनही काही आकाराला नक्कीच येत आहे. विमानसेवांचा विचार जोपर्यंत वेगळ्या पद्धतीने केला जात नाही, तोपर्यंत त्यांना तरणोपाय नाही. जेट अचानक तोट्यात जाण्याचे कारण व्यवसायाला लागलेला क्षय मुळीच नाही. अगदी आजही जेटच्या तिकिटांचे बुकिंग सुरूच आहे. मूळ प्रश्न आहे तो अधिकच्या खर्चांना कात्री न लावण्याचा. सगळ्याच विमान वाहतूक कंपन्यांनी आता याचा विचार करायला हवा. वैमानिक व हवाई सुंदरी यांचे पगार अवास्तव वाटावे इतके जास्त आहेत. कारण नसताना एका विशिष्ट वर्गातील उच्चभ्रू मंडळींनी त्याची मक्तेदारी आपल्यापर्यंत राखून ठेवली आहे.

 

वैमानिक होण्याचे प्रशिक्षण सर्वसामान्यांच्या अवाक्यात नाही. प्रचंड शुल्काचे हे अभ्यासक्रम नंतर गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्‍यांची मागण्या नोंदविणार्‍या आणि किमान मनुष्यबळ निर्माण करणारेच असतात. कोणाच्याही कौशल्यावर टीका करण्याचा यात हेतू नाही. मात्र, संपूर्ण व्यवसायच जर आज तोट्याच्या तारेवर कसरत करीत असेल, तर खर्चाला कुठूनतरी कात्री लावायलाच हवी. कंपन्या व बँकांमधली कर्जवाटप करण्याची वित्तीय शिस्त हादेखील मोठ्या चिंतेचा विषय आहे. व्यवसायाचे वाढीव आकडे आपल्या प्रस्तावात दाखवून कुठेतरी आपले उखळ पांढरे करणार्‍यांपासून बँकांनी सावध राहायला हवे. अशा कर्जाच्या रकमा अन्यत्र वळवूनच नीरव मोदी, विजय मल्ल्यासारखे लोक आपल्यासाठी आधीच सुरक्षित कोपरे निर्माण करून ठेवत असतात. बँका अशी कर्जे बुडित काढतात. जेव्हा अर्थव्यवस्था खराब असते, तेव्हा व्यापक हितासाठी सरकार या कर्जांच्या रकमांमधली काही जबाबदारी घेते आणि पुढे चक्रे सुरू राहतात. मात्र, जेव्हा स्थिती सुधारते, तेव्हा बँकांसमोर बुडलेल्या रकमा परत मिळविण्याची काहीच सोय नसते. कर्जाच्या रकमा तडजोड करून काही वर्षांनी नफ्यात आलेल्या कंपन्या आपल्याकडे आहेतच. स्टिल उद्योगात तर अशी कितीतरी उदाहरणे आहेत. तोटे भरून काढण्यासाठी वापरला गेलेला पैसा हा अखेर सर्वसामान्य करदात्याने भरलेल्या रकमेतूनच दिला जातो. पर्यायाने बँकेची कर्जे परत मिळावी. जेटचे विमान सुस्थितीत उडत राहावे, याला काहीच पर्याय नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0