
मादुरोंच्या कार्यपद्धतीवर ठपका ठेवत अमेरिकेने व्हेनेझुएलावर आर्थिक निर्बंध लादले आहेत.तेलाच्या निर्यातीवरच थेट बहिष्कारच टाकला आहे. त्यामुळे तेलनिर्यातीवरच जगणाऱ्या आणि फुलणाऱ्या व्हेनेझुएलाच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या. वीज नाही, पाणी नाही, देशात काही जास्त उत्पादन होत नाही. त्यामुळे जनतेचीअवस्था बिकट झाली आहे.
‘ग्लोरी ऑफ द ब्रेव्ह पिपल’ आणि त्याद्वारे ‘ग्लोरी ऑफ द ब्रेव्ह नेशन’ असे राष्ट्रगीत असलेल्या व्हेनेझुएला हा देश सध्या भयंकर ‘अनब्रेव्ह’परिस्थितीतून जात आहे. देशाच्या २३ पैकी २० राज्यांमध्ये गेले कित्येक दिवस वीजच नाही. त्यामुळे पाणी नाही, त्यामुळे सगळे व्यवहार ठप्प आहेत.एक हजार रुपयाला एक किलो भाजी आणि तितक्याच किंमतीत एक लिटर दूध विकत घ्यायची बिकट परिस्थिती या देशात निर्माण झाली आहे. हा देश मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला स्पेनच्या पारतंत्र्यातून स्वतंत्र झालेल्या व्हेनेझुएलामध्ये सध्या स्त्रियांची सध्याची स्थिती अधिक भयंकर आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, व्हेनेझुएलामधील ज्या महिला काही वर्षांपूर्वी शिक्षिका, डॉक्टर होत्या, त्या आता पोटाची खळगी भरण्यासाठी देहविक्री करण्याएवढ्या लाचार झाल्या आहेत. सुशिक्षित आणि इज्जतदार स्त्रियांची स्थिती ज्या देशात इतक्या दयनीय पातळीवर येते, त्या देशाची स्थिती कशी असेल, याचे चित्र न सांगताही समजते.
मागील दशकापर्यंत व्हेनेझुएला अत्यंत सधन आणि संपन्न देश होता. कच्च्या तेलाच्या खाणी असलेला हा देश जगभराच्या व्यापाराचा केंद्रबिंदू होता. या देशाची आर्थिक व्यवस्था पूर्णत: कच्च्या तेलाच्या निर्यातीवर अवंलबून होती. या देशाची ९६ टक्के अर्थव्यवस्था कच्च्या तेलावरतीच संपन्न झाली होती.मग या देशाची दुरवस्था का झाली? तर याला कारणीभूत आहे, या देशाची राजकीय परिस्थिती. जगापुढील घटनाक्रम आहे की, व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या काळात कोणताही विकास झाला नाही. जनतेचा रोजगार वाढला नाही. आपली सत्ता टिकवण्यासाठी मादुरो यांनी जनतेला असंख्य सवलती जाहीर केल्या. नव्याने झालेल्या निवडणुकांमध्ये मादुरोंच्या विरोधात खुआन यांनी रणशिंग फुंकले. यावेळी मादुरोंच्या सोबत देशाचे सैन्यप्रमुख होते, तर खुआन यांना जनाधार आहे असे दिसत होते. परंतु, निवडणुकीत मादुरो विजयी झाले. मात्र, त्याचवेळी खुआन यांनी मादुरोंवर निवडणूक मतदानाचा घोटाळा, अफरातफरी असे आरोप केले. खुआन यांनी जनतेला मादुरोंविरोधात रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले. त्यानुसार व्हेनेझुएलात रस्त्यावर लाखो लोक उतरले. या लोकांनी मादुरोंना विरोध आणि खुआन यांना पाठिंबा दिला. या आंदोलनात २६ लोक मृत्युमुखी पडले.
नेमक्या याच घटनेच्या पुढेमागे आंतरराष्ट्रीय स्तरावरही खूप काही घडत होते. व्हेनेझुएलादेश लॅटिन अमेरिकेतला. लॅटिन अमेरिकेला ‘अमेरिकेचा बगीचा’म्हणतात. मात्र, रशियाच्या तेल कंपनीने व्हेनेझुएलातीलएका कंपनीशी ५० टक्के भागीदारीही केली. इतकेच काय, रशियाच्या व्लादिमीर पुतीनने व्हेनेझुएलाला रशियाने दिलेल्या तीन अरब डॉलर्सच्या कर्जासंबंधीही चांगलीच आणि भरपूर सवलत दिली. गेल्या वर्षाच्या शेवटी रशियाने व्हेनेझुएलामध्ये सैन्यअभ्यासाचे प्रशिक्षण दिले. त्यामध्ये युद्धात उपयोगी पडणाऱ्या विमानांचेही प्रशिक्षण देण्यात आले. तसेच चीनशीही व्हेनेझुएलाचेचांगलेच सौख्य.चीनने या देशामध्ये भरपूर गुंतवणूक केली होती आणि तितकेच कर्जही दिले होते. रशियाने तर या लॅटिन अमेरिकेतल्या एका देशाला आपले समर्थक बनवले. अमेरिकेचे पूर्व उपरक्षामंत्री डेरेक चॉलेट या घटनांवर म्हणतात की, “हे सगळे कारस्थान रशिया करत आहे. कारण, तिला अमेरिकेला संदेश द्यायचा आहे की, ती ‘अमेरिकेच्या बागे’मध्ये म्हणजे लॅटिन अमेरिकेच्या देशात खेळेल आणि अमेरिकेला कितीही प्रतिकार करावासा वाटला तरी, तो ती करू शकणार नाही.”
त्यातच देशात कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुका होऊ नयेत, असे मत मादुरोंचे होते. पण निवडणुका झाल्या आणि मादुरो आणि खुआन यांच्यात संघर्ष पेटला. या वादात खुआन यांनी जेव्हा स्वत:ला राष्ट्राध्यक्ष घोषित केले, तेव्हा अमेरिकेसह ५० देशांनी त्यांना समर्थन दिले, तर मादुरो यांच्या सोबत केवळ रशिया, चीन आणि इतर दहा देश होते. मादुरोंच्या कार्यपद्धतीवर ठपका ठेवत अमेरिकेने व्हेनेझुएलावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. तेलाच्या निर्यातीवरच थेट बहिष्कारच टाकला आहे. त्यामुळे तेलनिर्यातीवरच जगणाऱ्या आणि फुलणाऱ्या व्हेनेझुएलाच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या. वीज नाही, पाणी नाही, देशात काही जास्त उत्पादन होत नाही. त्यामुळे जनतेचीअवस्था बिकट झाली आहे. दोन बलाढ्य महासत्तांच्या रणकंदनामध्ये व्हेनेझुएलाचेमरण ओढवले आहे. जगभरातल्या विकसनशील देशांनी कर्ज आणि गुंतवणुकीच्या परिणामांसाठी व्हेनेझुएलाचा अभ्यास करायलाच हवा.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat