मोदी नको!... पण कोणाला?

    दिनांक  12-Apr-2019   


 


‘मोदी नको’ म्हणणारे सर्वजण काहीही बोलोत, ते त्यांचे बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. सामान्य माणसाचे स्वातंत्र्य मत देण्याचे आहे. तो विचार नक्कीच करेल की, मोदींविरोधी ओरडणारी ही जी पलटण आहे, तिचे हेतू कोणते आहेत, मोदींनी त्यांचे काणते नुकसान केले आहे आणि या नुकसानीमुळे ते कसे चवताळलेले आहेत, हे सामान्य मतदार जाणून आहे.

 

लोकसभा निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. निवडणुकांमध्ये प्रचारकांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा कोणता? मुख्य मुद्दा विकास, संरक्षण, भ्रष्टाचार, बेरोजगारी, शेतकरी असा कोणताही नसून मुख्य मुद्दा ’मोदी हवेत की नकोत?’ हाच! ही संपूर्ण निवडणूक एकाच व्यक्तीभोवती केंद्रित झालेली आहे. हे चांगले की वाईट, याचा निर्णय ज्याचा त्याने केला पाहिजे. हाच मुद्दा वेगळ्या पद्धतीने काँग्रेसने २०१४ साली मांडला होता. तेव्हा त्यांची केंद्रात सत्ता होती. मोदी भाजपचे प्रमुख निवडणूक प्रचारक म्हणून मैदानात उतरले होते. म्हणजे भाजपने त्यांना उतरविले होते. हळूहळू मोदी हाच पक्षाचा चेहरा झाला. पक्षातील अन्य नेते मागे पडले, मोदींच्या सभा प्रचंड गर्दीच्या होऊ लागल्या आणि देशात मोदी लाट निर्माण झाली.

 

तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी मोदींना एका पाठोपाठ एकेक शेलकी विशेषणे लावली. ’मौत का सौदागर,’ ’नासूर,’ ’सामान्य कुवतीचा नेता’,’ ’मुस्लीम विरोधी’ वगैरे वगैरे... मतदारांवर त्याचा उलटा परिणाम झाला. जेवढ्या मोदींना शिव्या अधिक तेवढी मोदींची मते वाढत गेली. लोकं तेव्हा म्हणू लागले की, हा धडाडीचा नेता आहे, काम करतो, गुजरातचा विकास त्याने केला, त्याच्या मागे हे सगळे जणं का लागले आहेत? या सर्वांना धडा शिकविला पाहिजे. भाजपचीदेखील अपेक्षा नव्हती की, लोकसभेत त्यांना २८२ जागा मिळतील.

 

आताही तिच चूक काँग्रेस आणि त्याचे मित्रपक्ष करीत आहेत. जो तो उठतो तो मोदींना शिव्या घालतो. राहुल गांधी यांनी स्वत:ला मोदींच्या बरोबर नेऊन बसविले आहे. ‘५६ इंचाच्या छाती’चा उल्लेख त्यांनी ५६ वेळा तरी केला असेल. राफेलवरून त्यांनी भरपूर तोंडसुख घेतले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राफेल प्रश्नाचा निकाल लावलेला आहे. राहुल गांधी तो मानायला तयार नाही. राफेलचा वेग किती आहे, हे माहीत नाही. पण, राहुल गांधींच्या आरोपांचा वेग राफेलला मागे सारणारा आहे, हे मात्र खरे.

 

महाराष्ट्रात शरदराव पवार सध्या फडणवीसांविषयी कमी बोलतात, जवळजवळ नाहीच बोलत. फडणवीसांची ’पेशवाई’ ते हल्ली काढेनासे झालेले आहेत. त्यांना जिकडे तिकडे मोदीच दिसतात. ‘मोदींनी आमच्या कुटुंबावर टीका करू नये,’ ‘मोदींना कुटुंब आहे का?’ ‘मोदी म्हणजे खोटे बोलण्यात पटाईत,’ ‘मोदी देशापुढील महासंकट आहे’ इ. ‘पवारवक्तव्य’ आपण भरपूर ऐकत असतो. एक गोष्ट मात्र खटकली आणि ती म्हणजे, पवारांनी अजूनपर्यंत मोदींची जात काढलेली नाही. त्यामुळे काहीतरी राहून गेल्यासारखे वाटते.

 

ममता बॅनर्जी यांनी, तर पैजेचा विडा उचलेला आहे. त्यांना मोदींचा नुसता पराभवच करायचा नसून, राजकारणातून त्यांना हद्दपार करून टाकायचे आहे. ‘मोदी म्हणजे महासंकट आहे,’ असे त्यांचे मत आहे. ए. के. अ‍ॅन्टोनीसारखे नेते म्हणतात, ’‘जर मोदी निवडून आले, तर देशाचे संविधान बदलले जाईल आणि ही देशातील शेवटची निवडणूक असेल.” मोदींना अमेरिकेसारखी अध्यक्षीय पद्धतीची राजवट आणायची आहे, असेही काहीजणं बोलतात. ‘मोदींना निवडून देऊ नका, त्यांना निवडून दिले तर लोकशाही संकटात येईल. मोदी यांची हुकूमशाही निर्माण होईल. देशात धार्मिक तणाव प्रचंड वाढेल, देशाचे ऐक्य धोक्यात येईल,’ असे ज्याला जे सुचेल ते तो बोलत असतो.

 

शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांचे भाषण झाले. शिवसेनेचा दसरा मेळावा होतो, तर राज ठाकरे यांचा पाडवा मेळावा होतो. आम्ही लहानपणी एक म्हण ऐकत होतो, ’गुढीपाडवा, नीट बोल गाढवा.’ राज ठाकरे राजनेता आहेत, मी त्यांना ही म्हण लावू शकत नाही. आपल्या अनुयायांपुढे नेत्यांनी काय बोलावे, हा त्या नेत्याचा प्रश्न असतो. कसे बोलावे, हादेखील त्याचा प्रश्न असतो. कोणाविषयी बोलावे, हादेखील त्याचा प्रश्न असतो. आपण कोण सांगणार, असे बोल, तसे बोलू नका म्हणून?

 

मोदी आणि शाह हे देशापुढील मोठे संकट आहे,” असे राज ठाकरे म्हणाले. मोदी सरकारच्या अपयशाचा पाढा त्यांनी वाचला, त्यासाठी काही आकडेवारीदेखील दिली. एकूण भाषण खूप राजकीय करमणूक करणारे झाले, असे अनेकांचे मत पडले. थोड्याशा नकला, मिमिक्री असा सर्व मालमसाला असल्यामुळे भाषणात मजा आली. तशी निवडणूक प्रचारातील भाषणे फार ऐकण्यासारखी असतात, असे नाही. ‘मी किती चांगला आहे, आणि माझा पक्ष किती श्रेष्ठ आहे’ हे वक्ता सांगत राहतो आणि दुसरा उमेदवार कसा नालायक आहे आणि त्याच पक्ष कसा रद्दी आहे, हे तो हातवारे करून सांगतो. अशा भाषणात काही दम नसतो.

 

राज ठाकरे यांचे भाषण, त्यांचे उमेदवार उभे असते आणि ते निवडणुकांच्या रणांगणात असते, तर चांगले भाषण झाले असे म्हणता आले असते. स्वत: निवडणुकीच्या रिंगणात नाहीत, पक्षाचे कोणी उमेदवार नाहीत, काँग्रेस-राष्ट्रवादी जवळ करायला तयार नाहीत, मग अशी कोणती ’मजबुरी’ निर्माण झाली, की ज्यामुळे राज ठाकरे यांना भाजपवर तोफ डागावी लागली? आता त्यांच्या सात-आठ सभा महाराष्ट्रात होणार आहे आणि या प्रत्येक सभेत ते मोदी आणि शाह यांचे वाभाडे काढीत फिरणार आहेत, कशासाठी? राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी. काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळ घ्यायला तयार नाहीत आणि राज ठाकरे म्हणतात, ’मान ना मान मै तेरा मेहमान।’ हे काय गौडबंगाल आहे, हे न समजण्याइतके मतदार काही दूधखुळे नाहीत.

 

तसा विचार केला, तर शिवरायांच्या महाराष्ट्राला, शिवशाहीला, मराठी बाण्याला, मोदींचा प्रचंड अभिमानच वाटला पाहिजे. महाराजांनी शत्रूच्या गोटात शिरून त्यांना कापून काढले. शाहिस्तेखानाची बोटे छाटली आणि अफझलखानाचे पोट फाडले. मोदींनी प्रथम सर्जिकल स्ट्राईक केला आणि नंतर बालाकोटवर हवाई हल्ला केला. ‘तुम्ही आमचे दहा माराल, आम्ही तुमचे शंभर मारू,’ हा शिवसंदेश दिला. काश्मीरचा प्रश्नदेखील मोदीच सोडवतील, घटनेचे ‘३५ अ’ हे कलम आणि ‘३७०’ कलम काश्मीरला भारताशी जोडून ठेवत नाहीत. तिथे फुटीरतावाद निर्माण करतात. ही काँग्रेसची देशाला देणगी आहे. ती काँग्रेसला कायम ठेवायची आहे आणि मोदींना ती काढून टाकायची आहे.

 

राज ठाकरे यांनी हा शिवशाहीचा वारसा समजून घ्यायला पाहिजे होता. माणूस केवळ भाकरीवर जगत नाही, माणूस सन्मानाचा भुकेला असतो. भाकरी त्याला हवी तर असतेच, पण अपमानीत जीवन जगण्यापेक्षा मरण परवडले, हा स्वाभिमानी बाणा असतो. गेल्या पाच वर्षांत मोदींनी देशाला सर्वात मोठी देणगी कोणती दिली असेल, तर ती स्वाभिमानची आहे. मोदींची छाती ५६ इंचाची आहे की त्यापेक्षा कमी हे आम्हाला माहीत नाही. परंतु, गेल्या पाच वर्षांत त्यांनी ज्या गोष्टी केल्या आहेत, त्यामुळे प्रत्येक भारतीयाची छाती गर्वाने फुगून आलेली आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच आम्हा सर्वांना आमचे जागतिक लक्ष्य कोणते याची हळूहळू जाणीव होऊ लागली आहे. आम्ही समृद्धी मिळवायची आहे, पण कशासाठी? हे सामान्य माणसाला हळूहळू समजू लागले आहे. ‘मोदी नको’ म्हणणारे सर्वजण काहीही बोलोत, ते त्यांचे बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. सामान्य माणसाचे स्वातंत्र्य मत देण्याचे आहे. तो विचार नक्कीच करेल की, मोदींविरोधी ओरडणारी ही जी पलटण आहे, तिचे हेतू कोणते आहेत, मोदींनी त्यांचे काणते नुकसान केले आहे आणि या नुकसानीमुळे ते कसे चवताळलेले आहेत, हे सामान्य मतदार जाणून आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat