कोकणच्या समुद्र किनार्‍याला साथ गोदेची !

    दिनांक  12-Apr-2019   


कोकणची भूमी निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या बागा, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडे आणि डोंगरउतारावर केलेली भातशेती.....  

निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे
. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही या कोकणपट्ट्यातच. त्यामुळे कोकणातला प्रत्येक घरातला माणूस मुंबईत असल्यामुळे भावकी मुंबईत आहे, नातेगोते मुंबईत आहे, त्यामुळे मुंबईत आल्यावर कोकणवासीयांना गाव सोडल्याचे जाणवत नाही. परंतु, अन्य कुठेही गेले, तर लांब गेल्यासारखे वाटते. याच भावनेतून कोकणातून नाशिकमध्ये आलेल्या कोकणवासीयांना वाटले की संघटित होऊन राहावे. सन १९८४ साली लक्ष्मण देवस्थळी, विष्णू महाडिक, मनोहर पारकर, नंदकुमार बने, अरविंद बापट, . आर. महाजन, दीपक गावडे, सुनील दळवी, चंद्रकांत पाटकर, मनोहर आपटे, धोंडिबा वेंगुर्लेकर, राघोबा लाड इ. कोकणवासीयांनी एकत्र येऊन नाशिकमध्ये  ‘रत्न-सिंधु मित्रमंडळाची स्थापना केली. सन १९८७ साली मंडळ नोंदणीकृत करण्यात आले. तेव्हा उद्देश मात्र एवढाच होता की, आपण संघटित होऊन राहावे. एकमेकांच्या सुख-दुःखातसहभागी व्हावे.


कालांतराने लक्ष्मण देवस्थळी, विष्णू महाडिक, मनोहर पारकर, धोंडिबा वेंगुर्लेकर यांनी या मंडळाचे अध्यक्षपद भूषवत खूप मोठ्या संख्येने सदस्य संघटित केले. तद्नंतर सन १९९९ साली दत्तात्रय नाईक अध्यक्ष मंडळाला लाभले. त्यांनी नाशिक शहरामध्ये सहा विभाग करून विस्तारित केले. त्यामुळे मंडळाला एक वेगळी कलाटणी मिळाली. तद्नंतर आर्कि. अरविंद झारापकर, कॅ. धर्मवीर धुरी, मंगेश पालव यांच्या अध्यक्षतेखाली ‘दशावतार,’ ‘जाखडी नृत्य,’ ‘माझी माय मराठी,’ ‘गर्जतो मराठा’ आदी विविध उपक्रम राबवून मंडळाची आर्थिक बाजू मजबूत करण्यात आली. संजय साटलकर, लक्ष्मण तानवडे आणि आता परशुराम कानकेकर हे अध्यक्षपदी काम करत आहेत. आतापर्यंत दरवर्षी २६ जानेवारीला झेंडावंदन, श्री सत्यनारायण महापूजा, सांस्कृतिक कार्यक्रम , क्रिकेट स्पर्धा, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, शिर्डीला पायी चालत जाणार्‍या साईभक्तांसाठी ताक, सरबत यांचे वाटप; तसेच १५ ऑगस्ट रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा व विद्यार्थी गुणगौरव समारंभ असे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. याव्यतिरिक्त कोकणातील सणवार व कोकण संस्कृती नाशिकमधील नागरिकांना समजावी, या उद्देशाने ‘जल्लोष कोकण’चा हा कार्यक्रम कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित करण्यात येत असतो. तसेच मागील पाच वर्षांपासून नाशिकमध्ये डोंगरे वसतिगृह येथे भव्य असा कोकण महोत्सव आयोजित केला जात आहे. याचा उद्देश असा की, कोकणातील शेतीमाल, कोकणातील खाद्यपदार्थ यांना बाजारपेठ मिळावी, नाशिकमधील तरुणांना व्यवसाय मिळावा व नाशिककरांना जसेच्या तसे वाजवी दरात कोकणी पदार्थ मिळावेत यासाठी हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरतो. आजकाल तरुणांना नोकर्‍या मिळत नाहीत. मग, त्यांनी व्यवसाय करावा व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा म्हणून उत्तम व्यवसाय मार्गदर्शक व शासकीय अधिकारी बोलवून व्यवसाय मार्गदर्शन शिबीरदेखील आयोजित करण्यात येत असते. राजीवनगर अल्को मार्केट येथे मंडळाचे स्वत:चे कार्यालय आहे.

 

मंडळाच्या सदस्यांना नोकरीसाठी, व्यवसाय देण्यासाठी मंडळ कार्यरत आहे. विवाह समिती कार्यरत आहे. यापुढे मंडळातील तरुणांना मार्गदर्शन करून कोकण पर्यटन या व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न आहे. मंडळाची मोठी वास्तू नाशिकमध्ये असावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.आतापर्यंत केलेल्या कार्याने नाशिकमध्ये असलेल्या विवाह समितीच्या माध्यमातून इथल्या इथे लग्न जुळवली जात आहेत. आपले कुटुंब समजून प्रत्येक सदस्य एकमेकाला कार्य-समारंभात मदत करतात. या मंडळाच्या माध्यमातून मुलांना नोकर्‍या मिळू लागल्या, व्यवसाय उभे राहू लागले व निश्चितच काहींनी गावी घरं बांधली, काहींनी शेती विकसित केली, काहींनी गावी असणार्‍या कुटुंबीयांना व्यवसाय करण्यास साहाय्य केले. त्यामुळे कोकणच्या विकासातही नाशिकच्या माध्यमातून भर पडली.

 

कोकण ही देवभूमी... परशुरामाची भूमी. सृष्टीकर्त्याने भरभरून दिलेले निसर्गाचे वरदान. अशा समृद्ध कोकणातली माणसे खरंच देवभोळी. फणसातल्या गर्‍यासारखी मऊ आणि कोमल, तरल स्वभावाची. जिथे जातील तिथे जीव लावणारी म्हणूनच म्हटले आहे, ‘कोकणची माणसं साधीभोळी । काळजात त्यांच्या भरली शहाळी...’ त्यांच्या याच स्वभावानुसार आजही नाशिकमध्ये जिथे जिथे ‘रत्नसिंधु’चे सदस्य राहतात तिथे सद्वर्तन, सदाचार अंगी बाणून, दुसर्‍याला मदत करायची भावना ठेवून, प्रसंगी दुसर्‍यासाठी धावून, उत्कृष्ट समाजकार्य करून, लोकप्रतिनिधींशी चांगले संबंध ठेवून, समाजात स्वत:चे स्थान निर्माण करून आहेत. याबाबत येथील कोकणवासीय सांगतात की, “नाशिकमध्ये आम्हाला परकेपणा वाटला नाही. नाशिककरांनी आम्हाला भरभरून प्रेम दिले.

 

कोकण आमची जन्मभूमी असली तरी, नाशिक आमची कर्मभूमी आहे आणि या नाशिक पुण्यभूमीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कोकणात जसा विस्तीर्ण समुद्र किनारा आहे, तसाच नाशिकमध्ये गोदाकाठ आहे. समुद्र किनारी पर्यटन आहे, मासेमारी आहे तशीच गोदाकाठी हिरवीगार शेती आहे, बागायती आहे, पवित्र कुशावर्त, रामकुंड असल्यामुळे भक्तिभाव, श्रद्धा याचे दर्शन होते, धार्मिक विधी होताना दिसतात. अशा या नाशिकमध्ये आम्ही कार्यरत आहोत.” हा आमचा भाग्योदय असल्याचे मतदेखील नाशिकमधील कोकणवासीय व्यक्त करत असतात. मंडळाचे कार्यक्रम हे अत्यंत शिस्तबद्ध व वाखाणण्याजोगे असतात. त्यामुळेच शिर्डी साई संस्थानच्यावतीने मंडळाचा गौरवदेखील करण्यात आला आहे. तसेच ‘अखिल मराठा फेडरेशन’च्यावतीने अतुलनीय सामाजिक योगदानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल ‘महाराष्ट्र राज्य वारकरी संप्रदाय’ यांच्यावतीने ‘विश्व वारकरी सेवारत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. मंडळाच्या कार्याची दखल घेऊन नाशिक पत्रकार संघाच्यावतीनेदेखील या मंडळाचा यथोचित गौरव करण्यात आला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat