निवडणुकीत प्रदेशाध्यक्षांचा ‘शोक’

    दिनांक  11-Apr-2019


स्वपक्षाचे सरकार अस्थिर, तर नेत्यांना कायम अस्वस्थ ठेवण्याच्या अघोरी पद्धतीलाच ‘काँग्रेसी राजकारण’ म्हटले तर वावगे ठरणार नाही. केंद्रातून तसेच महत्त्वाच्या राज्यांमधून काँग्रेस सत्तेबाहेर फेकली गेली असली तरी त्यांचे हे राजकारण काही थांबायला तयार नाही. प्रभावी नेत्यांना एका मर्यादेपलीकडे मोठे होऊ न देणे, पक्षातच त्यांना तुल्यबळ स्पर्धक तयार करणे, त्यांच्या मनाप्रमाणे पक्षातील नियुक्त्या न करणे, ही काँग्रेसच्या राजकारणाची पारंपरिक पद्धत. लोकसभा निवडणुकीच्या गडबडीत या पद्धतीचा फटका यावेळी थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना बसला आहे. सध्या काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक चव्हाण नांदेडमध्येच स्वतःच्या प्रचारात व्यस्त आहेत. ते प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांनी पक्षाच्या प्रचारासाठी राज्यभर फिरणे अपेक्षित आहे. परंतु, ते स्वतःच्या मतदारसंघातून बाहेरच पडत नसल्याने राज्यभरातील काँग्रेसच्या उमेदवारांची अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत आहे. ‘कप्तानाशिवाय जहाज’ अशी सध्या राज्यातील काँग्रेसची अवस्था. त्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे कोणत्याही क्षणी भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी परिस्थिती आहे. विखेंनी तर काँग्रेसचा प्रचार करणे कधीचेच थांबवले आहे. जालन्यात अर्जुन खोतकर व औरंगाबादेत हर्षवर्धन जाधव यांचा काँग्रेस प्रवेश करून घ्यायचा व त्यांना काँग्रेसतर्फे उमेदवारी द्यायची, अशी व्यूहरचना अशोकरावांनी आखली होती. तसे नियोजनही झाले होते. पण, ऐनवेळी खोतकर व जाधवांनी काँग्रेस प्रवेश टाळल्याने अशोकराव तोंडावर आपटले. त्यामुळे दिल्लीतील पक्षश्रेष्ठीही त्यांच्यावर नाराज झाले. या घडामोडीमुळे पक्षश्रेष्ठींनी नांदेडमधील लोकसभेची उमेदवारीही अशोकरावांच्या गळ्यात मारली. त्यांना यावेळी दिल्लीऐवजी मुंबई खुणावत होती. त्यामुळे त्यांनी नांदेड लोकसभेसाठी पत्नी आ. अमिता चव्हाण यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती. परंतु, पक्षश्रेष्ठींनी त्यांची ही मागणी धुडकावत त्यांनाच खासदारकी लढविण्याचा आदेश दिला. यावर नाराज होऊन ते नांदेडातच तळ ठोकून बसल्याची चर्चा आहे. त्यातच भाजपकडून प्रतापराव पाटील-चिखलीकरांनी जोर लावल्याने अशोकराव दक्ष झाले आहेत. मात्र, पक्षश्रेष्ठींवरील नाराजी हेच अशोकराव नांदेडातून बाहेर न पडण्याचे खरे कारण असल्याचे समजते.

 

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये शांतता

 

ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेसमध्ये नीरव शांतता आहे. प्रदेशाध्यक्ष स्वतःच्या मतदारसंघात व्यस्त, तर विरोधी पक्षनेते पक्षाचे काम करण्याच्या मनस्थितीत नाहीत, अशी पक्षाच्यादृष्टीने अत्यंत प्रतिकूल परिस्थिती सध्या काँग्रेसमध्ये आहे. राज्याच्या दोन बड्या नेत्यांची ही अवस्था असल्याने इतर नेत्यांमध्येही मरगळ आल्याचे चित्र आहे. काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचा ‘आता नाही तर कधीच नाही,’ अशा पद्धतीने प्रचार सुरू असल्याने काँग्रेसमधील मरगळ अजूनच उठून दिसते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, महिला नेत्या यशोमती ठाकूर हे नेते आपापल्या जिल्ह्यांमध्ये पक्षाचा प्रचार करत आहेत. परंतु, काँग्रेसचा कोणताही नेता अंग मोडून पक्षाच्या कामाला लागल्याचे दिसत नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या दोन प्रचारसभा महाराष्ट्रात झाल्या. त्यावेळी काँग्रेसमध्ये उत्साह पसरल्याचे दाखवले गेले होते. परंतु, पक्षाध्यक्षांची पाठ फिरताच काँग्रेसवाल्यांचे ‘ये रे माझ्या मागल्या’ सुरू झाले. काँग्रेसमधील एक चव्हाण (अशोक) नाराज झाल्याने दुसरे चव्हाण (पृथ्वीराज) खुश झाल्याची शक्यता आहे. परंतु, या दुसर्‍या चव्हाणांच्या खुशीचा आजतागायत पक्षाला काही फायदा झाला नाही, असे खुद्द काँग्रेस कार्यकर्त्यांचेच म्हणणे असते. दुसर्‍या चव्हाणांनी फक्त पश्चिम महाराष्ट्रात लक्ष घातले तरी खूप झाले, असे काँग्रेसमध्येच बोलले जाते. काँग्रेसच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या या दोन तर्हा असल्याने दिल्लीतील पक्षश्रेष्ठीही हतबल असल्याचे चित्र आहे. निवडणुकीच्या बरेच महिने आधी महाआघाडी वगैरे करण्याचा गलका करणार्‍या काँग्रेसने आता प्रत्यक्ष मतदानाआधीच शस्त्रे खाली ठेवल्याचे चित्र आहे. आधीच ‘सनातन’च्या व्यासपीठावर भाषण ठोकलेल्या नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसमध्ये गोंधळ उडाला होता. तसेच उमेदवारीच्या आश्वासनानंतरही चंद्रपूरच्या बाळू धानोरकरांना सुरुवातीला तिकीट नाकारले गेल्याने पक्षातील तिकीटवाटपाच्या सावळ्या गोंधळाचे रसभरीत वर्णन माध्यमांमध्ये छापून आले होतेच. अखेर बांगडे यांना दिलेली उमेदवारी बदलल्यावरच हा गोंधळ थांबला. पक्षाचे राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे खमके प्रशासक आहेत. परंतु, वाढत्या वयोमानामुळे व गुलबर्ग्यात त्यांची भाजपच्या मराठमोळ्या डॉ. उमेश जाधवांनी कोंडी केल्याने त्यांनाही महाराष्ट्राकडे बघण्यास सध्या वेळ नाही. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसवर ऐन निवडणुकीत निर्णायकी वेळ आलीय, एवढे मात्र नक्की.


- शाम देऊलकर 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat