भारतीय उद्योगातला 'स्पार्क' - 'इंडोस्पार्क'

    दिनांक  11-Apr-2019   


संदीप इंगळे यांनी काळाची पावलं ओळखून एका वेगळ्या उद्योगात हात घातला. काँक्रिट कटिंगचा. या व्यवसायात मनुष्यबळ महत्त्वाचे असते. यासाठी इंगळेंनी संघबांधणी केली. बेल्लारी येथील एका प्रकल्पामध्ये २५० टन काँक्रिट अवघ्या ३६ तासांत कापण्याचे आव्हानात्मक काम कंपनीने आत्मविश्वासाने पार पाडले. मुंबईच्या समुद्रात दीड मीटर खोल उतरून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या समुद्राखालील बीम कटींग, कोयना धरणात पाणबुड्यांच्या साहाय्याने भोक पाडून वॉटरगेट बसविण्याचे आव्हानात्मक काम, ओडिशाच्या आयआयटी फॅक्टरीमधलं काम बंद न करता केलेलं काँक्रिट कटिंग या सगळ्या कामामुळे कंपनी अल्पावधीत नावारूपास आली. हा उद्योगसुद्धा त्यांनी भरभराटीस आणला.

 

कोल्हापूर, शाहूमहाराजांची पुण्यनगरी. तात्यासाहेब कोरेंची वारणानगरी याच खोर्‍यातली. वारणानगरीने महाराष्ट्राला स्वयंरोजगाराचे धडे दिले. हे धडे गिरवून अनेक उद्योजक घडले. याच मातीतले प्रेमचंद इंगळे. यांनी तर ४०च्या दशकात म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळात विड्या तयार करण्याचा कारखाना सुरू केला होता. तांत्रिक कारणास्तव हा कारखाना बंद पडला. मात्र, त्यांनी सुरू केलेली उद्योजकता त्यांच्या मुलात रुजली, नातवांमध्ये बहरली. एका मोठ्या उद्योगसमूहाच्या रूपाने कोटी रुपयांच्या उलाढालीच्या स्वरूपात ती विस्तारतेय. ‘इंडो स्पार्क’ हा तो समूह. तिलकचंद इंगळे आणि त्यांचे सुपुत्र सचिन व संदीप या इंगळे पिता -पुत्राच्या उद्यमी प्रवासाची ही कथा.

 

जयसिंगपूरमधलं इंगळे कुटुंब तसं उद्यमशील वृत्तीचं. प्रेमचंद इंगळे यांनी तर थेट आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच विडीचा कारखाना सुरू केला होता. त्यांचा मुलगा तिलकचंद यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. शिक्षण संपल्यावर एका मोठ्या कंपनीत सेल्समन म्हणून त्यांनी नोकरीस सुरुवात केली. अगदी २५० रुपये पगार होता त्यावेळचा. आठ वर्षे नोकरी केल्यानंतर मॅनेजर पदापर्यंत त्यांचा प्रवास झाला होता. आपल्या वडिलांसारखंच आपणसुद्धा उद्योजक व्हायचं, हे कुठेतरी मनात होतंच. १९७८ साली जवळ साठवलेल्या १० हजार रुपयांची गुंतवणूक करून वाहनांच्या सुट्ट्या भागांची विक्री करणार्‍या ‘स्पार्क अ‍ॅण्ड स्पीड’ या कंपनीची स्थापना झाली. लक्ष्मीपुरी येथे एक छोटंसं पडिक घर भाड्याने घेतलं. मात्र त्याच्या दुरुस्तीलाच तीन-चार हजार रुपये गेले. उरलेल्या पैशातून त्यांनी व्यवसाय सुरू केला. सकाळी कंपनीतून उधारीवर माल आणायचा. इस्लामपूर, कोल्हापूर वणवण भटकून माल विकायचा आणि कंपनीची उधारी चुकती करायची. परत दुसर्‍या दिवशी सकाळी हाच दिनक्रम असायचा. प्रचंड मेहनतीच्या जोरावर बाजारपेठेत त्यांनी नाव कमावलं.

 

त्यांच्या या नावामुळेच ‘बॉश’ या जगद्विख्यात कंपनीची १९८२ साली त्यांना डीलरशिप मिळाली. १९८३ साली त्यांनी सर्व्हिसिंगपण सुरू केली. दरम्यान तिलकचंद यांची मुले सचिन आणि संदीप शिक्षण घेत होती. मोठा सचिन वाणिज्य पदवीच्या दुसर्‍या वर्गात, तर संदीप अभियांत्रिकीच्या डिप्लोमा वर्गात शिकत असतानाच तिलकचंद यांनी ‘बॉश’ची अजून एक शाखा सुरू केली. सचिन आणि संदीप कॉलेजचे लेक्चर्स करून ऑफिसला यायचे. तीन वर्षे हा दिनक्रम सुरू होता. १९९४ साली डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर संदीप यांनी ‘बॉश पॉवर टूल्स’ सुरू केली. या कंपनीच्या मार्केटिंगसाठी कराड ते रत्नागिरी, तर इकडे गडहिंग्लज, इस्लामपूर असं सतत फिरावं लागे. १९९६ साली त्यांनी बॉश इंजिन ऑईलची विक्री सुरू केली. अवघ्या दोनच वर्षांत ते महाराष्ट्रातील सर्वांत जास्त विक्री करणारे दुसर्‍या क्रमांकाचे वितरक ठरले. सन २००८ मध्ये केमिकल अँकर्स आयात करून त्यांनी वितरकांचं जाळं उभारण्याचा निर्णय घेतला. यासाठी थेट परदेशात जाऊन अभ्यासदौरे केले. इंग्लंडमधील ‘सीएफएस’ या कंपनीसोबत सहकार्य करार केला.

 

संदीप इंगळे यांनी काळाची पावलं ओळखून एका वेगळ्या उद्योगात हात घातला. काँक्रिट कटिंगचा. या व्यवसायात मनुष्यबळ महत्त्वाचे असते. यासाठी इंगळेंनी संघबांधणी केली. बेल्लारी येथील एका प्रकल्पामध्ये २५० टन काँक्रिट अवघ्या ३६ तासांत कापण्याचे आव्हानात्मक काम कंपनीने आत्मविश्वासाने पार पाडले. मुंबईच्या समुद्रात दीड मीटर खोल उतरून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या समुद्राखालील बीम कटींग, कोयना धरणात पाणबुड्यांच्या साहाय्याने भोक पाडून वॉटरगेट बसविण्याचे आव्हानात्मक काम, ओडिशाच्या आयआयटी फॅक्टरीमधलं काम बंद न करता केलेलं काँक्रिट कटिंग या सगळ्या कामामुळे कंपनी अल्पावधीत नावारूपास आली. हा उद्योगसुद्धा त्यांनी भरभराटीस आणला. आज सांगली, पुणे, मुंबई या ठिकाणी कंपनीच्या शाखा आहेत. याचदरम्यान आपलं स्वतंत्र अस्तित्व असावं म्हणून त्यांनी ‘सीएफएस’ कंपनीसोबतचा करार वाढवला नाही. ‘आयसीएफएस’ या नावाने नवीन कंपनीची निर्मिती केली. आज जगभरातले ब्रॅण्ड्स या कंपनीच्या नावाने आयात केले जातात. सन २०१५ साली कंपनीच्या इतिहासात एक सुवर्णपान लिहिलं गेलं. कंपनीच्या टीमने १०२१ रिबार अवघ्या ३८ मिनिटे ५२ सेकंदात फिट केले. हा एक विक्रम मानला जातो. याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये झाली. वितरक जाळ्याद्वारे महाराष्ट्राबाहेर इंगळे यांनी हा व्यवसाय विस्तारलेला आहे.

 

संदीप इंगळेंचा हा उद्योजकीय प्रवास अनेकार्थाने खडतर आहे. कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देणे, त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना जबाबदार्‍या देणे, या प्रक्रियेत काही वेळेस ते फसले गेले. मात्र, नकारात्मकतेतून सकारात्मकता शोधणार्‍या इंगळेंनी हे सर्व संधी म्हणून पाहिले आणि नवीन शिलेदार तयार केले. हे शिलेदार कंपनीची धुरा उत्तमरित्या वाहत आहेत. आज ’इंडो स्पार्क’ उद्योगसमूहाची उलाढाल १४ कोटी रुपयांच्या आसपास आहे. १३० कर्मचार्‍यांचं हे कुटुंब विस्तारत आहे. या उद्योगसमूहाने नुकतीच चाळीशी गाठली. मात्र, जोश आणि उत्साह अगदी स्टार्ट अपसारखाच आहे. उद्योग सुरू करणे सोपे असते. अवघड असते ते संवर्धन करणे आणि त्याचा विस्तार करणे. इंगळे कुटुंबीय या तिन्ही प्रक्रियांमध्ये तरबेज आहेत. नव्हे, तो तर त्यांचा ‘स्पार्क’ आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat