मुंबई शेअर बाजाराची चाळिशी

    दिनांक  11-Apr-2019   
 


दि. १ एप्रिल, २०१९ रोजी मुंबई शेअर बाजाराला ४० वर्षे पूर्ण झाली. शेअर बाजार अस्तित्वात आल्यानंतरच्या काळात झालेला चांगला पाऊस व कंपन्यांची चांगली कामगिरी यामुळे शेअर निर्देशांक अकरा वर्षांनंतर एक हजार अंशांचा टप्पा पार करु शकला. हर्षद मेहता घोटाळ्यामुळे शेअर बाजारात जो बुडबुडा निर्माण झाला होता, त्यामुळे एप्रिल १९९२ मध्ये निर्देशांकाने चार हजार अंशांचा पल्ला गाठला.

 

शेअर बाजारात जर अभ्यासपूर्वक व सुज्ञपणे गुंतवणूक केली तर सर्व गुंतवणूक प्रकारांच्या तुलनेत शेअर बाजारातील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो. ज्यांनी १९७९ साली (शेअर बाजार सुरू झालेले वर्ष) बँकांच्या ठेवीत रु. दहा हजार गुंतवणूक केली असेल, त्याचे आताचे मूल्य २ लाख, ६८ हजार, ११४ रुपये झाले आहे. सोन्यात १० हजार रुपये गुंतवणूक केली असेल तर त्याचे आजचे मूल्य ४ लाख, ८ हजार, ४७४ रुपये आहे व जर शेअर बाजारात गुंतवणूक केली असेल तर, त्याचे आजचे मूल्य ४५ लाख, २८ हजार, ५६८ रुपये इतके आहे.

 

देशाची आर्थिक स्थिती, आर्थिक बदल शेअर बाजारातील उलाढालीवरून लक्षात येतात. मुंबई शेअर बाजार निर्देशांकाने (सेन्सेक्स) २००६ यावर्षी १० हजारांचा पल्ला गाठला होता, २००७ साली २० हजारांचा, २०१७ साली ३० हजारांचा पल्ला गाठला, तर १ एप्रिल, २०१९ रोजी ३९ हजारांचा पल्ला गाठला होता. ४० वर्षांपूर्वी १०० अंशांनी सुरू झालेल्या निर्देशांकाने ४० वर्षांत ३९ हजारांपर्यंत मजल मारली. निर्देशांकाने १ हजार अंशाचा पल्ला गाठायला ११ वर्षे लागली होती. १९९० मध्ये निर्देशांकाने एक हजारचा पल्ला गाठला होता, तर त्यापुढील एक वर्षात निर्देशांकाने तीन हजार अंशांचा टप्पा पार केला. या काळात शेअर बाजारात हर्षद मेहता घोटाळा झाला होता. पण, हा घोटाळा उघडकीस आल्यामुळे, शेअर बाजारच्या कार्यपद्धतीत चांगले बदल करण्यात आले. याच कालावधीत भारतात ‘खाजाऊ’ (खाजगीकरण, जागतिकीकरण व उदारीकरण) ही धोरणे अमलात आली. यामुळे शेअर बाजाराच्या कारभारात बरीच मुक्तता आली. १९९२ साली हर्षद मेहता घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेअर निर्देशांकाने चार हजार अंशांचा टप्पा गाठला होता. तो पाच हजार होण्यास सात वर्षे लागली.

 

१९९९ मध्ये शेअर निर्देशांक पाच हजार अंशांवर पोहोचला. या कालावधीत जुन्या कंपन्यांच्या शेअर्सचे ट्रेडिंग कमी होऊन ‘आयटी’ उद्योगातील कंपन्यांच्या शेअर्सचे ट्रेडिंग वाढले. इन्फोसिस लिमिटेड, टीसीएस लिमिटेड वगैरे कंपन्यांची उलाढाल वाढली. चीनची उत्पादने जगभर उपलब्ध झालेल्या कालावधीत २००६ मध्ये शेअर बाजार निर्देशांकाने १० हजार अंशांचा टप्पा पार केला. डिसेंबर २००७ मध्ये २० हजार अंशांचा टप्पा पार केला. डिसेंबर २००७ ते जून २००९ या काळात अमेरिकेला ‘सबप्राईम मॉर्गेज’ समस्येने ग्रासले होते. याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होऊन जगभर मंदी आली होती, पण याची झळ इतर देशांप्रमाणे तसेच इतर देशांइतकी भारताला बसली नाही. कारण, त्यावेळी भारताच्या पंतप्रधानपदी अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग होते. पण, या समस्येची झळ मुंबई शेअर बाजाराला प्रचंड बसून, शेअर बाजार निर्देशांक ६४ टक्क्यांनी खाली आला आणि ऑक्टोबर २००८ मध्ये शेअर बाजार निर्देशांक ८ हजार, ५०० अंशांपर्यंत खाली आला. ‘सबप्राईम मॉर्गेज’ समस्येमुळे डिसेंबर २००७ मध्ये २० हजार अंशांपर्यंत वर गेलेला निर्देशांक ऑक्टोबर २००८ मध्ये ८५०० अंशांपर्यंत खाली आला.

 

शेअर बाजार अस्तित्वात आल्यानंतरच्या काळात झालेला चांगला पाऊस व कंपन्यांची चांगली कामगिरी यामुळे शेअर निर्देशांक अकरा वर्षांनंतर एक हजार अंशांंचा टप्पा पार करु शकला. हर्षद मेहता घोटाळ्यामुळे शेअर बाजारात जो बुडबुडा निर्माण झाला होता, त्यामुळे एप्रिल १९९२ मध्ये निर्देशांकाने चार हजार अंशांचा पल्ला गाठला. शेअर निर्देशांक हा शेअर बाजाराची प्रगती दाखवितो. शेअर बाजारातील कामगिरीचा तो निर्देशांक असतो. शेअर बाजारात काम सुरू असताना हा सतत वरखाली होत असतो. रोज शेअर बाजार बंद होताना याचे जे प्रमाण असते, तो त्या दिवशीचा निर्देशांक समजला जातो. अगोदरच्या दिवसाच्या आकड्याच्या तुलनेत हा जर वर असेल, तर शेअर बाजारात तेजी समजली जाते. अगोदरच्या दिवसाच्या तुलनेत खाली असेल तर मंदी समजली जाते. हर्षद मेहता घोटाळ्याच्या वेळी बर्‍याच छोट्या- मोठ्या कंपन्यांनी शेअर विक्रीस काढले होते. त्यावेळची शेअर बाजारातली तेजी लक्षात घेऊन बर्‍याच लोकांनी हे शेअर विकत घेतले होते. मात्र, या कंपन्या उभ्याही राहिल्या नाहीत आणि गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. हर्षद मेहता घोटाळा ही शेअर बाजाराच्या कारकिर्दीला लागलेला काळिमा आहे.

 

आयटी क्षेत्राच्या जागतिक तेजीमुळे २००० साली शेअर बाजाराने पहिल्यांदा पाच हजार अंशांचा व नंतर सहा हजार अंशांचा पल्ला गाठला. देशाची आर्थिक व्यवस्थेवर नियंत्रणे होती, तेव्हा देशात परदेशी गुंतवणूक फार होत नसे. पण, आपण अर्थव्यवस्था मुक्त केल्यानंतर शेअर बाजारात परदेशी संस्थांची गुंतवणूक वाढून मुंबई शेअर बाजार निर्देशांकाने २० हजार अंशांची मजल मारली.·नोव्हेंबर २०१० मध्ये निर्देशांक २१ हजार अंशांवर पोहोचला होता. पण, युरोपातील ‘डेट’ समस्या व रुपयाच्या घसरणीमुळे परदेशी संंस्थांनी शेअर बाजारातील काढून घेतलेल्या गुंतवणुकीमुळे डिसेंबर २०११ मध्ये शेअर निर्देशांक १५ हजार अंशांपर्यंत खाली आला होता. आर्थिक सुधारणा व आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या घसरलेल्या किमती यामुळे २०१७ मध्ये निर्देशांक तीस हजारांवर गेला. आर्थिक सुधारणा होतील, या अपेक्षेने शेअर निर्देशांकाने ४०व्या वर्धापन दिनी ३९ हजार निर्देशांकाचा पल्ला गाठला.

 

शेअर निर्देशांकात १९७९ ते २०१९ या ४० वर्षांच्या कालावधीत १६.१ टक्के दराने एकत्रित वार्षिकवृद्धी झाली. वार्षिक वृद्धीचा हा दर होता. परताव्याचा विचार केला तर तो १७ टक्के दराने मिळाला. या दराने परतावा इतर कोणत्याही गुंतवणुकीत मिळत नाही. या कालावधीत सोन्यात गुंतवणूक करणार्‍यांना १० टक्के परतावा मिळाला. शेअर बाजारातील गुंतवणुकीत चांगला परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही शेअर बाजारात तुमची गुंतवणूक दीर्घकाळ ठेवावयास हवी. जागतिक आर्थिक मंदीनंतरच्या पाच वर्षांत शेअर निर्देशांकात १५० टक्के वाढ झाली, तर एकत्रित वार्षिक वृद्धी दरात २० टक्के वाढ झाली. भारताची आर्थिक व्यवस्था रूळावर असते, तेव्हा शेअर बाजारात तेजी असते. जेव्हा भारताची आर्थिक व्यवस्था समस्याग्रस्त असते, तेव्हा शेअर बाजारात मंदी असते. शेअर बाजार हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आरसा आहे. शेअर बाजार कोणत्या कारणाने घसरेल किंवा कोणत्या कारणाने वर जाईल, याचे निश्चित नियम नाहीत. असे मस्करीत म्हटले जाते की, “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प शिंकले तर या कारणानेही शेअर बाजार घसरू शकतो.”

 

गेल्या ४० वर्षांच्या शेअर बाजाराच्या कामकाजाचा आढावा घेतल्यास शेअर बाजार आर्थिक नसलेल्या कारणांनीच जास्त वेळा वधारला आहे किंवा घसरला आहे. जागतिक घडामोडींचा परिणामही शेअर बाजारावर होतो. निवडणुकांचा, कोणते सरकार आले, याचा परिणामही शेअर बाजारावर होत असतो. भारतात या निवडणुकीनंतर कम्युनिस्टांचे सरकार आले (ते येणार नाही, हे निश्चित)तर शेअर बाजार नक्की कोसळेल. साम्यवादी, कम्युनिस्ट, समाजवादी, डाव्या विचारसरणीचे या राजकीय पक्षांची शेअर बाजाराला अ‍ॅलर्जी आहे. यापेक्षा आर्थिक विचार व शेअर बाजाराची कार्यपद्धती यात बरीच तफावत आहे. शेअर बाजार उजव्या विचारसरणीच्या पक्षांचे स्वागत करतो. कोणत्याही नवीन गुंतवणूकदाराने शेअर बाजाराचे सखोल ज्ञान असल्याशिवाय शेअर बाजारात गुंतवणूक करू नये. त्याला पर्यायी असलेल्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी. पूर्वी ‘फिजिकल’ शेअर होते. शेअर सर्टिफिकेट गुंतवणूकदाराला बाळगावी लागत. आता डिमॅट खाते उघडल्यावर तुमचे सर्व शेअर तुमच्या डिमॅट खात्यात जामा होतात. १ एप्रिल, २०१९ पासून शेअर ‘डिमॅट’ केलेले असल्याशिवाय त्यांची खरेदी व विक्री करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच शेअर बाजाराचे व्यवहार ऑनलाईन झाल्यामुळे, ब्रोकरच्या मदतीशिवाय गुंतवूणकदार स्वतःचे व्यवहार स्वतः करू शकतो. शेअर बाजार कितीही नाही म्हटले तरी एक प्रकारचा जुगारच आहे. कोणता शेअर वर जाईल व कोणता कोसळेल, याचे तसे शंभर टक्के ठोकताळे कधीही मांडता येत नाही. अनिश्चितता शेअर बाजारात ठासून भरली आहे, हे लक्षात ठेवूनच शेअर बाजारात गुंतवूणक करावी.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat