खुशखबर : एसबीआयकडून गृह कर्ज दरात कपात

10 Apr 2019 17:01:35


 


मुंबईरिझर्व्ह बँकेच्या रेपोदर कपातीला प्रतिसाद देत देशातली सगळ्यात मोठ्या भारतीय स्टेट बँकेकडून गृहकर्जाच्या दरात ०.१० % कपात केली आहे. भारतीय स्टेट बँकेच्या ३० लाखांपर्यंतच्या गृहकर्जाचा दर हा ८.६० ते ८.९० टक्क्यांच्या दरम्यान राहणार आहे. बुधवारपासून हे दर लागू असणार आहेत. त्यामुळे आता कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 
भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर २५ बेसिस पॉईंट कमी केले आहेत. त्यामुळे ६.२५ टक्के वरुन घसरून तो ६ टक्के झाला आहे. आरबीआयच्या मौद्रीक धोरण समिती आणि गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी जाहीर केले. दास गव्हर्नर झाल्यानंतर सलग दुसऱ्यांदा रेपो दरात कपात करण्यात आली आहे. सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेला जागतिक आव्हान आहे. दरम्यान, भारत आशिया खंडातील एकमेव देश आहे ,ज्याने केवळ ३ महिन्यात रेपो दरामध्ये दुसऱ्यांदा कपात केली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये मात्र घट होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
 

कच्च्या तेलाची किंमत वाढलेली असतानाही महागाई दर नियंत्रणात आहे, असे शक्तिकांत दास यांनी सांगितले. मध्यम आणि छोट्या उद्योजकांसाठी पत वाढ (क्रेडिट ग्रोथ) कमी करण्यात आली आहे. वित्तीय स्थितीवर सतर्क राहणे गरजेचे आहे. खाद्य महागाई दर चांगल्या स्थितीत आहे, असे दास यांनी सांगितले आहे. जानेवारी - फेब्रुवारी या महिन्यांमध्ये निर्यात चांगली राहीली आहे.

 

गृहनिर्माण क्षेत्रात वित्तव्यवस्था चोख राखण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. एमपीसीची पुढील बैठक ३, ४ आणि ६ जूनला होणार आहे. रेपो दर कमी झाल्यामुळे ईएमआय कमी होणार आहेत. तर, होम लोनचेही ईएमआयदर कमी होणार आहेत. आर्थिक वर्ष २०१९-२०मध्ये महागाई दर सहा महिन्यात पहिल्यांदा २.९ ते ३.० टक्के झाले आहेत. तर पुढच्या सहा महिन्यात महागाई दर ३.५ ते ३.८ टक्के राहण्याची शक्यता आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0