ठाणेकर सागरची ‘फोर्ब्स’ भरारी

    दिनांक  01-Apr-2019   


 


सकाळी सकाळी दारावर दूध देणाऱ्या भैय्याने त्यासोबत ब्रेड, बटर, बिस्कीटं आणि भाज्याही घरपोच आणून दिल्या तर??? ही कल्पना, सत्यात उतरविणाऱ्या सागर यरनाळकरची ही यशोगाथा...


सामान्य माणसाच्या दैनंदिन वापरातील गोष्टी घरपोच पोहोचवून कधी कोणी आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावू शकतं का? बहुदा, ‘नाही’ असेच आपल्याला वाटेल, पण, चक्क हेच काम करून ठाण्याच्या सागरने प्रतिष्ठेच्या ‘फोर्ब्स’च्या यादीमध्ये स्वतःचे नाव कोरले आहे. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात किराणा माल, भाजीपाला इंटरनेट आणि अॅपच्या माध्यमातून अगदी घरपोच मागवता येतो. त्यामुळे घराबाहेर पडण्याचा अतिरिक्त वेळ वाचतोच. हल्ली तर ज्येष्ठ नागरिकांनीही हे ‘स्मार्ट’ बदल आत्मसाद केलेले दिसतात. त्यामुळे अगदी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत ‘घरबसल्या सगळं काही’ कडे सर्वांचाच कल. गृहिणींची तर विशेषकरुन यामुळे सोय झालेली दिसते. कारण, घराबाहेर पडून खरेदीचा वेळ त्या मुलांचा अभ्यास घेण्यासाठी किंवा इतरत्र आता अगदी सहज वापरु शकतात.

 

सध्या असेच एका क्लीकवर घरपोच सामान मिळत असले तरी त्याच्या गुणवत्तेबाबत मात्र साशंकता असतेच. पण, समजा, तुम्हाला आवश्यक असणाऱ्या अशा सर्व गोष्टी जर तुमच्याच नेहमीच्या दूधवाल्याने आणून दिल्या तर? होय, काळाची गरज ओळखून ठाण्याच्या सागर यरनाळकर या तरुणाने अशीच अनोखी शक्कल लढवत एका अभिनव कल्पनेला मूर्तरुप दिले आहे. आजच्या टेक्नोसॅव्ही जमान्यात सागरने एका अशा अॅपची निर्मिती केली की, ज्यामुळे सामान्यांच्या दैनंदिन गरजांच्या पूर्ततेला हातभार लागला. सागर आणि त्याचा मित्र अनुराग गुप्ता या दोघांनी मिळून ’डेलीनिंजा’हे अॅप बाजारात आणले. या अॅपची दखल चक्क जगप्रसिद्ध ’फोर्ब्स’ या आंतरराष्ट्रीय मासिकालाही घ्यावी लागली, हे विशेष. १७ जून, १९८९ रोजी सागरचा जन्म झाला. त्याने ठाण्यातील सुलोचनादेवी सिंघानिया शाळेतून दहावीचे शिक्षण घेतले. पुढे त्याने ठाण्यातीलच एस. ई. एस. माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीचे शिक्षण घेतले. मग पुढे त्याने राजस्थानमधील बिर्ला इन्स्टिट्यूट आणि टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयात अभियांत्रिकीची पदवीही संपादित केली. त्यानंतर त्याने काही ठिकाणी नोकरी केली, पण काहीतरी वेगळं करण्याची जिद्द आणि चिकाटी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. सागरने त्याच्या मित्रांसोबत पहिल्या ‘स्कूट अॅप’ची निर्मिती केली होतीच. या अॅपच्या मदतीने टॅक्सीसेवा सुरु केली. पण, त्याला म्हणावे तसे यश प्राप्त झाले नाही. अपयशामुळे खचून न जाता सागरने पुन्हा एकदा नवीन संकल्पनेला जन्म दिला. सागरला नोकरीनिमित्त बंगळुरू येथे मित्रांसोबत राहत असताना ’डेलीनिंजा’ अॅपची कल्पना सुचली.

 

अनुराग आणि सागर या दोन्ही मित्रांचा नोकरीनिमित्त बंगळुरूला मुक्काम होता. त्यांच्यासोबत आणखी दोन मित्रही राहत होते. त्यांच्यातल्याच एकामुळे ही अभिनव कल्पना सुचली. ते राहत असलेल्या इमारतीतील दूधवाल्याशी सागरच्या एका मित्राची चांगली ओळख झाली होती. रोज रात्री तो मित्र त्या दूधवाल्याला व्हॉट्सअॅपवर मेसेज करायचा. मेसेज करून दुसऱ्या दिवशी आवश्यक असणारे सामान, जसे की अंडी, ब्रेड आणायला सांगायचा. दूधवालाही सकाळी ७ वाजता अपार्टमेंटमधल्या घरांमध्ये दूध पोहोचवायचा. त्याचवेळी तो सागरच्या मित्राने मागवलेले सामानदेखील देऊन जायचा. त्यातूनच सागर आणि अनुरागला ही कल्पना सुचली. या दुधवाल्यांशीच करार करून त्यांच्याद्वारेच दैनंदिन वापराचे साहित्य पाठवले, तर ग्राहकांनाही सकाळी उठून दुकानात जाण्याचा त्रास संपेल. तसेच, यामुळे दूधवाल्यांनाही चार पैसे जास्त मिळतील, असा यामागचा विचार. ही योजना राबविण्यासाठी दूधवाल्यांना ऑर्डर मिळणे गरजेचे बनले. यानुसार अॅप त्यांनी विकसित केले आणि ही कल्पना कमालीची यशस्वी ठरली. २०१७ मध्ये त्यांनी ही कल्पना पहिल्यांदा बंगळुरूत राबविली व तिथे या अॅपला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर इतर शहरांमध्ये त्याचा विस्तार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सुरुवातीला सागर आणि त्याचे मित्र स्वतः दारोदारी ते सामान पोहोचवायचे. त्यानंतर त्यांनी दूधवाल्यांशी करार करून सामान पोहोचवण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू हा व्यवसाय प्रकाशझोतात येऊ लागला. भारतातील बऱ्याचशा कंपन्यांनी या अॅपमध्ये गुंतवणुकीचीही तयारी दाखवली आणि हळूहळू या अॅपची ख्याती सातासमुद्रापार जाऊन पोहोचली.

 

‘डेलीनिंजा’ हे अॅप सध्या मुंबई, पुणे, बंगळुरू, म्हैसूर, चेन्नई आणि हैद्राबाद या सहा शहरांमध्ये सुरू आहे. या सहा शहरांमध्ये २ हजार, ४०० दूधवाले या अॅपच्या माध्यमातून कार्यरत आहेत. या सहा शहरांमधील दूधवाल्यांचे नेटवर्क सांभाळण्यासाठी ४०० हून अधिक लोकांची टीम काम करते. जवळपास ७० हजार घरांमध्ये ‘डेलीनिंजा’द्वारे सामान पोहोचवण्याचे काम होते. ‘अंडर ३०’ या ‘फोर्ब्स’च्या यादीत सागर झळकला आहे. संकल्पना आवडल्याचे ‘फोर्ब्स’कडून फोनवरून सागरला कळवण्यात आले. जवळपास ४० ते ५० स्पर्धकांमधून सागर आणि त्याच्या चमूची निवड करण्यात आली. भारतासहित जगभरातून त्याच्या या कर्तृत्वाचे कौतुक होत आहे. तरुण पिढीसमोर त्याने एक नवा आदर्श उभा केला आहे. अशा कर्तृत्ववान सागर यरनाळकरला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...!

  

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat