बीएसएफ - त्रिपुराची कवचकुंडलं (भाग-१)

    दिनांक  09-Mar-2019   


 


सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफ. त्रिपुरा आणि बांगलादेशच्या तब्बल ८५६ किमी विस्तृत सीमेच्या संरक्षणाची संपूर्ण धुरा ही बीएसएफच्या सक्षम खांद्यांवर. अशा या बीएसएफच्या त्रिपुरातील दोन बोर्डर पोस्टना भेट देऊन जवानांचे खडतर आयुष्य, त्यांचे सीमासंरक्षणाचे कर्तव्य जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. तेव्हा, त्रिपुरातील भारत-बांगलादेश सीमेवरील गस्त, जवानांपुढील आव्हाने यांचा आज पहिल्या भागात घेतलेला हा सविस्तर आढावा...

 
 

'जिवन पर्यन्त कर्तव्य’ या घोषवाक्यासह भारतीय सीमांचे अगदी अखेरच्या श्वासापर्यंत संरक्षण करणाऱ्या बीएसएफच्या आगरताळा शहर मुख्यालयात आम्ही दाखल झालो. बीएसएफच्या कडक गणवेशात उंच, गोऱ्यापान आणि उत्साही सेकंड इन कमांड ऑफिसर अरुण वर्मांनी आमचे आदरातिथ्य केले. चहापानाच्या औपचारिक परिचयादरम्यान वर्मांनी त्रिपुराच्या सीमेची तोंडओळख करून दिली. सोबतीला नकाशा होताच. त्रिपुराच्या पश्चिम, दक्षिण आणि पूर्वेकडील बांगलादेशची सीमा आता अधिक स्पष्ट दिसत होती. साहजिकच ही आंतरराष्ट्रीय सीमा भारत-पाकसारखी संवेदनशील, युद्धभूमीच्या छायेत नक्कीच नसली तरी, जवानांना २४ तास डोळ्यात तेल घालून जागता पहारा हा द्यावाच लागतो. कारण, घुसखोरीचे, तस्करीचे काही प्रयत्न वगळल्यास ही सीमा तशी अत्यंत शांत. या दोन देशांच्या मित्रत्वाचे प्रतिबिंब साहजिकच सीमेवर कर्तव्यतत्पर जवानांच्या जबाबदारीतही अगदी स्पष्टपणे झळकते. आगरताळ्यापासून मग काही किमी अंतरावर असलेल्या बीएसएफच्या भागलपूर पोस्टकडे आम्ही वर्मांच्या नेतृत्वात रवाना झालो. शहराबाहेर पडताच आसपासच्या परिसराचे रंगरूपही बदलले. लांबच लांब दिसणाऱ्या उघड्या बोडक्या जमिनी, तर काही अंतरावर कसलेल्या शेतजमिनी... मातीची मातकट घरं आणि विटांचे रचलेले ढीगच्या ढीग... रस्त्यावरच्या धुळीची राळ उडवत आमच्या तीन गाड्यांचा ताफा वर्मांच्या जीपच्या मागेमागे धावत होता. कालांतराने निमुळत्या होत गेलेल्या रस्त्याच्या डाव्या बाजूला मोठेमोठे फेन्सिंग (कुंपण) दिसू लागले आणि सीमा दृष्टिक्षेपात आल्याची ती पहिली खूण होती. पुढे अशाच फेन्सिंगला अगदी समांतर छोट्याशा रस्त्याने आम्ही सीमेवरील बीएसएफच्या भागलपूर पोस्टमध्ये दाखल झालो. सुरुवातीला वाटले, या फेन्सिंगपलीकडची ही शेतजमीन बांगलादेशची असावी. पण, पोस्टमध्ये गेल्यावर हा गैरसमज क्षणार्धात दूर झाला. या फेन्सिंगविषयी विचारले असता कळले की, फेन्सिंगच्या पलीकडची काही अंतरापर्यंतची जमीनही आपल्याच मालकीची. खरं तर, या फेन्सिंगपासून १५० मीटरवर होती ती आंतरराष्ट्रीय सीमा, ज्यावर कुठल्याही प्रकारचे कुंपण नाही की संरक्षक भिंत नाही. मुख्य सीमारेषेवर काही ठराविक अंतरावर फक्त सिमेंटच्या खांबांवर लावण्यात आलेले पांढरे झेंडे फडकत होते. याचे कारण काय, तर जागतिक नियमांनुसार थेट आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर अशाप्रकारे थेट फेन्सिंग करता येत नाही. म्हणूनच, दोन्ही देश आंतरराष्ट्रीय सीमारेषेपासून १५० मीटर अंतरावर फेन्सिंग उभारून आपापल्या सीमांचे संरक्षण करू शकतात.

 

 

विशेष म्हणजे, आपल्या फेन्सिंगच्या पलीकडे शेतजमीनही दिसते आणि निवांत चरणारी गुरेढोरेहीत्यांना म्हणा कसल्या सीमा आणि कोणता सीमावाद, असा जर विचार करत असाल तर जरा थांबाच. कारण, या चराऊ जनावरांनाही बीएसएफकडून विशिष्ट प्रकारचे टॅगिंग केले जाते. मग याविषयी अधिक माहिती घेता कळले की, फेन्सिंगच्या पलीकडे, पण आंतरराष्ट्रीय सीमारेषेच्या अलीकडची जमीन ही आपलीच आहे. म्हणजे, ज्याला आपण ‘नो मॅन्स लँड’ म्हणतो, अशा या जमिनीवर इथे चक्क शेती केली जाते. शेतकर्‍यांना या फेन्सिंगच्या दरवाज्यातून बीएसएफतर्फे दिलेले ओळखपत्र, ज्याला ‘किसानकार्ड’ म्हणतात, ते सकाळी गेटवर जमा करून शेतीतील काम झाल्यावर दुपारी ४ पर्यंत बाहेर परतावे लागते. त्यामुळे शेतात काम करायला जाताना आणि परत माघारी फिरताना, अशा दोन्ही वेळेला शेतकर्‍यांची कसून तपासणी केली जाते. तसेच शेतकर्‍यांना शेतात जायच्या आणि परतायच्या बीएसएफने आखून दिलेल्या वेळांचे काटेकोरपणे पालन करावे लागते. शिवाय, हे शेतकरी शेतात काम करत असतानाही जवानांचे त्यांच्या प्रत्येक हालचालींवर अगदी बारीक लक्ष असतेच. बऱ्याचशा शेतकर्‍यांची ही सीमेवरील शेतजमीन बांगलादेश निर्मितीच्याही पूर्वीची. त्यांच्या पूर्वजांनी ती कसली, आज त्यांची पुढची पिढी याच शेतीवर कसाबसा उदरनिर्वाह भागवते. पण, ही शेतजमीन सरकार दरबारी जमा करुन पर्यायी जमिनीवर शेती करण्याची या शेतकर्‍यांची तयारी नाही. ‘माटी आणि मानूश’चेच हे बंध इथे प्रकर्षाने जाणवले. अशाप्रकारे फेन्सिंग ओलांडून शेतजमिनीत उतरणे, हा शेतकर्‍यांचा नित्याचा दिनक्रम. काही सीमावर्ती भागांत शेतजमीन तशी विरळा असली तरी, फेन्सिंगच्या पलीकडे चक्क काही पक्की घरंही याच आंतरराष्ट्रीय सीमेवर असल्याचे कळले. म्हणजे, एक पाय भारताच्या सीमेत, तर दुसरा बांगलादेशात. १९७१च्या बांगलादेश निर्मितीवेळी अशीच अनेक कुटुंबे, नातेवाईक या सीमारेषांमुळे एकमेकांपासून दुरावले, तर काही पूर्व पाकिस्तानातून त्रिपुरातही स्थलांरीत झाले. १९७१ च्या युद्धात त्रिपुराच्या या भूमीनेही अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, हे खासकरून सांगावेसे वाटते. तसेच, बांगलादेशच्या निर्मितीचे जनक शेख मुजब्बीर रेहमान यांनीही आगरताळ्याला त्यावेळी आवर्जून भेट दिली होती. तेव्हापासून पासपोर्ट-व्हिसा मिळवून बांगलादेशी नागरिकांचे सीमेपल्याड येणे-जाणे अगदी सहज सुरू असते. दररोज साधारण ५०० ते हजार बांगलादेशी नागरिक त्रिपुरातील बांगलादेश सीमेवरून दररोज भारतात ये-जा करतात.

 
 
 

विशेष म्हणजे, एकट्या त्रिपुरातून बांगलादेशात प्रवेश करण्यासाठी तब्बल आठ चेकपॉईंट्स आहेत. तसेच एकूण आठ जिल्ह्यांमध्ये विभागलेल्या त्रिपुराच्या प्रत्येक जिल्ह्याची सीमा ही बांगलादेशला कुठे ना कुठे छेदणारी. त्यातही त्रिपुराचा ७० टक्के भूभाग हा जरी डोंगराळ प्रदेश असला तरी, उर्वरित ३० टक्के पठारी, सपाट भूभागही हा अगदी आंतरराष्ट्रीय सीमेला लागूनच आणि याच भागात त्रिपुराची ७० ते ८० टक्के लोकसंख्या केंद्रित आहे. वाचूनही कदाचित आश्चर्य वाटेल, पण आगरताळ्याचे विमानतळही भारत-बांगलादेश सीमेपासून केवळ २००-३०० मीटर अंतरावर स्थित असून विमानतळाचे फनेल क्षेत्रही चक्क बांगलादेशात मोडते. बांगलादेशशी इतकी जवळीक लक्षात घेता, त्रिपुराच्या नवीन सरकारने बांगलादेशींना आगरताळा विमानतळावर बांगलादेशातूनच प्रवेश करून प्रवासाच्या वेळेची कशी बचत करता येईल, यासाठी स्वतंत्र, सुरक्षित व्यवस्थेचाही विचार केला आहे. त्यामुळे आगामी काळात बांगलादेशी नागरिकांना रस्तामार्गे सीमा ओलांडून आगरताळा विमानतळावर न येता, थेट बांगलादेशातूनच विमानतळावर प्रवेश करता येईल.

 अशा या सीमेवरील वातावरण अतिशय शांत आणि स्थैर्यपूर्ण असले तरी, या सीमेवर तस्करीच्या घटनाही अधूनमधून घडत असतात. ड्रग्ज, गांजा, तांदूळ, गुरेढोरे, मासे, दगडविटा, दारू, कफ सिरपच्या बाटल्या यांसारख्या गोष्टींचा तस्करीच्या यादीत प्रामुख्याने समावेश होतो. पण, बीएसएफचे जवान तस्करांवर कडक कारवाई करतात. बरेचदा अशा शुल्लक वस्तूंसाठी तस्करी करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांनाही ताब्यात घेऊन नंतर बांगलादेश सरकारच्या हवाली केले जाते. इथे लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, त्रिपुराकडील सीमेवर बांगलादेशने त्यांच्या बाजूला अद्यापही फेन्सिंग केलेले नाही. का, तर आर्थिक चणचण आणि सीमासुरक्षेसाठी बीएसएफवर असलेला त्यांचा विश्वास म्हणा हवं तर. पण, याउलट भारताने २००० सालापासून या सीमेवर फेन्सिंगला सुरुवात केली. कारण, त्यापूर्वी बांगलादेशातून समाजकंटक सर्रास भारतीय सीमावर्ती गावांमध्ये घुसून गावकर्यांच्या घरात लुटमार करण्यापासून ते त्यांचे पीकपाणी, पशुधन एवढेच काय, तर बायकामुलींनाही पळवून नेण्यापर्यंत मोकाटपणे गुंडगिरी करत. पण, फेन्सिंगच्या संरक्षणानंतर सीमावर्ती भागातील या भयाणभयाला पूर्णविराम मिळाला.
 

 

आज या सीमेवरील ८० टक्के भाग हा फेन्सिंगने सुरक्षित ठेवण्यात बीएसएफला यश आले असून गुन्हेगारीचे, घुसखोरीचे प्रमाण अगदी नगण्यच असल्याचे अधिकारी अभिमानाने सांगतात. त्याचबरोबर फेन्सिंगच्या पलीकडचा भाग प्रकाशमान करणारे प्रखर फ्लड लाईट्स, पाच किमीच्या अंतरापर्यंत शारीरिक उष्णता टिपणारे हँड हेल्ड थर्मल इमेजर्स, रायफल्स आणि बंदुकांच्या आधुनिक उपकरणांमुळे सीमा सुरक्षेमध्ये कुठलीही कसूर राहत नाही. पण, ही सीमा सुरक्षित असली तरी, बीएसएफसमोर आजही काही आव्हाने अजूनही ‘आ’ वासून उभी आहेत. यामध्ये खासकरून नैसर्गिक आणि बिकट हवामानाचा जवानांना सामना करावा लागतो. कारण, त्रिपुरात वर्षातील जवळपास सहा-सात महिने तुफान पाऊस बरसतो. पण, भूभाग वाळवंटी असो, हिमाच्छित किंवा सुंदरबनसारखा दलदलीचा, जवानांना सजग राहूनच सीमेवर चौखुर पहारा द्यावाच लागतो. त्याचबरोबर मलेरिया आणि डासांच्या प्रादुर्भावापासून बचावासाठी ‘फेस नेट’ आणि उपचारांसाठी मेडिकल कीटही जवानांना दिली जाते. कारण, मलेरियामुळे खासकरून त्रिपुरा आणि मणिपूर फ्रंटिअरमधील बीएसएफ जवान दगावल्याच्याही घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना, पौष्टिक खानपान आणि जवानांच्या सुरक्षेची सर्वार्थाने काळजी बीएसएफकडून घेतली जाते.

 
 
 
भारत-पाकच्या अटारी-वाघा सीमेवरील ‘बिटिंग दी रिट्रीट’ सोहळ्याप्रमाणेच त्रिपुरातील भारत-बांगलादेशच्या आगरतळा-अकुरा चेकपोस्टवर सूर्यास्तापूर्वी ‘बिटिंग दी रिट्रीट’ सोहळा औपचारिकरित्या पार पडतो. २०१३ सालापासून या सीमेवर या सोहळ्याची सुरुवात झाली असली तरी, अटारी सीमेप्रमाणे हजारो प्रेक्षकांना बसण्याची इथे आजही सोय नाही. त्यासाठी ‘प्रेक्षक गॅलरी’ उभी करण्याचे काम सुरू असून ते पुढील वर्षभरात पूर्ण होईल. या सोहळ्यात दोन्ही देशांचे जवान उच्चरवाने सैनिकी घोषणा देत संचलन करतात आणि आदरपूर्वक सूर्यमावळतीच्या पूर्वी दोन्ही देशांचे ध्वज आदरपूर्वक खाली उतरविले जातात. भारत-पाक सीमेप्रमाणे या सीमेवर अजिबात घोषणाबाजी केली जात नाही. पण, हा सोहळा संपल्यानंतर राष्ट्रप्रेमाच्या उत्साहात ‘भारतमाता की जय...’च्या घोषणांनी सीमा दणाणून सोडणाऱ्या पर्यटकांना लगेचच बीएसएफच्या जवानांनी शांत राहण्याच्या सूचना केल्या. त्याचे कारण, लगेच पलीकडूनही ‘जय बांगला’च्या घोषणांनी त्याचे प्रत्युत्तर दिले गेले. कारण, बीएसएफ आणि बीजीबी (बॉर्डर गार्ड बांगलादेश) यांचे परस्पर संबंध मित्रत्वाचे असून, दोन्हीकडून सीमेवर कुठलाही तणाव निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेतली जाते आणि म्हणूनच हा सोहळा साग्रसंगीत पार पडल्यानंतर राष्ट्रप्रेमाने भारलेल्या आपल्या हळव्या भारतीय मनाला जयघोषाच्या त्या क्षणिक मोहाला आवरते घ्यावे लागते. असा हा बंधु बांगलादेशसोबतचा संस्मरणीय असा आगळावेगळा ‘बिटिंग दी रिट्रीट’ सोहळा... 
 
 
बीएसएफच्या एकूण १८ बटालियन आणि जवळपास २२ हजार जवान आज त्रिपुरा सीमेवर अहोरात्र तैनात आहेत. ऊन, पाऊस, वारा यांची कुठलीही तमा न बाळगता ‘राष्ट्रहित सर्वोपरी’ हीच भावना ठेवून बीएसएफचे जवान गेल्या ५४ वर्षांपासून भारतीय सीमांवर एक भक्कम भिंत म्हणून निधड्या छातीने पाय रोवून उभे आहेत. पण, बीएसएफचे कार्य हे केवळ सीमासुरक्षेपुरतेच मर्यादित नसून सीमावर्ती भागांच्या सर्वांगिण विकासासाठीही ते कटिबद्ध आहेत. त्याचा सविस्तर आढावा पुढील रविवारी...
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat