नेमबाजीतील लक्ष्यभेदी अपूर्वाई

    दिनांक  07-Mar-2019   

 

 
 
 
आजच्या जागतिक महिला दिनी जाणून घेऊया, विविध नेमबाजी स्पर्धांत अतुलनीय कामगिरी केलेल्या व सैनिकांच्या शौर्याला सलाम करणाऱ्या अपूर्वीबद्दल...
 

यंदा राजधानी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अपूर्वी चंदेलाने अभूतपूर्व कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. १० मीटर एअर रायफल क्रीडा प्रकारात २५२.९ गुण मिळवत अपूर्वीने विश्वविक्रमावर आपले नाव कोरले. माजी नेमबाज अंजली भागवतनंतर असा कारनामा करणारी अपूर्वी भारताची दुसरीच खेळाडू आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे, अपूर्वीने आपला हा यशाचा लखलखता अध्याय समर्पित केला तो, पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या भारतमातेच्या वीरपुत्रांना व कुटुंबीयांना! आजच्या जागतिक महिला दिनी जाणून घेऊया, विविध नेमबाजी स्पर्धांत अतुलनीय कामगिरी केलेल्या व सैनिकांच्या शौर्याला सलाम करणाऱ्या अपूर्वीबद्दल...

 

४ जानेवारी, १९९३ रोजी राजस्थानच्या जयपूर येथे जन्मलेल्या अपूर्वीने दिल्ली विद्यापीठातून समाजशास्त्रात पदवी घेतली. सुरुवातीला तिची इच्छा क्रीडा पत्रकारिता करण्याची होती. मात्र, २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज अभिनव बिंद्राने जिंकलेल्या सुवर्णपदकानंतर अपूर्वीने विचार बदलला व निशाणा साधण्यावर लक्ष केंद्रित केले. नंतर नेमबाजीत कारकीर्द घडविण्याचे ध्येय बाळगलेल्या अपूर्वीने दरम्यानच्या काळात निरनिराळ्या स्पर्धांत भाग घ्यायला सुरुवात केली व वयाच्या १९ व्या वर्षीच दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. पुढे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या कितीतरी नेमबाजी स्पर्धांत अपूर्वीने पदकांची लयलूट केली. २०१४ साली ग्लास्गोमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले. उल्लेखनीय म्हणजे, याचवेळी तिच्या हाडांनाही फ्रॅक्चर झाले होते तरीही, तिने ग्लास्गोमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करत यश प्राप्त केले. नंतर नेदरलँडमध्ये २०१४ साली झालेल्या इंटरशुट स्पर्धेत वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात सुवर्ण व कांस्यपदक, २०१५ साली चांगवान इथल्या विश्वचषकात कांस्यपदक, २०१८ सालच्या आशियायी स्पर्धेत मिश्र नेमबाजीत रवी कुमारच्या सोबतीने कांस्यपदक मिळवले. दरम्यान, स्वीडिश ग्रॅण्ड प्रिक्स स्पर्धेत २०१६ सालीच २११.२ चा जागतिक विक्रमही केला. सोबतच २०१६ साली झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठीही ती पहिलीच पात्र भारतीय महिला खेळाडू ठरली. इथे ५१ प्रतिस्पर्ध्यांमध्ये मात्र ती ३५ व्या क्रमांकावर राहिली, तर गेल्या महिन्यात झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर एअर रायफल नेमबाजीत तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली. चीनची नेमबाज रुओझू झाओ (२५१.८ - रौप्य पदक) आणि चीनचीच जू होंग (२३०.४ - कांस्यपदक) या स्पर्धेत अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर राहिल्या.

 

अपूर्वी नेमबाजीतील रायफल क्रीडाप्रकारात नेमकी कशी आली, याचाही एक किस्सा आहे. सामान्यतः नेमबाजीचे पिस्तूल आणि रायफल हे दोन प्रकार मानले जातात आणि बहुतेकवेळा पिस्तूलपासूनही सुरुवात करतात. अपूर्वीने आपल्या पहिल्याच प्रयत्नात पिस्तूलऐवजी रायफलची निवड केली आणि थेट १० पैकी १० गुण मिळवले. अपूर्वीच्या या यशाने भारावलेल्या वडिलांनी तिला मग रायफल घेऊन दिली आणि काकांनी सरावासाठी घरातच शूटिंग रेंजची उभारणी केली. विशेष म्हणजे, अपूर्वीने नेमबाजीला सुरुवात केल्यानंतर दोन आठवड्यांतच राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. पुढच्या चार वर्षांतच ती राष्ट्रीय पातळीवरील नेमबाजी स्पर्धांतही भाग घेऊ लागली. अपूर्वीने नेमबाजीत अचूक लक्ष्य टिपण्याचे धडे माजी राष्ट्रीय अजिंक्यपटू राकेश मनपत यांच्याकडून गिरवले व स्वतःसह गुरूंचेही नाव रोशन केले. आता तर अपूर्वीचे नाव नेमबाजी क्षेत्रात चांगलेच गाजताना दिसते. अपूर्वीच्या नेमबाजीतील यशाची दखल घेत केंद्र सरकारने २०१६ साली तिला ‘अर्जुन’ पुरस्कारानेही सन्मानित केले.

 

अपूर्वीच्या वडिलांचे नाव कुलदीपसिंह चंदेला असून आईचे नाव बिंदू राठोड आहे. वडिलांचा हॉटेलिंगचा व्यवसाय आहे, तर आई गृहिणी. अपूर्वी चंदेलाने नेमबाजीत तर घोडदौड सुरूच ठेवली, पण तिचे अजूनही अनेक छंद आहेत. नृत्याची अपूर्वी चंदेलाला विशेष आवड असून जेव्हा नेमबाजीतून वेळ मिळतो, तेव्हा ती नृत्याचा मनमुराद आनंदही घेते. सोबतच वाचनाचीही अपूर्वीला आवड असून फावल्या वेळात काल्पनिक कथानके, कादंबऱ्या, पुस्तकेही ती वाचते. ‘द अल्केमिस्ट’ कादंबरी लिहिणारे प्रसिद्ध ब्राझिलियन लेखक पाऊलो कोएलो हे अपूर्वीच्या आवडत्या लेखकांपैकी एक आहेतनेमबाजीमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अपूर्वीला आता वेध लागलेत ते २०२० साली जपानची राजधानी टोकियोमध्ये होऊ घातलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेचे. ऑलिम्पिकसाठीचा तिचा सरावही कसून सुरू आहे व तिथेही भरघोस यश मिळवणार, असा विश्वासही तिला वाटतो. ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचे उद्दिष्ट बाळगणाऱ्या अपूर्वीला भावी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat