फुगवलेली छाती आणि बडवलेली छाती

    दिनांक  06-Mar-2019   


 


बालाकोट येथे हवाई दलाने केलेल्या कारवाईमुळे सगळे भाजपविरोधक कमालीच्या गोंधळाच्या परिस्थितीत सापडले आहेत. बालाकोट हल्ल्याबद्दल नरेंद्र मोदी यांची स्तुती करता येत नाही आणि जर टीका केली, तर ती नरेंद्र मोदींना लागत नाही आणि उलटा बाण होऊन आपल्यावरच येतो. 'सांगताही येत नाही आणि सहनही करता येत नाही' असे जे म्हणतात, तशी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन समाज पार्टी या सर्वांची अवस्था झालेली आहे.


तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांना हल्ला झाल्याचा पुरावा पाहिजे आहे. भारतीय वायुदलाने हल्ला करण्यापूर्वी ममता बॅनर्जी यांना आपल्याबरोबर विमानात बसवून घेऊन जायला पाहिजे होते आणि त्यांना सांगायला पाहिजे होते की, बघा, आता आम्ही बॉम्ब टाकतो आहोत. त्याचा स्फोट होईल आणि मोठा आवाज येईल, तो ऐका. परंतु, वायुदलाने असे काही केले नाही. ते तरी काय करणार बिचारे! त्यांच्या सैनिकी नियमात या गोष्टी बसत नाहीत. दुसरे असे बहाद्दर आहेत दिग्विजय सिंग. त्यांनीदेखील पुराव्याची मागणी केली आहे. वाट्टेल त्या वेळी, वाट्टेल ती बडबड जो करतो, त्याचे नाव असते 'दिग्विजय सिंग.' बडबडीतला दिग्विजय करण्यात त्यांची बरोबरी कोणी करू शकत नाही. अशा वाचाळांना संत तुकोबारायांनी या शब्दांत सुनावले आहे , 'मांडवाच्या दारी आणला म्हातारा, म्हणे आणा नवरी रांड. जाळा नवऱ्याचे तोंड, तुका म्हणे ऐसा खरा, येथुनी त्वरित दूर करा.' माकडांचे चाळे, गाढवाचे ओरडणे याकडे शहाण्या माणसाने गंभीरपणे लक्ष देऊ नये. या शब्दयुद्धात शरदरावजी पवार मागे कसे राहातील? ते तर 'हिंदू दहशतवाद' या शब्दाचे जनक. 'मुखात राम, पोटात नथुराम' ही म्हण त्यांचीच! शब्दफेक करण्यामध्ये त्यांची बरोबरी करणारा महाराष्ट्रात तरी कोणी नाही. 'सैन्याने आपले शौर्य जगाला दाखवून दिले... कष्ट कोणी केले, शौर्य कोणी बजावले आणि छाती कोण बडवतो?' हे आहे शरदाचे शब्दचांदणे. शौर्य करणारे सैनिक मनमोहन सिंग सरकारच्या काळातही होते, तेव्हा शरदराव कृषिमंत्री होते. १९९३ साली मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले. मुख्यमंत्री शरदराव पवारच होते. २००८ साली मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, पवार त्या वेळी मंत्रिमंडळात होते. त्या वेळा सर्व मंत्रिमंडळ छाती बडवत बसले होते, पण शोकाची. काही वर्गात मृत्यू झाला असता रडण्यासाठी काही लोकांना गोळा केले जाते, तशी ही शरदरावांची पलटण आहे. सैन्य आहे, शौर्य आहे, विमाने आहेत, बॉम्ब आहेत, सैनिक जायलाही तयार आहेत... पण ज्यांनी निर्णय घ्यायचा, त्यांचे हातपाय लटपटत असतात. हा मोदी आणि इतरांतील फरक आहे.

 

कधीकधी राहुल गांधी मोदींना आव्हान देतात की, नरेंद्र मोदी माझ्याशी जाहीर वादविवाद करू शकत नाहीत, माझ्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकत नाहीत. असे काही वाचले की, मला एक गोष्ट आठवते. एकदा घोडा आणि गाढव यांच्यात पैज लागली की, दोघांत मोठा कोण? प्रथम दोघांनीही धावण्याची शर्यत लावली. घोडा पुढे गेला आणि गाढव मागे पडले. नंतर शक्ती आजमावण्याची शर्यत लागली. एक घोडा १० गाढवांचे सामान खेचून गेला. तेथेही गाढव हरले. अधिक काळ कोण कष्ट करू शकतो, याची परीक्षा झाली. घोडा न थकता तासन्तास काम करीत राहिला. गाढव काही तासातच थकून गेले. शेवटी गाढवाच्या डोक्यात एक कल्पना आली. तो धावत धावत एका उकिरड्यावर गेला. तेथे अंग टाकले. पाय वरती केले आणि ओरडायला लागला. घोड्याला म्हणाला, "तू हे करू शकतोस का?" घोडा म्हणाला, "नाय बाबा, मी हरलो. तू जिंकलास." कथेवर भाष्य करण्याची काही गरज आहे का? पवार म्हणतात की, "पंतप्रधान मोदी हेच राष्ट्रीय आपत्ती आहेत." दहशतवाद राष्ट्रीय आपत्ती नाही. दहशतवाद्यांकडून मारली जाणारी माणसे ही राष्ट्रीय आपत्ती नाही. मोदी राष्ट्रीय आपत्ती आहे. कारण, मोदी राष्ट्राला आपत्तीपासून दूर ठेवू इच्छितात. ते म्हणतात की, "दहशतवाद्यांविरुद्धची आमची लढाई संपलेली नाही. ती चालू राहील. ते पृथ्वीच्या पोटात कोठेही लपून बसले तरी, आम्ही त्यांना शोधून काढू." असा निर्धार करणे म्हणजे मोठी राष्ट्रीय आपत्तीच झाली. कारण, ती नेहरू-गांधी विचारसरणीत बसत नाही. ही विचारसरणी राज्यघटनेचे '३७० कलम' आणणारी आहे. काश्मीरला सर्व सवलती द्या, दहशतवाद्यांपासून त्यांचे रक्षण करा, त्यांच्यासाठी विकासाच्या योजना करा, त्यांना भारतात कुठेही जाण्यास परवानगी द्या. मी मराठी आहे, मला काश्मीरमध्ये जाऊन जमीन घेता येणार नाही. घर घेता येणार नाही. शासकीय नोकरी मला मिळणार नाही. मी काश्मीरमध्ये उपरा. हे आहे '३७० कलम.' उद्या ही राष्ट्रीय आपत्ती दूर करण्याचे काम जर मोदी यांनी केले, तर काँग्रेसवर आपत्तीच कोसळेल. पवार हे काँग्रेस संस्कृतीत वाढलेले राजनेते आहेत, म्हणून त्यांना ते सहन होण्यासारखे दिसत नाही. जाऊ द्या, खयाल अपना अपना, पसंद अपनी अपनी!

 

या सर्व विरोधी पक्षांनी मोदींविरोधात गेली पाच वर्षे विचारपूर्वक मोर्चेबांधणी केली. पहिला आरोप झाला की, हे शासन असहिष्णू आहे. दुसरा आरोप झाला की, हे घटनाविरोधी आहे. घटना बदलणे हा यांचा छुपा अजेंडा आहे. तिसरा आरोप झाला की, हे शासन धार्मिक अल्पसंख्याकांविरुद्ध आहे. चौथा आरोप झाला की, हे शासन शेतकरीविरोधी आहे. पाचवा आरोप झाला की, हे शासन बेकारी निर्माण करणारे आहे. सहावा आरोप झाला, हे शासन श्रीमंतांना श्रीमंत करणारे आहे. आणि महाराष्ट्रापुरता विचार करायचा, तर हे शासन ब्राह्मणी शासन आहे. ही मोर्चेबांधणी करून विरोधी पक्षांची एकजूट करण्याचे प्रयत्न सुरू झाले. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस एकत्र आले. वंचित आघाडी त्यात सामील व्हावी, म्हणून त्यांनी प्रयत्न चालविले. राज ठाकरेंना जवळ करण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशात बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी एकत्र आल्या. ममताने गर्जना केली की, 'मोदी शासन हटविणे हेच माझे ध्येय आहे.' जेवढा एकतर्फी आणि खोटा प्रचार करता येईल, तेवढा करण्याचा सपाटा त्यांनी लावला. प्रसिद्धीमाध्यमांत यांचे मूल्य मोठे. म्हणून ते कुठेही काहीही बडबडले तरी त्याला प्रसिद्धी मिळू लागली. माध्यमे चर्चा करू लागली की, मोदी यांना २०१९ची निवडणूक जड जाणार. त्यांना निर्विवाद बहुमत मिळणार नाही. जास्तीत जास्त २५० जागा मिळतील. त्रिशंकू लोकसभा येईल. अशा वेळी मायावती, शरद पवार वगैरे प्रादेशिक नेते 'किंगमेकर'च्या भूमिकेत येतील. त्यांचे महत्त्व फार वाढेल. वृत्तपत्रातील हे सर्व आडाखे शेख मोहम्मदी स्वप्नासारखे असतात. अशी स्वप्ने कधी प्रत्यक्षात येत नसतात. कप आणि ओठ यांच्यात भरपूर अंतर असते. राजनीतीचा विचार करताना सगळ्या देशाचे वातावरण उलट-सुलट करणारी घटना केव्हाही घडू शकते आणि मतदानावर तिचे उलट-सुलट परिणाम होऊ शकतात. १९८४ साली इंदिरा गांधींची हत्या होईल, हे कोणाच्याही कल्पनेत नव्हते. राजीव गांधी यांची हत्यादेखील अनाकलनीय. या दोन्ही हत्यांचा फायदा काँग्रेसला झाला. सगळे विरोधी पक्ष तेव्हा दूर फेकले गेले.

 

आताची पुलवामा घटना ही अशीच आहे. ही घटना घडल्यानंतर आश्चर्यकारकरित्या सारा देश दहशतवाद्यांच्या विरुद्ध उभा राहिला. गल्लीबोळात भाजी विकणाऱ्या लोकांनीदेखील जवानांना श्रद्धांजली वाहणारे बोर्ड लिहिले. गल्लीबोळातील रिक्षा चालकदेखील या हत्येच्या तीव्र निषेधार्थ रस्त्यावर उतरले. सर्वांची एकच मागणी होती, 'या हल्ल्याचा बदला घ्या.' नरेंद्र मोदी यांनी १२ दिवसांच्या आत त्याचा बदला घेतला. लोकांना कमालीचा आनंद झाला. आपण केवळ मार खाण्यासाठी जन्मलो नसून वेळ आल्यास आपण मार देऊ शकतो, याचा विश्वास लोकांच्या मनात निर्माण झाला. आणि सगळे पारडे उलटे-सुलटे झाले. मोदी बुडण्यासाठी पाण्यात देव बुडवून बसलेल्यांना त्याच पाण्यात गटांगळ्या खाण्याची वेळ आली. आता करायचे काय? मोदींविरुद्ध कोणता प्रचार करायचा? आणि जो काही प्रचार करू, तो लोक स्वीकारतील काय? या सर्वांची अवस्था आज अत्यंत दयनीय झालेली आहे. कुस्ती न खेळताच ते कुस्ती हरले आहेत. पण, आपण हरलो आहोत, हे ते सांगू शकत नाहीत. 'आम्ही शूर आहोत, आम्हाला निवडणूक लढायची आहे,' हा आव तर ते सोडू शकत नाहीत. कार्यकर्त्यांना काहीतरी सांगायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी तुणतुणे वाजवायला सुरुवात केली आहे की, कसला हवाई सर्जिकल स्ट्राइक? कुठे झाला? किती लोक मेले? त्याची आकडेवारी द्या. त्याचे फोटो द्या. ते नसतील तर तुम्ही खोटे बोलत आहात, देशाची दिशाभूल करीत आहात हे सांगायला त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या मागणीप्रमाणे समजा आकडा दिला, तर ते दुसरा प्रश्न करतील, ते दहशतवादी होते कशावरून? त्यांची ओळखपत्र तुमच्याकडे आहेत का? तिकडचे आधारकार्ड आम्हाला दाखवा, मग आम्ही विश्वास ठेवू. जी १२ विमाने पाठवली म्हणता, त्यांचे नंबर पाठवा. ती कुठून पाठवली, याचे पुरावे द्या. असे केल्यास प्रश्न कधीच संपणार नाहीत. ज्याचे डोके तिरके चालते तो सरळ विषयातही प्रश्न निर्माण करेल. त्याच्यासमोर म्हैस आणली, तर तो प्रश्न करेल, "ही म्हैस कशावरून? शिंग तर गायीलादेखील असतात आणि काळ्या रंगाच्या गायीदेखील असतात. गायीचे दूधही सफेदच असते आणि दोघांच्या शेणाला सारखीच दुर्गंधी येते." म्हणून शहाण्या माणसाने अशा लोकांच्या तोंडी लागू नये, त्यांना उत्तरे देत बसू नये. जनतेला मात्र एक उत्तर पाहिजे आहे, ते म्हणजे एका ‘सर्जिकल स्ट्रार्ईक’ने आमची फक्त न्याहारी झालेली आहे, आम्हाला भरपेट जेवण पाहिजे आहे. आमचे कान ही बातमी ऐकायला उत्सुक आहेत की, आपल्या हल्ल्यात दाऊद इब्राहिम ठार झाला, हाफिद सईद अल्लाघरी गेला आणि अजर मसूद कबरस्तानात गेला आहे. हे सणसणीत उत्तर आम्हा सर्वांना हवे आहे. मोदी शासनाने ते दिले पाहिजे. जसे ते आम्हाला आवश्यक आहे, तसे ते ममता, पवार, राहुल, मायावतींनादेखील आवश्यक आहे, कारण असे उत्तर जर दिले नाही, तर वाटेल ते आरोप करण्यासाठी त्यांच्याकडे विषय कोठून येणार?

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat