सिंधुदुर्ग विमानतळाच्या टर्मिनलचे शानदार उद्घाटन

05 Mar 2019 21:34:27
 


सिंधुदुर्गनगरी : महामार्ग रुंदीकरण, बंदर विकास, मत्स्यव्यवसाय विकास, पर्यटन, हवाई सेवा या माध्यमातून विकासाची मोठी भरारी घ्यायला सिंधुदुर्ग जिल्हा सज्ज झाला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सिंधुदुर्ग विमानतळाच्या (चिपी) टर्मिनल इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.

 

या सोहळ्यास केंद्रीय उद्योग वाणिज्य व नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री दीपक केसरकर, खा. नारायण राणे, विनायक राऊत, आ. निरंजन डावखरे, बाळाराम पाटील, आमदार वैभव नाईक, नितेश राणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जिल्ह्यातून जाणारा रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग यामुळे विकासाचा वेग वाढतो. तथापि, जिल्ह्यात अद्ययावत विमानतळाद्वारे प्रवासी व मालवाहतुकीची विमान सेवा सुरू झाली तर विकासाचा वेग तिप्पट होतो. चिपी विमानतळाच्या परवानग्या मिळविण्यासाठी अनेक अडचणी होत्या. मात्र, सुरेश प्रभू यांनी विशेष प्रयत्न करून या विमानतळाच्या परवानग्यांचा मार्ग सुकर केला, त्याबाबत ते अभिनंदनास पात्र असल्याचे ते म्हणाले. चिपी विमानतळ हा पर्यायी विमानतळ म्हणूनही उत्तमप्रकारे काम करु शकेल, असेही मत त्यांनी नोंदवले. रत्नागिरी जिल्ह्याच्या विमानतळाबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील विमानतळासही आता चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

सर्वांना अभिमान वाटावा, असा विमानतळ

केंद्रीय वाणिज्य व नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यावेळी म्हणाले की, सिंधुदुर्ग विमानतळ पाहून सर्वांना अभिमान वाटावा, अशी या विमानतळाची उभारणी झाली आहे. उडान-३ मध्ये सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश नव्हता. तथापि, या दोन जिल्ह्यातील क्षमतांचा विचार करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मान्यतेने खास या दोन जिल्ह्यांसाठी उडान ३.१ योजना सुरू करण्यात आली असून त्यामध्ये सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विमानतळांचा समावेश करण्यात आला आहे. लवकरच सिंधुदुर्ग विमानतळावरून विमानसेवा सुरू होईल, अशी ग्वाही प्रभू यांनी दिली.

 

महत्वाच्या घोषणा

· चिपी विमानतळासाठी सुरेश प्रभूंचे विशेष, परवानग्यांचा मार्ग सुकर केला

· चिपी विमानतळ हा पर्यायी विमानतळ म्हणूनही उत्तमप्रकारे काम करु शकेल

· रत्नागिरी जिल्ह्यातील विमानतळासही आता चालना

· सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सी-वर्ल्ड प्रकल्प सहा महिन्यात मार्गी लावणार

· देशातील पहिल्या सागरी बहुप्रजातीय मत्स्यबीज केंद्रामुळे (उभादांडा, ता. वेंगुर्ला) मत्स्यव्यवसायामध्ये मोठे आर्थिक परिवर्तन होईल

· कोकण विभागात २२ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प हाती घेतले आहेत

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0