'जमात-ए-इस्लामी'च्या तीन बड्या नेत्यांना अटक

04 Mar 2019 13:22:43


 


दहशतवाद्यांना आश्रय देणे, आर्थिक मदत करणे यासारखे गंभीर आरोप

 

जम्मू-काश्मीर : 'जमात-ए-इस्लामी' या संघटनेच्या तीन बड्या नेत्यांना पोलिसांनी अटक केली आहे. सुरक्षा दलांच्या पथकांनी जम्मू प्रांतातील डोडा, रामबन, पूंछ, राजौरी, किश्तवार आणि जम्मू या सहा जिल्ह्यांमध्ये व्यापक धाडसत्र राबविले. या कारवाईत मोहम्मद मजीद शेख, मोहम्मद इकल नायक आणि गुलाम कादिर भट या जमातच्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

जमात-ए-इस्लामी या संघटनेवर अलीकडेच बंदी घालण्यात आली होती. काश्मीर खोर्‍यात जैश आणि तोयबाच्या दहशतवाद्यांना आश्रय देणे, शस्त्र पुरवठा करणे आणि आर्थिक मदत करणे यासारख्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या कारवाईत या नेत्यांची कोट्यवधी रुपयांची संपत्तीही जप्त केली असून त्यांच्या घरांमधून मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह दस्तावेज ताब्यात घेण्यात आले आहेत.

 

जमात-ए-इस्लामीच्या गुलाम नबी गुंडाना या आणखी एका नेत्याला सुरक्षा दलाने नजर कैदेत ठेवले आहे. त्याच्यावर अलीकडेच शस्त्रक्रिया झाली असल्याने त्याला तूर्तास अटक करण्यात येणार नाही. अशीही माहिती एका अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, जमातच्या या नेत्यासंबंधित सहा संशयास्पद बँक खाते आढळले असून ती गोठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0