वसईतील शिवालयात भाविकांची गर्दी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Mar-2019
Total Views |



 

वसई : जय भोले बम बम भोलेच्या जयघोषात वसईत शिवालयात भक्तांची अलोट गर्दी जमली होती. महाशिवरात्रीनिमित्त पहाटेपासून लांबच लांब दर्शन रांगा लागल्या होत्या. वसई तालुक्यात अनेक शिवमंदिरे असून यातील वसई पूर्व विभागात निसर्गरम्य डोंगर दऱ्यात असलेल्या प्रसिद्ध पुरातन मंदिरा पैकी तुंगारेश्वर अभयारण्याच्या पायथ्याशी परंतु अरण्यात असलेले ईश्वरपुरी आत्मलीनगेश्वर मंदिर, अभ्यारण्यातच परंतु महामार्गाच्या बाजूस असणारे तुंगारेश्वर महादेव मंदिर, महामार्गावरील विरार फाटा येथील मल्लिनाथ मंदिर, खानिवडे येथील वृंदावन टेकडी महादेव मंदिर, पारोळ येथील नागनाथ महादेव मंदिर व कणेर येथील महादेव मंदिर येथे शिव भक्तांनी पहाटे पासून तुफान गर्दी केली होती.

 

भक्तांच्या लांबच लांब रांगा महादेवाचे दर्शन घेण्यासाठी लागल्या होत्या . त्यामुळे साधारण दोन ते चार तास दर्शनासाठी लागत होते. भक्तांनी बेलफुले वाहत, शिवलिंगाला दूध अर्पण करून बम भोलेच्या गर्जनेत यथासांग पूजा करण्यात आली. चालू वर्षी महाशिवरात्र निमित्त दरसालपेक्षा जास्त भक्तांनी गर्दी केल्याचे वृंदावन टेकडी महादेव मंदिराचे पुजाऱ्यांनी सांगितले.

 

यावेळी शिव भक्तांनी व सामाजिक संस्थांनी शिव मंदिरात महा आरती व महा पूजेचे आयोजन केले होते. या निमित्ताने अनेक मंदिरातून तीर्थ प्रसादासह भंडाऱ्याचे हि आयोजन केले होते . तर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी स्टोल उभे करून दर्शनास येणाऱ्या भाविकांना थंड सरबताचे वाटप करण्यात येत होते. वरील पैकी प्रत्येक मंदिराचे आपले एक वेगळे वैशिष्ट्य असून ईश्वरपुरी येथे श्रीकृष्ण कालीन संदर्भ मिळत आहेत. येथे मुनी सांदिपनी कृषींचा आश्रम होता. त्यांच्या नावाचा अपभ्रंश होऊन सांदिपनी ऐवजी चांदीप हे नाव रूढ झाल्याची आख्यायिका येथे सांगितली जाते. येथे भक्तांनी केलेल्या अभूतपूर्व गर्दीने मंदिरांच्या परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते .वसई भागात एकंदरीत मोठ्या उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला.

 

 
 
 

वसई शहरी भागातील नालासोपारा पश्चिमेकडील नाळा येथील पुरातन श्री शंकर नागेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. नयनरम्य विद्यूत रोषणाई यावेळी मंदिरास करण्यात आली होता. पंचक्रोषीत प्रसिद्ध असलेल्या या नागेश्वर देवालयाच्या सभामंडपाचा जिर्णोद्धार १९३६ साली केलेला आहे.

 

श्री शंकर नागेश्वर टेम्पल ट्रस्टच्या वतीने मंदिराचा कारभार पाहिला जातो. महाशिवरात्रीला रात्री भव्य स्वरूपात पालखी उत्सव सोहळा संपन्न होत असतो. तसेच निर्मळ येथील टेकडीवर असलेले शंकराचार्य मंदिर,सोपारा येथील चक्रेश्वर महादेव मंदिर, वसई मिठाआगार येथील सिद्धेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.वसई मिठाआगरातील ब्रिटीशकालीन सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर जागृत असून नेपाळी गुरखांनी श्री महादेव व हनूमानाचे मंदिर बांधले असल्याचे भाविक सांगतात.१९९६ साली या मंदिराचा नव्याने जिर्णोद्धार केला गेला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@