अमेठी, वायनाड फक्त दोनच?

    दिनांक  31-Mar-2019   


 


समोर ‘मोदी’ नावाचा शत्रू उभा आहे. काय म्हणालात? मोदी फक्त एकट्या वाराणसीमध्येच निवडणूक लढवणार? बघितलंत ना? मी दोन दोन सीट लढवणार आणि मोदी फक्त एक सीट लढवणार. मोदी एक सीट जिंकतील आणि मी हरलो तरी दोन सीटवर हरेन. संख्या कोणती जास्त? बोला बोला.. मोदी माझी बरोबरी करूच शकत नाहीत..तसेही निवडणूक जिंकणे एकदम सोपे असते. लोकांना सांगायचे, "तुम्हाला ७२ हजार रुपये देऊ. आलूपासून सोना बनवायची स्कीम काढू." हो आणि आज जानवं तर उद्या क्रॉस गळ्यात लटकवायचा. जबरदस्तीने, माझ्या मनात नसतानाही समोरच्याची गळाभेट घ्यायची आणि कसं बनवलं, अशा अविर्भावात लोकसभेत डोळे मारायचे. बस्स, जिंकलो निवडणूक!! मी काश्मीरपासून कन्याकुमारी ते गुजरातच्या अहमदाबाद ते पश्चिम बंगालच्या कोणत्याही लोकसभा क्षेत्रामधून जिंकलोच असतो. पण, मला फक्त दोनच जागा दिल्या. एक अमेठी आणि एक केरळमधले वायनाड. निवडणूक जिंकायचे इतके फंडे असताना लोक कसल्या रॅलीबिली काढतात? उगीचच मला भाषणबिषण करायला देतात. बरं, देशातल्या काही लोकांची नावं पण अशी की माझ्या जिभेवर यायला तयार नाहीत. ते काय विश्वसराय.. वगैरे छे. जाऊ दे. आता अमेठी आणि वायनाडकडे लक्ष द्यावे लागेल. त्या त्या ठिकाणचा गेटअपपण तयार ठेवायला लागेल. अमेठीवाले उत्तर भारतीय. जानवं, गंगाजल, तिलक, धोती वगैरे वगैरे आयटम घालायला हवेत. वायनाडसाठी हे उपयोगी पडणार नाही. तिथे जरा वेगळा गेटअप हवा. केरळला बिफ पार्टी झाली होती तेव्हा म्हणे, माझ्या पक्षाचा कार्यकर्ता तिथे पार्टी करण्यात पुढे होता. त्याला हाताशी धरला पाहिजे. अमेठीत गंगाजलवाल्यांना पकडावं लागेल आणि वायनाडला बिफ पार्टीवाल्यांना पकडावं लागेल. असो, निवडून आल्यावर काय करायचे आहे याचीपण आतापासून तयारी करतो. सत्तेत आल्या आल्या माझे पहिले कर्तव्य असेल ते म्हणजे नीती आयोगच बरखास्त करेन. नीती आयोग देशासाठीही नको आणि नीती वैयक्तिक आयुष्यातही हवी की नको, हा प्रश्न माझ्यासाठी वादग्रस्तच आहे. आता माझे लक्ष फक्त माझ्या रणक्षेत्रावर अमेठी आणि वायनाडवर. मोदींना अमेठी वायनाडसह जिंकत बसू दे देश...

 

जाना था जपान.. अभी नही

 

धाकटे साहेब म्हणजे कोण विचारता? तर महाराष्ट्रात तीनच घराणी. त्यामध्ये मोठे साहेब म्हणजे गांधी घराण्यातले राजकुमार, मधले साहेब म्हणजे ‘आंबेडकर’ आडनाव असलेले प्रकाश आणि धाकटे साहेब सांगायला हवेत का? महाराष्ट्राच्या विकासाची कधीही न निघालेल्या ब्लू प्रिंटचे ना कर्ते ना करविते धाकटे महाराज शेवटी बारामतीच्या गडावर आपली सुभेदारी घेऊन निघाले. ‘जाना था जापान, पहुँच गये चीन, समझ गए ना’ हे प्रसिद्ध गाणे त्यांच्यासाठीच किशोरदांनी गायले होते वाटते. फक्त इथे जपान, चीनऐवजी अनुक्रमे भाजप, राष्ट्रवादी म्हणू या. गेल्या निवडणुकीत धाकट्या साहेबांना ‘कमळ’ हे पावित्र्याचं प्रतीक वाटत होते. आता त्यांना मनगट नसलेल्या पंजावरचे बारा वाजताना दिसणारे ‘घड्याळ’ पवित्र वाटते. वक्त वक्त की बात आहे. पण, या वक्त वक्तच्या बातला स्वार्थाबिर्थाचे नाव द्यायचे नाही, बरं का? कारण धाकटे साहेब जे काही करतात, ते सगळ्यांचा विचार करूनच करतात. ‘सगळ्यांचा’ याचा अर्थ ते स्वतः म्हणजे सगळे. कार्यकर्त्यांनी फक्त आदेश घ्यायचे. असे आदेश घेत घेत सगळे आमदार-नगरसवेक कधीच ‘जाना था जापान पहुँच गये चीन म्हणत’ दुसऱ्या डेऱ्यात दाखल झाले. पण पर्वा कोण करतो? धाकटे महाराज अशा लोकांचे मौताद नाहीत. कारण, त्यांचे ब्रश शत्रूंची (पक्षी विरोधी पक्षांची) धुळधाण उडवतात. (म्हणजे रंगांचे ब्रश, नाहीतर दात घासायचे ब्रश समजाल) तर त्यांचे हे रंगांचे ब्रश म्हणजे त्यांचे नवनिर्माणाचे साधन आहे. या नवनिर्माणाने कागदावर ते असे सैन्य चितारतात की, मानवी सेनेची गरजच नाही. हे कागदावरचे सैन्य घेऊन, "मै चाहे ये करू, मै चाहे वो करू, मेरी मर्जी!" म्हणत धाकटे साहेब बारामतीकरांची मर्जी सांभाळण्यास सिद्ध झाले आहेत. त्यांच्या या मानलेल्या नव्या काकांचे म्हणजे- हम करे सो कायदा आणि बाकी भूल जाओ वायदा. धाकटे साहेब म्हणाले,"युतीच्या म्हणजे भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात तगडा उमेदवार असेल त्याला मत द्या." पण, त्या तगड्या उमेदवाराचे निकष काय? त्याचीही ब्लू प्रिंट धाकट्या साहेबांकडे नाही. त्यामुळे धाकट्या साहेबांचे सैनिक या निवडणुकीमध्ये मनाप्रमाणे ‘नवनिर्माण’ करणार आहेत. ते ‘जाना था जपान...’ वगैरे न करता व्यवस्थित तीरकमान खोचलेल्या कमळाकडेच जातील, हे नक्की.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat