सागरी सुरक्षेसाठी कामरी

    दिनांक  30-Mar-2019   नाशिक येथे सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत कान्होजी आंग्रे मेरीटाईम रीसर्च इन्स्टिट्यूटने (कामरी) जागतिक पटलावर सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संशोधन करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. सागराची, सागर किनाऱ्याची सुरक्षा, सागरी व्यापारउदीम आदी बाबींवर सर्वंकष पद्धतीने संशोधन व जागृती करणे, हाच कामरीचा उद्देश आहे.


कान्होजी आंग्रे यांच्या नावाने नाशिक येथे सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत कान्होजी आंग्रे मेरीटाईम रीसर्च इन्स्टिट्यूट अर्थात कामरी कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून जागतिक पटलावर सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संशोधन करण्याचे ध्येय समोर ठेवण्यात आले आहे. या संशोधन केंद्राच्या माध्यमातून विविध व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद यांचे सातत्याने आयोजन करण्यात येत असते. या कार्यात युवकांचा सहभाग वाढावा आणि त्यांना या क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी या केंद्राच्या माध्यमातून कार्य केले जात आहे. हिंदी महासागर क्षेत्रात असणाऱ्या देशांचे आपापसातील संपर्क वृद्धिंगत व्हावे, याकरिता या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर संशोधन केले जाते. हिंदी महासागरी क्षेत्रातील समान संस्कृती आणि आर्थिक संपन्नता यांचे जतन करणे व ती नावारूपाला आणण्यासाठी या केंद्राच्या माध्यमातून विचार प्रकट करण्याचे (थिंक टँक) म्हणून दिले जात असलेले योगदान हे निश्चितच भविष्यासाठी स्पृहणीय आहे. सागरी क्षेत्रात असणाऱ्या सर्व संदर्भाचे संकलन करून मेरीटाईम ग्रंथालयासाठी ‘नॉलेज बँक’ तयार करून त्या माध्यमातून विविध शोध निबंध सादर करून विचारमंथन येथे करण्यात येत असते.

 

केंद्राचा मूळ उद्देश

 

मुळात भारताच्या संरक्षणाला शेजारील राष्ट्रांकडून असणारा धोका लक्षात घेता या क्षेत्रात धोरणात्मक आणि अभ्यासपूर्ण विवेचन होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी समान व्यासपीठ निर्माण करण्याच्या हेतूने या संशोधन केंद्राची स्थापना सोसायटीच्या वतीने करण्यात आली. २०१५ मध्ये सुरू झालेल्या या केंद्राच्या माध्यमातून शेजारील देश भारताच्या सीमेसंदर्भात जो भौगोलिक वाद निर्माण करत आहे तसेच, सागरी सीमेवरून जे वाद निर्माण होत आहे त्या विषयावर विचारमंथन होणे आवश्यकच होते. विशेष म्हणजे बऱ्याच ठिकाणी सेमिनार खूप होतात पण त्या सेमिनारमधील विचारमंथनाचे पुढे काय होते, हे फारसे माहीत होत नाही. मात्र, कामरीमार्फत आयोजित सेमिनारची जर उपयोगिता सिद्ध होणार असेल, तरच मी येतो या अटीवर तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर सन २०१५ मध्ये कामरीच्या उद्घाटन सत्रास उपस्थित होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात सागरी सीमा सुरक्षा आणि ब्लू इकॉनॉमी या विषयावर भारतभरातील सुमारे ४३ तज्ज्ञांनी सहभाग नोंदविला होता. याच चर्चेचा परिपाक म्हणून कामरी सुरू झाली व एका निश्चित ध्येयाने आणि दिशेने कामरीची वाटचाल आज मोठ्या दिमाखात सुरू आहे.

 

परिसंवादातून व्यापक चर्चा

 

सागरी सुरक्षेबरोबरच सागरी उत्पादनावर आधारित असणारी अर्थव्यवस्थादेखील महत्त्वाची आहे. याच धारणेतून कोस्टल सिक्युरिटी अँड ब्लू इकोनॉमी करंट सिनारिओ या विषयावर या परिसंवादात विचारमंथन करण्यात आले. त्यानंतर मुंबई विद्यापीठासमवेत ‘हिस्ट्री अँड हेरिटेज ऑफ कोस्टल सिक्युरिटी’, नंतर दिल्ली येथे ‘इंडियन ओशन इज इंडियाज ओशन’ व पुन्हा मुंबई येथे ‘द कोस्टल सिक्युरिटी वे अहेड’ अशा विषयांवर चर्चासत्रे कामरीच्या माध्यमातून आजवर आयोजित करण्यात आली आहेत. या परिसंवादांच्या माध्यमातून सागरी सुरक्षा या विषयावर भारतातील अनेक तज्ज्ञांनी आपला सहभाग नोंदवत एक दिशादर्शक धोरण ठरविले आहे.

 

२६/११ च्या घटनेने रोवली वैचारिक मुहूर्तमेढ

 

सागरी क्षेत्राबाबतच संशोधन केंद्र सुरू करावेसे का वाटले, हे सीएचएमई सोसायटीचे सरकार्यवाह दिलीप बेलगावकर यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, संरक्षणदृष्ट्या सागरी क्षेत्र हे कायमच दुर्लक्षित राहिले आहे. २६/११ च्या घटनेनंतर सागराची व किनाऱ्यांची सुरक्षितता किती आवश्यक आहे, हा विचार आमच्या मनात सुरू झाला. त्यामुळे केवळ सुरक्षा हा मुद्दा न ठेवता संपूर्ण सागर विश्वावर संशोधन होणे आवश्यक असल्याचे जाणवले म्हणून कामरीची स्थापना करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

 

असे आहे भविष्यातील नियोजन

 

संस्थेच्या वतीने कामरीसाठी सागरकिनारी जागा मिळावी यासाठी मुरुड-जंजिरा येथे जागा प्राप्त व्हावी याकामी प्रस्ताव पाठविण्यात आला असून त्याला मान्यता मिळाल्यास कोस्टल सिक्युरिटी व मेरीटाईम रीसर्चचे अभ्यासक्रम तेथे सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. या माध्यमातून रोजगार निर्मिती व ब्लू इकॉनॉमी यात संशोधन करण्यास निश्चितच वाव मिळेल, यात शंका नाही. नाशिकमध्ये हे संशोधन केंद्र भोंसला सैनिकी महाविद्यालयात कमांडर रजसिंग धनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. कामरीच्या माध्यमातून आयोजित परिसंवादातील निष्कर्ष हे राज्य व केंद्र शासनाला पाठविण्यात येत असतात. आगामी काळात वर्षात तीन मोठे परिसंवाद आयोजित करण्याचा संस्थेचा मानस आहे. दूरदृष्टी आणि शिस्त यांचे बाळकडू या संस्थेतील प्रत्येक विद्यार्थ्यास प्राप्त होतच असतात. मात्र, नाशिकमध्ये सागरकिनारा नसूनही सागरी किनारा क्षेत्राचा विचार आजमितीस नाशिकनगरीतून होत आहे. यातच या संस्थेची दूरगामी दृष्टी दिसून येते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat