त्रिपुरा परिपूर्ण पर्यटनाची पंढरी

    दिनांक  03-Mar-2019   

 

 
 
 
त्रिपुरा... ईशान्य भारतातील हे लहानसे राज्य भौगोलिक, सांस्कृतिक विविधतेने अगदी विनटलेले. त्रिपुरातील पर्यटनाच्या व्यापक संधींमध्येही साहजिकच या विविधतेचे प्रतिबिंब दिसून येते. पण, पर्यटनस्थळांकडे झालेले दुर्लक्ष आणि पर्यटकांसाठी अपुऱ्या सोयीसुविधा यामुळे त्रिपुरा काहीसे मागे पडले. पण, राज्य सरकारच्या ‘स्वदेश दर्शन’ योजनेअंतर्गत राज्यातील पर्यटनाला गतिमान करण्याचा विडा नवीन सरकारने उचलेला दिसतो. त्याचीच प्रचिती त्रिपुरातील प्रेक्षणीय स्थळांच्या भेटीनंतर येते. तेव्हा, त्रिपुरातील पर्यटनस्थळे आणि सद्यस्थितीचा आढावा घेणारा हा लेख...
 

ईशान्य भारतातील आठ राज्यांपैकी एक महत्त्वाचे राज्य म्हणजे त्रिपुरा. चांद्रवंशीय राजवटीचा वारसा लाभलेल्या या राज्याचे नाव ‘त्रिपूर’ राजावरुन ‘त्रिपुरा’ असे प्रचलित झाल्याचे सांगितले जाते. ‘तुई’ म्हणजे पाणी आणि ‘प्रा’ म्हणजे जवळ, अर्थात पाण्याजवळचा प्रदेश तो ‘टिपरा,’ ‘ट्विप्रा’चा अपभ्रंश होऊन ‘त्रिपुरा’ हे नाव अंतत: रुढ झाले. ब्रिटिशकाळातही त्रिपुरावर राजघराण्याचीच राजवट कायम होती. भारतीय संघराज्याचा १९४९ पासून अविभाज्य भाग असलेल्या या राज्याच्या तीन दिशांच्या सीमा या शेजारी बांगलादेशला अगदी खेटून आहेत. एकूण १० हजार, ४९१ स्क्वे. किमी क्षेत्रात विस्तारलेल्या त्रिपुराची तब्बल ८५६ किमीची सीमा ही बांगलादेशशी जोडली गेली आहे. म्हणजे, पश्चिम बंगालनंतर (२ हजार २१७ किमी) त्रिपुरा हे बांगलादेशच्या सीमेला लागून असलेले दुसरे मोठे राज्य. त्यामुळे राज्याचे भौगोलिक क्षेत्र कमी असले तरी, आंतरराष्ट्रीय सीमा मात्र त्या तुलनेत भरपूर मोठी. त्रिपुराच्या पूर्वेला आसाम आणि मिझोराम ही दोन ईशान्य भारतातील राज्ये. अशा या जवळपास बांगलादेशच्या कवेत सामावलेल्या त्रिपुरालाभारताशी जोडणारे ‘एनएच ८’ आणि ‘एनएच १०८’ हे दोन प्रमुख महामार्ग. आगरताळा हे राजधानीचे छोटेसे शहर. तेही बांगलादेशच्या सीमेपासून अगदी दोन किमी अंतरावर. त्यामुळे त्रिपुराच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलो तरी, बांगलदेशशी असलेला सीमासंबंध काही पिच्छा सोडत नाही. आमचा वाहनचालकही अगदी आगरताळ्यात फिरताना ‘इधरसे सिर्फ दो किमी अंतर गये ना तो बांगलादेश बॉर्डर लगती हैहे वाक्य जवळपास वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा-तीनदा तरी बोलला असेल. सांगायचा मुद्दा हाच की, मुख्य भारतभूमीपासून त्रिपुराचे अंतर जास्त असून कोलकाताने रस्तेमार्गाने हेच अंतर हे १ हजार ७०० किमी इतके आहे, जे फाळणीपूर्वी केवळ ३५० किमी इतके होते. म्हणूनच त्रिपुरा अत्यंत दुर्गम आणि दुर्गम म्हणून तितकेच दुर्लक्षितही राहिले. परिणामी, या राज्यात पर्यटनासाठी अनुकूल प्रेक्षणीय स्थळांचा, वातावरणाचा खजिना असला तरी, ईशान्य भारतातील इतर राज्यांपेक्षा तुलनेने कमीच पर्यटक त्रिपुराचा फेरफटका मारतात. पण, २०१८ च्या राज्यातील सत्तांतरानंतर पर्यटनाचे हजारो कोटींचे प्रकल्प सध्या राज्यात वेगाने सुरू असून आगामी काळात त्रिपुराही पर्यटकांनी बहरलेले दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.

 

 
 

हिरवेगार आणि डोंगररांगांनी वेढलेल्या त्रिपुरात खरोखरीच निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेली दिसते. त्याचबरोबर जलस्त्रोतांची विपुलताही विशेष लक्ष वेधून घेते. गोमती नदी ही त्रिपुराची एक प्रमुख नदी आणि याच नदीच्या ‘रुद्रसागर’जलाशयावर स्थित ‘नीरमहल’ हे येथील प्रमुख आकर्षण. नावाप्रमाणेच, पांढऱ्या-तपकिरी रंगसंगतीत तलावाच्या अगदी मधोमध उभा असलेला नीरमहल अगदी लांबवरूनच आपल्या भव्यतेची कल्पना देतो. त्रिपुराचे राजा वीर विक्रम सिंह यांनी १९३८ साली या नीरमहलाची उभारणी केली. उन्हाळ्याच्या मौसमात राणीसह राजा या महालात थंडाव्याचा आस्वाद घेत. या महालाचे वैशिष्ट्य म्हणजे, हिंदू-मुस्लीम स्थापत्त्यकलेचा साधलेला उत्तम संगम. नीरमहलवरून सूर्यास्त अनुभवण्यासाठी पर्यटक खासकरून गर्दी करतात. समोर पसरलेला शांत तलाव, त्यावर मच्छीमारांच्या पहुडलेल्या बोटी आणि मावळतीच्या सूर्याची किरणं अगदी डोळ्यात साठवून घेण्याजोगी... त्याचबरोबर आसपासच्या गावातील शेकडो कुटुंब रोजगारासाठी आज या तलावावर अवलंबून आहेत. पण, नीरमहलचे तुटपुंजे प्रवेश शुल्क, चार-पाच वर्षांपासून बंद पडलेला लेझर शो, स्पीडबोटींचा अभाव, आसपास पर्यटकांच्या निवासाची मर्यादित व्यवस्था यांसारख्या समस्यांच्या गर्तेत हा नीरमहल रुतलेला दिसतो. पण, विप्लव देव सरकारने नीरमहलच्या विकासासाठी ३.५६ कोटी रुपयांचा निधीही देऊ केला आहे. शिवाय, अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नीरमहलवर सायंकाळ, रात्रीच्या वेळी पर्यटनासाठी मंजुरी देण्याचेही सरकारच्या विचाराधीन आहे. त्यामुळे राजस्थानच्या जलमहालाला टक्कर देणारा असा हा आगरताळ्यापासून केवळ ५३ किमी अंतरावर असलेल्या मेलाघरमधील नीरमहल आगामी काळात त्रिपुराच्या पर्यटनाच्या केंद्रस्थानी असेल, यात शंका नाही.

 

 
 

त्रिपुराचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र हे वनाच्छादित असून आगरताळ्यापासून २५ किमी अंतरावर हिरव्या पट्ट्यात अगदी मिसळून गेलेले सिपाईजला अभयारण्य. त्रिपुराच्या महाराजाच्या शिपायांचा कॅम्प इथून जवळच होता आणि सभोवताली एक तलावही असल्यामुळे या क्षेत्राला ‘सिपाईजला’ या नावानेच ओळखले जाते. १८.५३ स्क्वे. किमी परिसरात विस्तारलेल्या या अभयारण्यात एक बोटॅनिकल गार्डन, कृत्रिम तलावही तयार करण्यात आला आहे. या अभयारण्यात भारतात फार कमी आढळणारे ‘क्लाऊडेड लेपर्ड’चे (बिबट्याचा एक प्रकार) दर्शन तुम्हाला होईल. त्याचबरोबर १५० पेक्षा अधिक पक्षी, हिवाळ्यात सायबेरियाहून येणारे स्थलांतरित पक्षीही या अभयारण्यात मुक्त विहार करतात. ठिकठिकाणी दिसणारी वेगवेगळ्या प्रकारची माकडं, तसेच अस्वलंही या अभयारण्यात पाहायला मिळतात. १०-१२ हजार रबराचे टुमदार वृक्ष डौलात उभे असलेल्या या अभयारण्यात झाडाच्या खोडातून रबरासाठी लागणारा द्रव कसा गोळा केला जातो, त्याचीही सविस्तर माहिती वनमार्गदर्शक देतात.

 

 
 

अशा या निसर्गरम्य वातावरणातच राहून आसपासच्या जैवविविधतेचा मनमुराद अनुभव पर्यटकांना लुटता यावा म्हणून लाकडाच्या ‘लॉग हाऊस’ बांधणीचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. साल, शगुन, बांबू या झाडाच्या लाकडांनी तयार केलेल्या या ‘लॉग हाऊस’मध्ये पर्यटकांच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गरजेचा विचार करून सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचबरोबर पर्यटकांना आसपासच्या वनराईमध्ये फेरफटका मारता यावा म्हणून ३५० मीटरचा बोर्ड वॉक आणि दोन किमीच्या पाथ वेचे काम विकासपथावर आहे. त्यामुळे आगामी काळात अधिकाधिक पर्यटक त्रिपुरात दाखल होतील, अशी आशा वन अधिकारी बिमल बनेक हे बोलताना व्यक्त करतात. त्याचबरोबर तपनिया येथे इकोपार्क, इंटरप्रिटेशन सेंटर, निसर्ग माहिती केंद्र, ट्री-हाऊस यांचेही काम प्रगतिपथावर आहे. एकूणच ‘स्वदेश दर्शन’ या सरकारी योजनेच्या अंतर्गत त्रिपुरातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी सरकारने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद म्हणावा लागेल.

 

 
 

निसर्गसौंदर्याबरोबरच आध्यात्मिकतेचाही अनोखा संगम त्रिपुरात पाहायला मिळतो. बंगालप्रमाणेच कालिमातेचे भक्त असलेले त्रिपुरावासी. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जशा गणपतीच्या, हनुमानाच्या मूर्ती झाडाखाली, रस्त्याच्या कडेला पुजलेल्या दिसतात, तशाच त्रिपुरात कालिमातेच्या आकर्षक मूर्तींचे दर्शन होते. ५१ शक्तिपीठांपैकी एक असलेल्या त्रिपुरसुंदरीच्या उदयपूर येथील मंदिरालाही भाविक मोठ्या संख्येने भेट देतात. साधारण ५०० वर्षांपूर्वीचे हे सुप्रसिद्ध मंदिर समस्त त्रिपुरावासीयांसाठी आस्थेचा विषय आहेच, पण देशभरातून भाविक देवी त्रिपुरेश्वरीच्या दर्शनासाठी गर्दी करतात. या मंदिरासमोरच असलेल्या कल्याण सागर तलावात कासव आणि मासे मोठ्या संख्येने आढळतात. पण, ‘देवीचा तलाव’ अशी भाविकांची श्रद्धा असल्यामुळे या तलावातमासेमारी वर्ज्य आहे. शिवाय, एका आख्यायिकेनुसार, या तलावातील कासव जेव्हा त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या घटिका मोजत असतात, तेव्हा ते तलावातून स्वत: बाहेर येऊन मंदिराच्या पायऱ्या चढून कासवांनी श्वास सोडण्यासाठी असलेल्या देवीसमोरच्या त्या विशिष्ट जागी जाऊन आपल्या जीवनालापूर्णविराम देतात. देवी त्रिपुरेश्वरीच्या अशा अनेक आख्यायिकाप्रसिद्ध असून बळी देण्याची प्रथाही या मंदिरात पाहायला मिळतेएकूणच, त्रिपुरामध्ये पर्यटनासाठी अत्यावश्यक अशी २० पेक्षा जास्त पर्यटनस्थळे फार कमी अंतरावर आहेत. त्यामुळे अवघ्या चार-पाच दिवसांत संपूर्ण त्रिपुराचे दर्शन अगदी सहज शक्य आहे. त्यामुळे वनसंपदा असो वा जलसंपदा, डोंगरदऱ्या असो वा चहाचे मळे, बंगाली संस्कृती सोबत जनजातीय संस्कृती, या सगळ्या सुंदर मिलाफाच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी त्रिपुराला एकदा तरी भेट नक्कीच द्यायला हवी.

 
 

 
 

पर्यटकांची पसंती त्रिपुराला...

 

साधारण २०१६ पासून त्रिपुरातील पर्यटकांच्या संख्येत समाधानकारक वाढ झाल्याचे दिसते. २०१६-१७ या आर्थिक वर्षात त्रिपुराला तब्बल ४ लाख ८३ हजार ४८८ पर्यटकांनी भेट दिल्याचे अधिकृत आकडेवारी सांगते. तसेच, परदेशी पर्यटकांची संख्याही हळूहळू वाढत चालल्याचेही पर्यटन मंडळांच्या अधिकार्‍यांशी चर्चेअंती समजते. साहजिकच, यामुळे राज्याच्या महसुलात भर पडली असून २०१७-१८ या आर्थिक वर्षात पर्यटनामुळे त्रिपुराला ३.२३ कोटींचे महसुली उत्पन्न मिळाले.

 
 

 
 

इतर महत्त्वाची पर्यटनस्थळे

 

उजयंता पॅलेस, उनाकोटी, छबीमुरा, पिलक, संत्रीबाजार, बौद्ध स्तुप, महामुनी पगोडा, भुवनेश्वरी मंदिर, कसबा काली मंदिर, चर्तुदश देवता मंदिर, जंपुई हिल्स, दम्बूर तलाव

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat